केरळचे राजकारण ढवळून काढणारी भाजपची विजययात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021   
Total Views |

BJP Kerala _1  
 
 

भारतीय जनता पक्षाच्या या विजययात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणार्‍यांनी, हिंदू समाजाची उपेक्षा करणार्‍या राजकीय पक्षांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जहाल धर्मांध संघटनेने भाजपच्या या विजययात्रेचा धसका घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे.
 
 
 
आगामी काही काळात केरळ, आसाम, तामिळनाडू, प. बंगाल या राज्यामध्ये विधानसभांच्या निवडणूक होत आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून मोठ्या ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी विजययात्रेचे आयोजन केले आहे. केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली ही विजययात्रा निघाली असून या यात्रेचा शुभारंभ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते केरळच्या कासरगोड येथे नुकताच झाला.
 
 
भ्रष्टाचारमुक्त केरळ, तुष्टीकरणाच्या राजकारणास विरोध आणि केरळचा सर्वांगीण विकास ही उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेवून ही विजययात्रा काढण्यात आली आहे. या विजययात्रेची सांगता येत्या दि. ७ मार्च रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार असून या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान १४ महामेळावे, ८० जाहीरसभा यांचे आयोजन करण्यात आले असून भाजपचे अनेक केंद्रीय नेते या सभांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
 
 
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केरळमधील डावी आघाडी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांपुढे भाजपने आव्हान उभे केले आहे. त्याचप्रमाणे भाजपची ही विजययात्रा आणि त्याचा प्रारंभ करण्यासाठी योगी आदित्यनाथ निमंत्रित करण्यात आल्यावरून केरळमधील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेला पोटशूळ उठला असल्याचे दिसून आले. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अलीकडेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या दोघा जहाल तरुणांवर कारवाई केल्याने या संघटनेच्या मनात योगी सरकारविरुद्ध संताप होताच.
 
 
त्यामुळे योगी आदित्यनाथ केरळमध्ये येत असल्याचे पाहून त्यांचा निषेध करणारी पत्रके ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून झळकविण्यात आली. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अत्यंत वाईट मजकूर लिहिण्याबरोबरच, ‘योगी आदित्यनाथ परत जा’ असा उल्लेखही त्यावर करण्यात आला होता. उत्तर प्रदेश सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केरळमध्ये दि. २१ फेब्रुवारी रोजी ‘निषेध दिन’ पाळण्याचे आवाहनही या जहाल संघटनेने केले होते. पण, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या धर्मांध संघटनेने दिलेल्या धमक्यांची चिंता न करता भाजपची ही विजययात्रा सुरू झाली आहे.
 
 
‘मेट्रोमॅन’ या विशेषणाने प्रसिद्ध पावलेले ई. श्रीधरन यांचा सहभाग हे या यात्रेचे एक वैशिष्ट्य मानायला हवे. ई. श्रीधरन यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी जे कार्य देशाच्या विविध भागांमध्ये उभे केले, त्यामुळे त्यांची सर्वत्र ख्याती आहे, अशी सुप्रसिद्ध व्यक्ती भाजपमध्ये सहभागी झाल्याचा केरळ भाजपला नक्कीच लाभ होणार आहे. शालेय जीवनामध्ये आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. संघाने आपल्यावर जे संस्कार केले त्यातून अनेक जीवनमूल्ये आपण आत्मसात केली, याचा ई. श्रीधरन यांनी आवर्जून उल्लेख केला. भाजप वगळता कोणत्याच राजकीय पक्षांवर आपला विश्वास नसल्याचे स्पष्ट करून, केवळ भाजपकडे प्रगतिशील दृष्टिकोन असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. केवळ भाजपच केरळचा विकास करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता, “त्यासंदर्भात पक्ष योग्यवेळी निर्णय घेईल,” असे ते म्हणाले.
 
 
केरळमधील भाजपच्या या विजययात्रेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि शबरीमला हे मुद्दे उपस्थित करून त्यावरून सत्तारूढ डावी आघाडी आणि विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. हे दोन्ही पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करण्यात आघाडीवर असल्याची टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’विरुद्ध चौकशी करण्याचा, कारवाई करण्याचा आदेश दिला असता, या दोन्ही पक्षांनी असे काही घडत नसल्याचे म्हटले होते. ‘लव्ह जिहाद’ ही ‘इस्लामिक स्टेट’च्या दिशेने नेणारी खेळी असल्याची टीका त्यांनी केली.
 
 
केरळमध्ये जे अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे राजकारण खेळले जात आहे, ते राजकारण भाजपला संपुष्टात आणायचे आहे. उच्च न्यायालयाने, ‘लव्ह जिहाद’मुळे केरळचे ‘इस्लामिक स्टेट’मध्ये रूपांतर होईल, असे म्हटले असतानाही सरकार झापडे बांधून, अशा तत्त्वांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी विजययात्रेचा प्रारंभ करतेवेळी आपल्या भाषणातून केला. केरळमधील डाव्या सरकारने शबरीमला प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे श्रद्धावान भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. भाजपचे कार्यकर्ते शबरीमला भक्तांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या भाजपच्या या विजययात्रेमुळे केरळमधील राजकारण ढवळून निघणार हे उघड आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार, हेही सांगायला नको!
 
 
केरळमधील स्थिती बदलत असून भारतीय जनता पक्षास अनुकूल वातावरण आहे, असे परराष्ट्र राज्यमंत्री आणि केरळ भाजपचे माजी अध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे. २०१६ मध्ये भाजपची मतांची टक्केवारी १६ टक्के होती. लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यात वाढ झाली. केरळमधील जनता साम्यवाद्यांच्या आणि काँग्रेसच्या राजकारणास कंटाळली आहेत. तसेच डाव्या आघाडीस आणि काँग्रेसप्रणीत आघाडी यांच्या मतपेढीच्या राजकारणाचा आणि भ्रष्टाचारी कारभाराचा जनतेस उबग आला आहे.
 
 
‘कोविड-१९’ वर नियंत्रण मिळविण्यात आलेले अपयश, तसेच बेकारी निर्मूलन करण्यामध्ये किंवा आर्थिक व्यवस्थापन यामध्ये केरळ सरकारला अपयश आल्याची टीका व्ही. मुरलीधरन यांनी केली. भारतीय जनता पक्ष मतपेढीचे राजकारण चालू देणार नाही, तसेच भ्रष्टाचारास थारा देणार नाही, असेही मुरलीधरन यांनी सांगितले. आगामी विधानसभेमध्ये भाजप ‘प्रभावी पक्ष’ म्हणून उतरणार असून या लढती तिरंगी होतील. काँग्रेस पक्ष मावळतीला लागला असल्याचे भाकीतही त्यांनी केले आहे.
 
 
एकूणच भारतीय जनता पक्षाच्या या विजययात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणार्‍यांनी, हिंदू समाजाची उपेक्षा करणार्‍या राजकीय पक्षांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जहाल धर्मांध संघटनेने भाजपच्या या विजययात्रेचा धसका घेतल्याचे दिसून येऊ लागले आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकांवरही या विजययात्रेचा प्रभाव पडणार हे सांगायला नको!




@@AUTHORINFO_V1@@