असुरक्षिततेून सुरक्षिततेकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021
Total Views |

manovata  _1  H
 
 
अब्राहम मास्लो या तत्त्ववेत्याच्या सिद्धांतानुसार माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत; जसे की, अन्न, निवारा याबरोबरच सुरक्षितता हीसुद्धा एक अत्यंत महत्त्वाची गरज मानली जाते. ही मूलभूत गरज जर पूर्ण नाही झाली, तर त्याच्या इतर उच्च गरजाही पूर्ण होत नाहीत. कारण, अशा व्यक्तींना जग भीतिदायक वाटतं. आपल्या अस्तित्वाला जगामुळे धोका आहे, असं वाटतं. अशा पद्धतीची असुरक्षित मनस्थिती माणसाच्या नात्यातील बंधनामध्ये समस्या निर्माण करते. नातीही पुढे असुरक्षित आणि दु:खी होतात. यामुळे माणसाचा स्वत:वरचा विश्वास उडतो.
 
आपण जसे आहोत तसेच स्वीकारणे त्याला जमत नाही. आपल्यातला अस्सलपणा आणि आनंद यांचा अनुभव त्याला घेता येत नाही. आपली असुरक्षितता हाताळताना ‘आपण कोण आहोत’ आणि ‘आपल्याला आपल्या आयुष्यात काय मिळवायचे आहे’ हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात आर्थिक असुरक्षितता असते. भावनिक असुरक्षितता असते. व्यावसायिक असुरक्षितता असते. कधी आपण सामाजिक प्रसंगांमुळे असुरक्षित असू शकते. आपल्याला आपल्या दिसण्याबद्दल वा शारीरिक आजाराबद्दल असुरक्षित वाटत असतं, जरी वरील सर्व प्रसंगांत आपल्याला असुरक्षित वाटणं सर्वसामान्य आहे, पण जेव्हा ते आपल्या जीवनात एक प्रकारचं अस्वास्थ किंवा अडथळा निर्माण करतं, तेव्हा आपल्याला त्याविषयी काहीतरी करायला लागतं.
 
 
यामध्ये आपल्याला स्वत:ला अधिक जाणून घेणं, आत्मपरीक्षण करणं, सकारात्मक स्वसंवाद साधणं आणि स्वत:ला प्रेरणा देणं महत्त्वाचं आहे. असुरक्षित वाटणं, हा अनुभव एखाद्याला नकारात्मक वाटू शकतो, पण या जगात प्रत्येकाला हा अनुभव केव्हातरी येत असतो. आपल्याला स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल संदेह वाटतो. आपल्याला या असुरक्षित भावनेतून भयंकर राग येतो, भीती वाटते, उदास वाटते, निराधार वाटते. खरेतर यापैकी कुठलीच समस्या आहे, असे म्हणता येणार नाही. या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. त्यावर जगात जी अनिश्चितता आपण अनुभवतो, त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्या आपल्या मनात निर्माण होतात. समस्या केव्हा निर्माण होते, जेव्हा आपल्या या भावनाशी कसं काय निभावून न्यायचं, हे कळत नाही. तेव्हा आपण चिडतो, माघार घेतो, उगाच दुसर्‍यांना दुखावतो, आरडाओरडा करतो, ताठर बनतो. या सगळ्या प्रकारात आपण असुरक्षिततेच्या भावनेला विकृतपणे हाताळतो, ज्यामुळे शेवटी आपलेच अपरिमित नुकसान होते. आपण या असुरक्षिततेच्या विदारक भावनेवर मात कशी मिळवायची?
 
 
सगळ्यात आपल्या पचनी पडणारी गोष्ट म्हणजे असुरक्षित सगळ्यांनाच वाटतं. ‘आपण एकटे नाही आहोत,’ ही भावनाच मोठा दिलासा देऊन जाते. पहिली गोष्ट म्हणजे, स्वत: याच्यातून बाहेर पडायचे. ‘प्रेशर’ आणू नका, ‘रीलॅक्स’ व्हा, ही महत्त्वाची संकल्पना आणि कृती यावेळी उपयुक्त ठरते. काही घाई नाही. हळूहळू स्वत:ला सावरा. या घडीला इतर कोणाबरोबरही आपली तुलना करायची नाही. विराट कोहली नैराश्यात गेला होता आणि एका सुंदर दिवशी तो त्यातून बाहेर आला, हे उदाहरण प्रेरणादायी आहे खरे. पण, हा नैराश्यातून एक सुंदर दिवशी बाहेर यायचा मानसिक ताण आपण घेतो तो उपयोगी नाही. आपण आपल्या आयुष्याबरोबर चालायला वेग घेऊन आलो आहोत. चौकार, षट्कार मारायची गरज आपल्याला नाही. आपण आपले स्वत:चे गणित जुळवावे, हे बरे. आपण आपल्या आयुष्यात ज्या ज्या उत्तम गोष्टी केल्या आहेत, त्याचे स्मरण ठेवावे.
 
 
आपण काही बक्षीस मिळवलेले असते, मित्रमंडळींना मदत केलेली असते, या स्मृती आपल्याला सदैव सांगत असतात की, आपणसुद्धा भल्याचे धनी आहोत. आपल्यापाठीशीसुद्धा कोणीतरी उभे होते. म्हणजे जे सतत मनातून डोकावत होतं की, जग आपल्या विरोधात आहे. ते मनातील असुरक्षित भावनेचा परिपाक आहे. पण, ‘कर भला तर हो भला’ ही भावना आपल्याला या जगात आपली अशी सुरक्षित जागा देते. याशिवाय तुम्ही आगळेवेगळे आहात, याची जाणीव ठेवावी. दुसर्‍याचा आदर्श ठीक आहे, पण ते आपल्या अस्तित्वाचे प्रमाण झाले, तर कठीण आहे. मग असुरक्षित वाटणारच! दुसर्‍यामध्ये जे जे आपल्याला प्रभावी भासते, ते ते आपल्यात असेलच असे नाही, पण आपल्यात जे जे प्रभावी आहे, त्याचा अस्सल प्रभावही आपण विकसित केला पाहिजे. असुरक्षित वाटणे ही इतकी भयंकर गोष्ट नक्कीच नाही. तुम्हाला त्यातून प्रेरणादायी काम जर करता आले, तर असुरक्षिततेची भावना निश्चित भयप्राप्त नाही.
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
@@AUTHORINFO_V1@@