यंदा ज्येष्ठ वैज्ञानिक, विज्ञान साहित्यिक अध्यक्ष आहेत. तेव्हा ते काय बोलतील, काय स्वीकारतील, काय नाकारतील, ते ऐकण्यास, बघण्यास, बरेच जण उत्सुक आहेत. माणसाच्या पारंपरिक श्रद्धा अन् त्याचे तार्किक, बौद्धिक वागणे यातील संघर्ष फार जुना आहे. आपल्याला पटो वा न पटो, अनेक गोष्टी, सुशिक्षित म्हणवणारे देखील घरच्यांची मर्जी राखण्यासाठी, वाडवडिलांना मान देण्यासाठी करतात. नास्तिक असणे, अडतिक असणे, मूर्तिपूजा मानणे, न मानणे, वैज्ञानिक संकल्पनांवर पूर्ण विश्वास ठेवून, वेद, पुराणातील, धर्मग्रंथातील विवेचनाला भाकडकथा संबोधणे, हा समाजातील संघर्ष वर्षानुवर्षे चालत आलाय. अगदी पाश्चात्त्य वैज्ञानिकांचीही या संघर्षातून सुटका झालेली नाहीय. सगळेच विचार वैज्ञानिक, गणिती कसोटीवरच तपासायचे का? आपल्या श्रद्धा, आपल्या सांस्कृतिक परंपरा, चालीरीती पूर्णपणे नाकारायच्या का, हे वादाचेच विषय राहिलेत.
यंदाच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य हे की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. डॉ. जयंत नारळीकर हे उत्तम नावाजलेले विज्ञान कथा लेखकही आहेत. त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तकदेखील मराठीत चांगले गाजले आहे. आधीचा इतिहास बघता याही वर्षी ‘गाजणे’, ‘वाजणे’ ही प्रक्रिया ‘मागील अंकावरून पुढे चालू’ या नियमानुसार पुढे चालू ठेवली आहे. आधी, दिल्ली की नाशिक, हा जागेचा वाद झाला. मीडियातून गाजला किंवा गाजवला गेला! सुदैवाने तो धुराळा लवकरच शमला. दिल्लीवाल्यांनी फार ताणून धरले नाही, त्यामुळे प्रकरण लवकर मिटले. नंतर अध्यक्षपदाची निवड. त्यामध्ये काही नावांची स्वाभाविक चर्चा झाली. पण, डॉ. नारळीकर यांचे नाव पुढे येताच विरोध फारसा टोकाला गेला नाही. आता डॉ. नारळीकरांची निवड झाल्यावर जे परिचयपर किंवा अभिनंदनपर लेख प्रसिद्ध झाले, त्यात एक विषय, मुद्दा कॉमन आहे. तो म्हणजे साहित्यातील, परंपरेतील विज्ञानवादी भूमिका. श्रद्धा, निष्ठा, परंपरा आणि बौद्धिक, वैज्ञानिक, तार्किक दृष्टिकोन यात नेहमीच गल्लत झालेली आपण बघतो. मध्यंतरी व्यासपीठावरील सरस्वती पूजेच्या निमित्ताने पुरस्कार नाकारल्याचे प्रकरण गाजले. तेव्हाही हा श्रद्धा, परंपरा, तात्त्विक दृष्टिकोन या विषयावर दोन्ही पक्षी धुराळा उडाल्याचे आपण पाहिलेच.
मध्यंतरी नाशिक साहित्य संमेलनाच्या मंडपाला कवी कुसुमाग्रज यांचे नाव द्यायचे की, स्वा. सावरकर यांचे नाव द्यायचे, यावरही वाद झाल्याचे आपण पाहिले. या दोन्ही व्यक्तींची महती वादातीत. आपापल्या क्षेत्रात त्यांचे योगदान आकाशाला भिडणारे. पण, कुठेतरी सुवर्णमध्य गाठून सामंजस्य दाखवायलाच पाहिजे ना दोन्ही पक्षी? साहित्य संमेलनात राजकारणी मंडळींचा शिरकाव, त्यांची लुडबुड, त्यांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व हाही नेहमीचा चर्चेचा, वादाचा विषय. आजकाल साहित्य संमेलनाचे सोहळे, त्यांना उत्सवी स्वरूप दिले गेल्याने फार खर्चिक झाले आहेत. दोन अडीच दिवसांचा खर्च कोटींच्या घरात! एवढे पैसे आणायचे कुठून, जमवायचे कुणी? बरे इतका अवाढव्य खर्च करून कुणाच्या हाती काय लागते, हा मुद्दा कचर्याच्या टोपलीत.
साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट काय, ते कुठल्या कार्यक्रमाने, प्रयोगाने साध्य होते, वाचन संस्कृती जोपासण्याचे, भाषा संवर्धनाचे काय, साहित्याच्या नव्या दिशा कोणत्या, लेखक, संपादक, प्रकाशक यांच्या व्यवहाराच्या गणिताचे काय, अडचणीचे काय, त्या कशा सोडवायच्या, प्रत्येकाच्या ‘विन विन सिच्युएशन’साठी काय करायचे, कुणी पुढाकार घ्यायचा, साहित्य अन् राजकारण, साहित्य अन् समाज, साहित्य अन् परंपरा, साहित्य अन् विज्ञान, साहित्य अन् नैतिकता यातील परस्पर संबंध कसे जोपासायचे, फुलवायचे... या प्रश्नांची चर्चा फार कमी. तेच ते चेहरे, तेच ते परिसंवाद, तेच ते कवी, तेच ते पुढारी (मुखवटे बदललेले), असा सगळा मिरवण्याचा, ‘इमेज बिल्डिंग’चा कंटाळवाणा प्रकार पाहतो आपण दरवर्षी. साहित्य संमेलनाने कुणाला काय दिले, या विषयावर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठात ‘पीएच.डी.’चे गंभीर संशोधन व्हावे. सत्य बाहेर येण्यासाठी. पण, आजकालच्या ‘पीएच.डी.’ प्रबंधाचा दर्जा बघता ती शक्यता कमीच दिसते. तिथेही आशेला जागा नाहीच.
सोहळ्याला पैसा लागतो अन् पैसा राजकारणीच गोळा करू शकतात. एवढे साधे समीकरण लक्षात घेतले, तरी या पुढार्याचा व्यासपीठावरील वावर मान्य करावाच लागतो. तसेही या पैशाचा, अनुदानाचा विनियोग, हिशेब, ऑडिट हे गौडबंगालच असते. ज्याने काहीच योगदान दिले नाही, त्याला प्रश्न विचारण्याचा हक्क नसतो. बौद्धिक, तात्त्विक चर्चा, वर्षभराचे विधायक नियोजन, त्यासाठीचे प्रयोजन अशा खर्या अर्थाने संस्कृती संवर्धनाचे कुणाला कसलेही सोयरसुतक नसते. उत्सवी बडेजाव, व्यक्तिगत, राजकीय ‘इमेज बिल्डिंग’ यालाच प्राधान्य. सगळी जाहिरात बाजी! हे जे आहे ते कुणालाच शक्य नाही हे कटू सत्य आपण पचवले पाहिजे.
अगदी मुख्य संमेलनाला समांतर अशी विरोधी, विद्रोही संमेलने होतात, तिथेही थोड्या-फार फरकाने हेच चित्र दिसते. संहिता तीच, पात्रे वेगळी हाच काय तो फरक, अशी एकापेक्षा जास्त संमेलने राज्यात, देशाच्या विविध भागांत होणे हीदेखील काळाची गरज आहे. फक्त ती विशिष्ट रंगाचा, पक्षाचा, वर्गाचा झेंडा उभारणारी, भिंती उभारणारी नको, तर सामंजस्यांचा पूल बांधणारी हवीत. काही महिन्यांपूर्वी भर कोरोनाकाळात अनेक देशांच्या अनेक मराठीप्रेमी मंडळींनी आयोजित केलेले डिजिटल विश्व मराठी संमेलन हा नावीन्यपूर्ण नियोजनाचा उत्कृष्ट यशस्वी दर्जेदार प्रयोग होता. अजूनही भारतातील बहुसंख्य समाजवर्ग गावात, खेड्यात आहेत, शहरात नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. साहित्यिक भूक खेडेगावालाही असते, फक्त शहरालाच असते, असे नाही.
