कोरोनामध्ये लग्न केलं थाटात पडली, पालिकेची धाड : गुन्हा दाखल

    दिनांक  22-Feb-2021 20:29:29
|
covid _1  H x W
 
 
मुंबई : नियंत्रणात येत असलेला कोरोना मुंबईत वाढत असतानाच नियम धाब्यावर बसविणाऱ्या लग्नसोहळ्याच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चेंबूर पश्चिमच्या छेडानगरमध्ये मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागल्याने राज्य व पालिकेने कोरोना नियमाची कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नियम धाब्यावर बसवणाऱ्यांच्या विरोधात धाडी टाकून कारवाईला सुरुवात केली आहे.
 
 
 
रविवारी चेंबूर (प) येथील छेडानगर जिमखाना येथे लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तीनशेहून अधिक जणांची गर्दी झाली होती. शिवाय कोरोनाप्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसविण्यात आलो होते. त्यामुळे वधू-वराच्या पालकांविरोधात व जिमखाना व्यवस्थापकाविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यात कोरोना नियमाचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे.
 
 
 
५० पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवणे, मास्कचा वापर न करणे तसेच सोशल डिस्टनसिंगचा नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या चेंबूर पश्चिमच्या विभाग कार्यालयाने छेडानगर जिमखाना येथे रविवारी रात्री पालिकेने धाडी टाकून संबंधितांवर कारवाई केली. लग्नात नियमांचे उल्लंघन करून ३००-३५० नागरिकांची गर्दी जमविणे, सामाजिक अंतर न राखणे, मास्कचा नीटपणे वापर न करणे आदी कारणास्तव आयोजक व जिमखाना व्यवस्थापक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
पालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, छेडानगर जिमखाना अँड रिक्रिएशन सेंटर, चेंबूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती चेंबूर पश्चिमच्या विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय अधिकारी भुपेंद्र पाटील यांना मिळाली. त्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
 
 
 
पालिकेच्या पथकाने सदर ठिकाणी रविवारी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास अचानक धाड टाकली. त्यावेळी त्यांना जिमखान्याच्या ठिकाणी ३००-३५० जणांची गर्दी आढळून आली. कोरोना संदर्भातील नियमांचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनेकांनी मास्कही घातलेला नव्हता. गर्दीमुळे सामाजिक अंतर राखण्याचे भानही कोणाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आयोजकांविरोधात आणि जिमखाना व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.