‘कस्तुरबा’चे रुपडे पालटणार

22 Feb 2021 16:43:27

kasturaba hospital_1 



‘कोरोना’शी झुंजण्यासाठी नूतनीकरण


मुंबई: कोरोनामुळे प्रकाशामध्ये आलेल्या सातरस्ता येथील ‘कस्तुरबा’ रुग्णालयाचे आता रुपडे पालटणार आहे. विशेष रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी पालिका प्रशासनाने यंदा २६० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यामध्ये ‘कस्तुरबा’ रुग्णालयाचासुद्धा समावेश आहे. महालक्ष्मी सातरस्ता येथील हे रुग्णालय काविळ या आजारासह इतर सर्वच आजारांवर उपचारासाठी प्रसिद्ध असले तरी ते प्रकाशझोतामध्ये नव्हते. नुकताच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी विशेष दर्जा मिळाल्यानंतर या रुग्णालयाचा लौकिक वाढला. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना आणि संसर्गजन्य रोगांवर मात करण्यासाठी या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून नुकताच घेण्यात आला.
 
 
 
 
विशेष रुग्णालयांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये २६० कोटी रुपयांची तरतूद केली असून या तरतुदीतून ‘कस्तुरबा’ रुग्ण्यालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात या रुग्णालयाने शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले. अजूनही कोरोना संपलेला नाही. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने दुसर्‍या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणे कोरोना हा विषाणूजन्य आजार मुंबईकरांची पाठ सोडणार नाही की काय, असा प्रश्न सतावू लागला आहे. सर्गजन्य रोग वाढू लागतात तेव्हा हे रुग्णालय चर्चेत येते. आता कोरोना वाढल्यामुळे या रुग्णालयाची गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि या रुग्णालयातील अपुरी व्यवस्था ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ‘कस्तुरबा’ची रुग्णक्षमता आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
 
 
 
 
कोरोना महामारीच्या काळात बहुतांश उपनगरीय रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले. त्यामुळे ‘कस्तुरबा’ रुग्णालयावर कोरोनाचा अजूनही मोठा ताण कमी झालेला नाही. कोरोनाची आटोक्यात आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळेच विशेष रुग्णालय असलेले ‘कस्तुरबा’चे होणारे नूतनीकरण हे मुंबईकरांसाठी दिलासा देणारे ठरणार आहे.


Powered By Sangraha 9.0