कोल्ह्यांना द्राक्षे आंबटच!

    दिनांक  22-Feb-2021 21:19:07
|

pcb president _1 &nbबरीच धडपड करूनही एखादी गोष्ट जेव्हा मनासारखी घडत नाही, तेव्हा लबाड प्रवृत्तीची माणसे संबंधित गोष्ट आपल्या कामाचीच नसल्याचा कांगावा जगभर करतात. त्यांनी कितीही असा दिखावा केला तरी ‘कोल्ह्यांना द्राक्षे आंबटच’ हे सर्वांना चांगलेच माहीत असते. ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’बाबत (पीसीबी) सध्या काहीसे असेच घडत आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. कारण, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’चे विद्यमान अध्यक्ष एहसान मणी यांनी आगामी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेबाबत केलेले विधानच पाकिस्तानला संशयाच्या भोवर्‍यात ढकलणारे आहे. २०२१ मध्ये होणार्‍या या ‘टी-२०’ विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाल्याचे पाकिस्तानला सहन झालेले नाही. आपल्या कट्टर शत्रूराष्ट्राला इतकी मोठी संधी मिळाल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने आपल्या देशाचे खेळाडू, चाहते, पत्रकार त्यांना ‘व्हिसा’चे लेखी हमीपत्र देण्यात यावे, अन्यथा विश्वचषक स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत (युएई) खेळवण्यात यावी, अशी मागणी केली. पाकिस्तानचे ही मागणी म्हणजे मूर्खपणाचा कळसच आहे, अशी टीका अनेक क्रिकेट समीक्षकांनी केली. विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करताना ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (आयसीसी) घालून दिलेल्या सर्व अटी आणि शर्तींच्या नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र दिल्यानंतरच एखाद्या देशाला ही स्पर्धा आपल्या देशात आयोजन करण्याची संधी मिळते. भारताने १९९६, २०११ आणि २०१६ साली आपल्या देशात विश्वचषक स्पर्धा खेळविण्याची संधी मिळविली आहे. या तिन्ही विश्वचषक स्पर्धेदरम्यानपाकच्या खेळाडू, चाहते आणि पत्रकारांना भारतात येण्याची संधीही लाभल्याचा इतिहास आहे. भारताने याबाबत कधीही पाकला मनाई केलेली नाही. यावरून आतापर्यंत कुठल्या वादाचेही गालबोट लागलेले नाही. मात्र, असे असतानाही आगामी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळाल्याच्या द्वेषापोटी केवळ राजकारण करण्याच्या हेतूने पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी ही स्पर्धा ‘युएई’च्या धर्तीवर खेळविण्याची केलेली ही मागणी म्हणजे आपला जळफळाट झाल्याचे पाकिस्तानने दिलेली ही एक कबुलीच आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
 
 

जळफळाटास कारण की...

 
 
२००७ मध्ये सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीत पाकिस्तानला नमवत भारताने सर्वात आधी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेवरआपले नाव कोरल्याचा इतिहास आजही क्रिकेट विश्वात कायम आहे. हा कटू इतिहास आजही पाकिस्तानच्या स्मरणात आहेच. २००७ पासून ते आजघडीपर्यंत अनेक देशांना ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी लाभली आहे. क्रिकेट विश्वात ‘कच्चा लिंबू’ समजल्या जाणार्‍या बांगलादेशसारख्या देशानेही ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करून दाखवले. अगदी लहानांतल्या लहान देशांनाही ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेच्या आयोजन करण्याची संधी मिळाली. मात्र, पाकिस्तानच्या वाट्याला ही संधी काही आली नाही. दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम असल्याने कोणताही संघ पाकच्या धरतीवर जाऊन खेळण्यास सहजासहजीतयार होत नाही. यामुळे पाकिस्तानला विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करता येत नाही. परिणामी, आर्थिक लाभही होत नसल्याने पाकिस्तानचा क्रिकेट बोर्ड आर्थिक डबघाईला आले असून खेळाडूंचे मानधनही वेळेवर देणे, त्यांना शक्य होत नाही. बड्या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठी पाकिस्तानला संयुक्त अरब अमिरातीच्या धरतीवर विसंबून राहावे लागते. परिणामी, अपेक्षित आर्थिक लाभ होत नाही. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक चणचण दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली आहे. दुसरीकडे आपला शत्रूराष्ट्र असणारा भारत सतत अनेक बड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असल्यामुळे ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (बीसीसीआय) दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अधिकच सुदृढ बनत चालले आहे. विश्वचषकाचे आयोजन आपण आपल्या देशात करू शकत नाही. मात्र, आपल्या वाट्याला येणार्‍या संधीचा लाभ आपण इतर देशांना देऊ आणि आपले संबंध अधिक सुदृढ करू, अशी योजना पाकिस्तानने आखली होती. मात्र, इतर देशांपेक्षा क्रिकेट विश्वात सर्वात श्रीमंत बोर्ड असणारे ‘बीसीसीआय’ विश्वचषकांच्या आयोजन स्पर्धांमध्येही बाजी मारत आहे. अवघ्या पाच वर्षांमध्ये दोनदा ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाची संधी ‘बीसीसीआय’ला मिळाली आहे. म्हणूनच पाकिस्तानचा जळफळाट होत आहे.
 

- रामचंद्र नाईक

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.