माझी आर्थिक परिस्थिती बिकट : मंदार देवस्थळी

    दिनांक  22-Feb-2021 17:49:23
|

Mandar Devasthali_1 
मुंबई : सध्या मराठीमधील छोट्या पडद्यावर मानधनावरून निर्माता विरुद्ध कलाकार व तंत्रज्ञ यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने एक पोस्ट करत प्रसिद्ध निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. यावर देवस्थळी यांनी भावनिक पोस्ट करत, "मी वाईट माणूस नाही, माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे." असे स्पष्टीकरण दिले आहे.
 
 
मराठी मालिकांमध्ये मंदार देवस्थळी हे निर्माता म्हणून मोठे नाव. यांच्यावर मानधन थकवल्याचा गंभीर आरोप केला. यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण देत लिहिले आहे की, "नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलत आहे. मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचे देणे थकले आहे. तुमचे म्हणणे योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात. पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे. मलाही खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे, आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही. पण, मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, फक्त मला थोडा वेळ हवा आहे." असे म्हंटले आहे.
 
 
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले होते की, "गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करत आहे. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकते. कृपया घाबरू नका. यावरही बोला." असे म्हणत त्यांच्यावर आरोप केले होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.