काळजी करू नका, सावध राहा!

    दिनांक  22-Feb-2021 22:15:43
|

kokan _1  H x W
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढताना दिसतो. त्यामुळे निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा हा अत्यंत घातक ठरु शकतो. तेव्हा, प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, या काळात नेमके काय करावे, काय करु नये, याची ही पुनश्च उजळणी...
 
 
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. २००३ मध्ये आढळलेला ‘सार्स’ हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला ‘मर्स’ हा आजार हेसुद्धा कोरोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत. परंतु, डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला ‘नॉवेल’ अर्थात ‘नवीन’ कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे.
 
 

कोरोनाचे मूळ स्थान
 
कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळांमध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इ. कारणांमुळे प्राणी जगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.
 

‘कोरोना’ची लक्षणे
 
ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे ‘इन्फ्लुएन्झा’ आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्यूमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे, अशी लक्षणे आढळतात.
‘कोरोना’मुळे होणारा आजार पसरतो कसा?

हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. याशिवाय खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात, अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक चोळण्याच्या सवयीमुळेदेखील हा आजार पसरू शकतो.
 
काय काळजी घ्यावी?
 
 
कोरोना किंवा श्वसनावाटे पसरणार्‍या स्वाईन फ्लू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे आरोग्यासाठी हिताचे आहे. श्वसन संस्थेचे विकार असणार्‍या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात वारंवार धुणे. खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत. खाली नमूद केलेल्या व्यक्तीने ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा - ताप, खोकला व श्वसनास त्रास होणार्‍या व्यक्ती. हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे, हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केला असल्यास. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे.
 
 

कोरोनाची लक्षणे
 
 
या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना श्वसनास त्रास होणे, अंगदुखी, घसा खवखवणे किंवा अतिसार असू शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू त्याची सुरुवात होते. बहुतेक लोकांमध्ये (सुमारे ८० टक्के) हा आजार सौम्य प्रकारचा असतो तसेच विशेष उपचार न घेताच स्वतःच्याप्रतिकारशक्तीने या आजारापासून ते बरे होतात.
 
एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसतानाही या आजाराचा प्रसार होऊ शकतो का? हा आजार पसरण्याचा मुख्य मार्ग म्हणजे श्वासोच्छवास (ज्या व्यक्तीला हा आजार आहे त्याच्या खोकल्यातून/शिंकण्यातून बाहेर पडणार्‍या थेंबातून हा आजार पसरला जातो). त्यामुळे मुळीच लक्षणे नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून हा आजार पसरण्याचा धोका खूप कमी आहे.
 
 

गंभीर आजार होण्याचा धोका कोणाला आहे?
 
 
वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारखे दीर्घ मुदतीचे आजार असणार्‍यांना गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.
 
 

वस्तूंवर, पृष्ठभागांवर विषाणू किती काळ टिकून राहतो?
 
 
या आजाराला कारणीभूत विषाणू पृष्ठभागावर किती काळ टिकतो हे निश्चित नाही. अभ्यासानुसार कोरोना विषाणू काही तास किंवा कित्येक दिवस पृष्ठभागावर चिकटून राहू शकतात. हे परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. (उदाहरणार्थ, पृष्ठभागाचा प्रकार, वातावरणाचे तापमान आणि आर्द्रता). जर आपल्याला असे वाटत असेल की, एखादा पृष्ठभाग संक्रमित झाला आहे, तर विषाणू नष्ट करण्यासाठी आणि स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्यासाठी साध्या जंतुनाशकाने तो पृष्ठभाग साफ करा, आपले हात साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुवा, आपले डोळे, तोंड किंवा नाक यास वारंवार स्पर्श करणे टाळा.
 
 
कोरोनापासून बचावासाठी हे करा..
 
 
आपले हात वारंवार स्वच्छ धुवा. नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा. नियमितपणे साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुतल्याने आपल्या हातावर असलेले विषाणू नष्ट होतात. स्वतःमध्ये आणि खोकणार्‍या किंवा शिंकणार्‍या व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटर (तीन फूट)चे अंतर ठेवा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून लहान द्रव थेंबावाटे फेकले जातात, ज्यात विषाणू असू शकतो. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या खूप जवळ असाल तर तो विषाणू तुमच्यादेखील शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते.
 
 
आपल्या हाताद्वारे बर्‍याचशा वस्तू, फर्निचर, हॅण्डल्स इ. ठिकाणी स्पर्श केला जातो. ज्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता असते. एकदा दूषित झाल्यास आपल्या हातावाटे ते विषाणू डोळे, नाक किंवा तोंडात शिरकाव करतात. मग तेथून विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करून आपण आजारी पडू शकतो. आपण आणि आपल्या सभोवतालच्या लोकांनी श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले तोंड किंवा नाक आपल्या हाताच्या तळव्यांनी किंवा टिश्यू पेपरने झाकावे. टिश्यू पेपर्सची त्वरित विल्हेवाट लावावी. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या.
 
हे करू नका...
 
 
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे. तुम्हाला ताप व खोकला यासारखी लक्षणे असताना इतरांशी निकटचा संपर्क ठेवणे. प्राण्यांशी थेट संपर्क तसेच कच्चे, अर्धवट शिजलेले अन्न खाणे. कत्तलखाने व उघड्यावर मांस असणार्‍या ठिकाणी जाणे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा...
 
राष्ट्रीय कॉलसेंटर क्रमांक- +९१-११-२३९७८०४६
 
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक-०२०-२६१२७३९४
 
टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक- १०४
 
 
कोरोना नियंत्रण कक्ष:-
 
सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री क्र. १०४ कोरोनाविषयक शंका-समाधानासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय संचालक, आरोग्यसेवा, पुणे कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथील संपर्क क्रमांक ०२०-२६१२७३९४ असून तो सकाळी ०८ ते रात्री १० या कालावधीत कार्यरत आहे. नवीन कोरोनाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहेत.


-  मनोज सानप


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.