उच्च शिक्षितही दहशत आणि हिंसा पसरविण्यात आघाडीवर

    दिनांक  20-Feb-2021 11:44:53
|

narendra modi_1 &nbsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

नवी दिल्ली: “एकीकडे उच्च शिक्षित आणि कुशल लोक कोरोनासारख्या महामारीविरोधात लढा देऊन सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे जगात दहशत आणि हिंसा पसरविण्याचे काम करण्यातही उच्च शिक्षित लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा विचारसरणींविषयी आता गंभीर विचार करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १९ फेबु्रवारी रोजी केले. पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.
 
 
 
“तुमचे ज्ञान, कौशल्य, शिक्षण हे समाजाला आणि राष्ट्राला गौरव प्राप्त करून देत असते. त्याचप्रमाणे समाजाला उद्ध्वस्त करणे आणि बदनामीच्या गर्तेत ढकलण्याचेही काम त्याद्वारे केले जाते. एकीकडे उच्च शिक्षित आणि कुशल मंडळी सध्या आपला जीव धोक्यात घालून जगाला कोरोना महामारीपासून वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत, तर दुसरीकडे काही उच्च शिक्षित मंडळी जगभरात दहशत आणि हिंसा पसरविण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या विचारसरणीकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
 
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या विद्यापीठाला ‘विश्वभारती’ म्हणजे ‘जागतिक विद्यापीठ’ असे नाव दिले. कारण, विश्वभारती विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येणारी व्यक्ती भारत आणि भारतीयत्वाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहील, अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच त्यांनी विश्वभारती हे शिक्षणासाठीचे असे स्थान निर्माण केले, ज्याकडे भारताचा समृद्ध वारसा म्हणून पाहता येईल. भारतीय संस्कृती आत्मसात करून त्यावर संशोधन करून गोर-गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.