मुंबईवर संकट - ५० किमी किनारपट्टीला धूप आणि पूराचा धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021
Total Views |

 mumbai coast _1 &nbs



जागतिक तापमान वाढ आणि समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईची किनारपट्टी धोक्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार मुंबई महानगराच्या २० टक्के किनारपट्टीला पुराचा अतितीव्र धोका आहे. दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरांना नियोजन शून्यतेचा सर्वाधिक तडाखा बसणार आहे.


 

समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन केलेल्या एका संशोधनामध्ये मुंबई महानगराच्या किनारपट्टीला असलेला धोका अधोरेखित झाला आहे. संशोधक मलयकुमार प्रामाणिक यांनी केलेल्या संशोधनानुसार 1976 ते 2015 दरम्यान जमिनीच्या उपयोगात झालेले बदल, दलदल, पाणीसाठे आणि कांदळवनांचा ऱ्हास करणाऱ्या अशाश्वत विकासामुळे मुंबई महानगरामधील सखल भाग समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे अतिसंवेदनशील बनला आहे. या संशोधनामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड, देशप्राण कॉलेज ऑफ टीचर्स एज्युकेशन, मेदिनीपूर, पश्चिम बंगाल आणि स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, भोपाळ या संस्थांमधील संशोधकांचा सहभाग होता. संशोधनासाठी मीरा-भाईंदरच्या उत्तरेपासून अलिबागच्या दक्षिणेपर्यंतची किनारपट्टी अभ्यासण्यात आली. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची विशेषतः दक्षिण आणि पूर्व उपनगरांची 50.75 किलोमीटरची किनारपट्टी अतिसंवेदनशील झाल्याचे समोर आले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम म्हणून भविष्यात या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा इशारा या अभ्यासाअंती देण्यात आला आहे. बोरिवली आणि अंधेरीसारखे भाग कमी संवेदनशील आहेत. तर गोराई (मुंबई), उत्तन, उरण आणि अलिबाग (रायगड) हे भाग मध्यम ते तीव्र संवेदनशील असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

 

कार्यपद्धती

मुंबईच्या किनारपट्टीची असुरक्षितता निश्चित करण्यासाठी संशोधकांनी 12 वेगवेगळ्या निकषांवर आधारित किनारपट्टीत होत गेलेले बदल अभ्यासले. त्यासाठी उच्च गुणवत्तेच्या उपग्रह चित्रांचा वापर करण्यात आला. असुरक्षिततेचे परिणाम मोजण्यासाठी तीन किलोमीटर लांबी-रुंदीच्या ग्रीड सेल्सच्या माध्यमातून मोजणी करण्यात आली. 1976 पासून 1990, 2002 आणि 2015 या काळातील किनारपट्टीमध्ये होत गेलेले बदल नोंदविण्यात आले.

 

संशोधनाचे महत्त्वाचे निष्कर्ष

संवेदनशीलतेच्या भूशास्त्रीय, भौतिक आणि सामाजिक-आर्थिक निकषांवर आधारलेल्या एकूण 12 निकषांवर मुंबईच्या एकूण 274.1 किलोमीटर किनारपट्टीपैकी 55.83 किलोमीटर किनारपट्टी अतिशय कमी संवेदनशील, 60.91 किलोमीटर मध्यम संवेदनशील, तर 50.75 किलोमीटर अतिशय संवेदनशील प्रकारात मोडते. या निष्कर्षांनुसार अशाश्वत शहरीकरण, नियोजनशून्य विकास आणि किनारपट्टीची झीज यामुळे दक्षिण आणि पूर्व मुंबई उपनगरे पुरासाठी जास्त संवेदनशील बनलेली आहेत.

 

 

पुरासाठी अतिसंवेदनशील भाग

पूर्व उपनगरे : कुर्ला, देवनार, शिवाजीनगर, ट्रॉम्बे कोळीवाडा, ठाणे खाडीचा पश्चिम भाग

उत्तर मुंबई - गोराई, मीरा-भाईंदर, अंधेरी पश्चिमचा काही भाग

दक्षिण मुंबई - कुलाबा, बीपीटी कॉलनी, कफ परेड, वरळी, दादर चौपाटी, गिरगाव

इतर भाग - नवी मुंबईचा काही भाग, उत्तन, उरण, अलिबाग, मुरुड

 

 

नियमांचे उल्लंघन आणि कमतरता

मुंबई उच्च न्यायालयाने 2005 साली कांदळवनांच्या अतिक्रमणांवर बंदी घालूनही प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी नाही. 1991 नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे ’सीआरझेड’ (किनारपट्टी नियमन विभाग) नियमांमध्ये शिथिलता आली आहे. दलदलीच्या जागेवर बांधकाम करण्यावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र, अजूनही ते थांबलेले नाही. त्यामुळे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो की, या क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुरेशी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे असुरक्षित लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

@@AUTHORINFO_V1@@