भारताच्या इतिहासात लहुजी वस्ताद यांचे स्थान अनन्यसाधारण : दादा इदाते

    दिनांक  20-Feb-2021 19:15:05
|

dada_1  H x W:
 
 
 
 


नवी दिल्ली : लहुजी वस्ताद साळवे यांचे भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले या इतिहास घडविणाऱ्यांना लहुजींनीच मार्गदर्शन केले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटके व अर्धभटके कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी शनिवारी केले.
 
 
 
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे विचारपीठातर्फे दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात आयोजित लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर, भाजप राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष लालसिंह आर्य, कार्यक्रमाचे आयोजक आनंद शिंदे आणि जेएनयूमधील प्राध्यापक डॉ. बी. एस. वाघमारे उपस्थित होते.
 
 
भारताच्या इतिहासात लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतिशय अनन्यसाधारण आहे. त्यांचा उल्लेख 'आद्यक्रांतीगुरू' असे संबोधले जाते. कारण वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या इतिहास घडविणाऱ्या कार्याची प्रेरणा लहुजींनीच त्यांना दिली होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांची प्रेरणा लाभली आहे, हे इतिहासात ठळकपणे पुढे आले आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीमध्ये लहुजींची पुण्यतिथीचा कार्यक्रम होणे ही महत्वाची घटना असल्याचे इदाते म्हणाले.
 
 
भटके, अर्धभटके आणि दलित समाजाने देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिल्याचे इदाते यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतावर परकीय आक्रमण होत असताना देव, देश आणि धर्म जिवंत ठेवण्याचे काम भटक्या समाजाने केले आहे. त्याच पंक्तीत लहुजींचे कार्य आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यावर संशोधन होऊन त्यावर समग्र लिखाण होणे आवश्यक असल्याचेही इदाते यांनी यावेळी नमूद केले.
 
 
लहुजींचे कार्य दीर्घकाळ अज्ञात राहिले. त्यामुळे त्यांचे कार्य आता देशासमोर येणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत प्रथमच असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यापुढेही लहुजींचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे यांनी केले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.