यंदा ज्येष्ठ वैज्ञानिक, विज्ञान साहित्यिक अध्यक्ष आहेत. तेव्हा ते काय बोलतील, काय स्वीकारतील, काय नाकारतील, ते ऐकण्यास, बघण्यास, बरेच जण उत्सुक आहेत. माणसाच्या पारंपरिक श्रद्धा अन् त्याचे तार्किक, बौद्धिक वागणे यातील संघर्ष फार जुना आहे. आपल्याला पटो वा न पटो, अनेक गोष्टी, सुशिक्षित म्हणवणारे देखील घरच्यांची मर्जी राखण्यासाठी, वाडवडिलांना मान देण्यासाठी करतात. नास्तिक असणे, अडतिक असणे, मूर्तिपूजा मानणे, न मानणे, वैज्ञानिक संकल्पनांवर पूर्ण विश्वास ठेवून, वेद, पुराणातील, धर्मग्रंथातील विवेचनाला भाकडकथा संबोधणे, हा समाजातील संघर्ष वर्षानुवर्षे चालत आलाय. अगदी पाश्चात्त्य वैज्ञानिकांचीही या संघर्षातून सुटका झालेली नाहीय. सगळेच विचार वैज्ञानिक, गणिती कसोटीवरच तपासायचे का? आपल्या श्रद्धा, आपल्या सांस्कृतिक परंपरा, चालीरीती पूर्णपणे नाकारायच्या का, हे वादाचेच विषय राहिलेत.
गेली काही वर्षे दर जानेवारीत भरणार्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत (इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस)देखील वादग्रस्त विधाने झाली आहेत. त्यामुळे तात्पुरता गोंधळ उडालाय. काही विज्ञान प्रयोगशाळेत, मुहूर्त, नारळ, पूजा हे प्रयोग विज्ञानाच्या जोडीने होताहेत. अगदी ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त जागतिक दर्जाचे श्रेष्ठ वैज्ञानिक बाबा, बुवांच्या चरणी लीन झालेले आपण पाहिले आहेत. त्यामुळे कशाला मान्यता द्यायची, कशाला नावे ठेवायची, काय स्वीकारायचे, काय नाकारायचे, काय खरे मानायचे, काय खोटे, हे निर्णय तडकाफडकी निकाल लावण्यासारखे नाहीतच. कोणताही देश असो, तो फक्त विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पायावरच उभा असतो असे नाही. प्रत्येक देशाला, समाजवर्गाला एक भरभक्कम पूर्वापार चालत आलेली सांस्कृतिक, धार्मिक परंपराही लाभलेली असते. ती एकदम दूर सारणे, अव्हेरणे, डावलणे, वाटते तितके सोपे नसते. चर्चा-वाद अवश्य व्हावेत. त्यातून सर्वमान्य काय ते टिकेल. काही गोष्टी काळाच्या ओघात मागे राहतील. तळाशी जातील. पण, कालौघात त्या पुन्हा उसळून वरही येतील. समाजातील हे घर्षण सातत्याने चालूच राहील.
शेवटी मनाचे सामंजस्य महत्त्वाचे.सर्वांना विश्वासात घेऊन एकत्रित पुढे जाणे महत्त्वाचे. या सांस्कृतिक संवर्धन विकासाच्या जडणघडणाच्या प्रवासात प्रत्येकाचे स्टेशन वेगळे असेल. आपण कुठे जायचे (स्टेशनाला) याला महत्त्व देण्यापेक्षा कसे जायचे (प्रवासाला), महत्त्व दिले तर साहित्य संमेलनच काय इतर सारे सांस्कृतिक सोहळे आनंददायी ठरतील. सामाजिक आरोग्यासाठी तेच हितकारक आहे अन् आता तर देशातच नव्हे तर जगात आरोग्याला नको तितके महत्त्व आले आहे!
- डॉ. विजय पांढरीपांडे