‘पीएफआय’ला ठेचण्याची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2021
Total Views |

agralekh_1  H x


पीएफआयच्या तथाकथित ‘एकता रॅली’सारखी एखादी रॅली हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केली तर? त्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनीच मुस्लीम वेषभूषा केली, त्यांच्या हाताला साखळदंडाने जखडले आणि रस्त्यावर मिरवत ‘जय श्रीराम’चे नारे दिले तर? त्याचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ‘इस्लामोफोबिया’चे प्रतीक मानत ‘एकता रॅली’ म्हणून कौतुक करणार का?


साधारणतः १०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश भारतात खिलाफतीच्या नावाखाली मलबारमधील हिंदूंचा इस्लामी कट्टरपंथीयांनी प्रचंड नरसंहार केला. धर्मांध जिहाद्यांच्या उन्मादात दहा हजारांपेक्षा अधिक निर्दोषहिंदूंची हत्या करण्यात आली, तर एक लाखांपेक्षा अधिक हिंदूंना आपले घरदार सोडून जीव आणि धर्मरक्षणासाठी पलायन करावे लागले. मात्र, स्वतंत्र भारतातील डाव्या इतिहासकारांनी हिंदूंविरोधातील केरळमधील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांचा हिंसाचार कधीही उघड होऊ दिला नाही, उलट त्याचे इंग्रजांविरोधातील क्रांतिकार्य म्हणत कौतुकच केले. आता पुन्हा एकदा धर्मांध जिहाद्यांनी मलबारमधील हिंदू नरसंहाराच्या शताब्दीपूर्तीनिमित्त आपल्या पूर्वसुरींच्याच कृत्याचे स्मरण केले आणि हिंदू धर्मीय तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अवमान केला.मलबारमधील हिंदू नरसंहाराचे महिमामंडन करताना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या इस्लामी कट्टरपंथी संघटनेने नुकतेच केरळच्या मलप्पूरम जिल्ह्यातील तेनियापलम शहरात एका रॅलीचे आयोजन केले आणि त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश परिधान केलेल्या व्यक्तींना साखळदंडाने जखडून गुन्हेगारासारखे मिरवले. त्याचीच एक ध्वनिचित्रफीत प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून समोर आली असून संघ गणवेश परिधान केलेल्यांच्या मागे इस्लामी जाळीदार गोल टोपी, लुंगी नेसलेले आणि हातात लाठ्या-काठ्या घेतलेले ‘पीएफआय’चे मूलतत्त्ववादी सदस्य ‘अल्लाह-हू-अकबर’, ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदूर रसुलल्लाह’ यासारख्या अनेक चिथावणीखोर घोषणा देताना दिसतात. तसेच दिखाव्यासाठी त्यात इंग्रजांच्या तत्कालीन गणवेशातील दोन व्यक्तींनाही सामील करून घेतले गेले, पण त्यांचे मुख्य लक्ष्य हिंदू धर्म व राष्ट्रीय स्वयंसेवक संघच होते. कारण, ‘पीएफआय’च्या आतापर्यंतच्या कारवायाच त्याची साक्ष देतात. सोबतच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे हिंदू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातील मनसुबे किती खतरनाक व द्वेषपूर्ण आहेत, याची झलकही यातून दिसते.



धक्कादायक म्हणजे, संघ गणवेश परिधान केलेल्यांना साखळदंडाने जखडून ठेवणे ‘फॅसिस्ट’वादाविरोधाचे प्रतीक असून रॅलीची संकल्पना एकतेवर आधारित होती. १९२१ साली खिलाफत आंदोलनात मुस्लिमांनी केलेल्या ब्रिटिशविरोधी कारवायांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही सदर रॅलीचे आयोजन केले. त्यामुळे या रॅलीला हिंदू वा संघविरोधी ठरवता येणार नाही, असे ‘पीएफआय’च्या रॅली आयोजकांचे म्हणणे आहे. मात्र, तसे असेल तर अशीच एखादी रॅली हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केली तर? त्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनीच मुस्लीम वेषभूषा केली, त्यांच्या हाताला साखळदंडाने जखडले आणि रस्त्यावर मिरवत ‘जय श्रीराम’चे नारे दिले तर? त्याचे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ‘इस्लामोफोबिया’चे प्रतीक मानत एकता रॅली म्हणून कौतुक करणार का? तर नाहीच, उलट आता एकता रॅलीची भंकस करणारी ‘पीएफआय’ त्यावेळी फतवा जारी करत संबंधित हिंदुत्ववाद्यांच्या कत्लेआमची धमकीच देईल आणि आज शिरखुर्म्याची गुळणी तोंडात धरून बसलेले तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष नि उदारमतवादी त्यावरून बेंबीच्या देठापासून हल्लागुल्ला करतील, हिंदुत्ववादी संघटनेला ‘फॅसिस्टवादी’ ठरवत राज्य, देशापासून जगभर ‘इस्लाम खतरे में’ची बांग ठोकत बोंबाबोंब करतील. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे महासचिव अनिस अहमद यांनी सदर रॅली ब्रिटिशविरोधी मोपला क्रांतीशी निगडित असल्याचे म्हटले, जी सरळ सरळ बनवेगिरी आहे. कारण, इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी इंग्रजांविरोधात नव्हे तर हिंदूंविरोधातच तेव्हाही रक्तरंजित हिंसाचार केला होता व त्याचे वर्णन अ‍ॅनी बेझंट यांच्या ‘दी फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘पाकिस्तान’ किंवा ‘पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात केलेले आहे. स्वधर्माचा त्याग न करणार्‍या हिंदूंवर अत्याचार झाले, त्यांना मारझोड केली गेली, त्यांची घरेदारे लुटली, एक लाखांपेक्षा अधिक हिंदूंना पळून जावे लागले. हिंदूंविरोधात मोपल्यांनी केलेला अत्याचार शब्दांत मांडता न येण्याइतका भयानक होता, असा आशय दोघांच्याही लेखनातून समोर येतो. पण हिंदूंवरील तत्कालीन अन्यायाचा सिलसिला तिथेच थांबला नाही तर आजही त्या हिंदू नरसंहाराचा स्मृतिदिन इस्लामी मूलतत्त्ववाद्यांकडून एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. आणि तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी नेते त्या घटनेचा उल्लेख केरळी इतिहासातील गौरवशाली भाग म्हणून करतात.

