भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा रावला जामीन

    दिनांक  22-Feb-2021 13:14:08
|
varavara rao _1 &nbs


मुंबई -
नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत असल्याचे आरोप असणारे तेलुगू कवी वरवरा राव याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. आरोग्याचा कारणास्तव ५० हजारांच्या जातमुचल्यावर सहा महिन्यांकरिता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी त्याला हैद्राबादमधील आपल्या घरी जाण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली नाही.
 
 
वरवरा राव हा नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गेल्या काही वर्षांपासून तुरुगांत होते. नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी त्यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
वरवरा राव राव  सध्या ८१ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे वरवरा राव याच्या कुटुंबीयांकडून त्याना जामीन देण्याची मागणी अनेक उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अनेकदा ही विनंती फेटाळली. अखेर तुरुंगात त्याच्यावर उपचार शक्य नाहीत हे लक्षात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने त्याना रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वरवरा राव याला मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वरवरा राव याच्या पत्नी पत्नी हेमलता यांनी न्यायालयात स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय सोमवारी देऊन त्यांना जामीन देण्यात आला.
 
 
जामीन देताना त्याच्यावर काही बंधनेही घालण्यात आली आहेत. वरवरा राव यांनी एनआयए न्यायालयाच्या हद्दीच्या बाहेर जाऊ नये. आपण राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता कळवावा. तसेच न्यायालयाच्या तारखांना हजर राहावे. वरवरा राव यांनी इतर आरोपींच्या संपर्कात राहता कामा नये. त्यांनी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करु नये, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.