दरम्यान, अनिस अहमद यांनी गुरुवारीच कर्नाटकात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘कॅन्सर’ ठरवले होते आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी कोणीही देणगी देऊ नये, असे आवाहन केले होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची हिंदू आणि राष्ट्रविरोधी कृत्ये याआधी अनेकदा उजेडात आली होती. नुकतीच उत्तर प्रदेशात ‘पीएफआय’च्या दोघा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व वसंत पंचमीला हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ल्याचा त्यांचा डाव होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या मते, ‘पीएफआय’ला राज्यात प्रशिक्षण केंद्रे सुरू करायची आहेत. दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतही ‘पीएफआय’चा हात होता आणि ‘पीएफआय’वर २०१९च्या शाहीनबागेतील बुरख्यावाल्या अम्मी-फुफीच्या धरणेप्रदर्शनाला आर्थिक रसद पुरवल्याचाही आरोप आहे. सध्या डाव्या सरकारच्या आशीर्वादाखाली ‘पीएफआय’ने केरळला आपला बालेकिल्ला केला असून संघटना देशातील २३ राज्यांत पोहोचली आहे. मध्यंतरी एका इंग्रजी दैनिकाने ‘पीएफआय’ संघटना कुख्यात ‘इस्लामिक स्टेट’ म्हणजे ‘इसिस’साठी काम करत असल्याचे वृत्त दिले होते, तर मे २०१९ मध्ये भारतीय गुप्तचर संस्थांनी ‘पीएफआय’च्या वेगवेगळ्या कार्यालयांवर छापे टाकले होते.

इतकेच नव्हे, तर श्रीलंकेत ‘इस्टर संडे’ला चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सहभागींच्या ‘ब्रेनवॉश’चे काम ‘पीएफआय’ने केल्याचाही आरोप करण्यात आला होता. केरळमधील शेकडो राजकीय, सामाजिक, धार्मिक व संघ नेत्यांच्या हत्या, धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांत ‘पीएफआय’चे नाव आले होते. महत्त्वाचे म्हणजे ‘स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेशी ‘पीएफआय’चे संबंध असून ‘सिमी’चे अनेक कार्यकर्ते आता ‘पीएफआय’मध्ये काम करत आहेत. ‘पीएफआय’चा विद्यमान राष्ट्रीय महासचिव अब्दुल रहमान त्याआधी ‘सिमी’चा राष्ट्रीय सचिव होता तर केरळचा राज्य सचिव अब्दुल हमीद २००१ साली ‘सिमी’मध्ये याच पदावर होता. अशी कितीतरी उदाहरणे आहेत, ज्यावरून ‘पीएफआय’ कोणत्याही दहशतवादी संघटनेपेक्षा भिन्न नाही, हे स्पष्ट होते. आता ‘पीएफआय’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील सदस्यांना साखळदंडाने बांधून त्यांना मिरवत नेले, त्यावरून आम्ही आम्हाला हवे तेव्हा, हव्या त्या ठिकाणी हिंदूंना किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना बंदी बनवू शकतो, असेच ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला सांगायचे आहे. आगामी काळात केरळमध्ये विधानसभा निवडणुकाही होऊ घातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ‘पीएफआय’ मर्जीतल्या नेते-पक्षांसाठी हिंसाचारही माजवू शकते. ते पाहता आता केंद्र सरकारनेच त्वरित कार्यवाही करत ‘पीएफआय’वर बंदी घालत तिला ठेचले पाहिजे, जेणेकरुन तिच्या नापाक कृत्यांना बळ मिळणार नाही, ते प्रत्यक्षात येऊ शकणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@