‘नवऔरंग्यां’ना उलथवण्याची शपथ

    दिनांक  19-Feb-2021 21:18:07
|

ShivJayanti_1  
 
 
 
 
औरंगजेबाने कितीही मस्ती दाखवली, तरी त्याच्या पातशाहीला सुरुंग लावणारी मराठी माती आणि मराठी माणसेच होती आणि आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरच राज्यातील शिवप्रेमींच्या दबावाखातर वशाटोत्सव रद्द करण्याच्या नामुष्कीतून त्यावर शिक्कामोर्तब झालेच.
 
 
 
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासह पाचही इस्लामी पातशाह्यांना धूळ चारून हिंदू साम्राज्याची संस्थापना केली. त्याच शिवरायांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तो हिंदवी साम्राज्य स्थापन करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करणारा दिवस असतो, तसाच त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आताच्या पिढीलाही प्रेरणा मिळावी, हादेखील त्यामागचा उद्देश असतो. तथापि, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या रुपात ‘नवऔरंग्या’चे सरकार सत्तेत आल्याने त्यांनी कोरोनाची भीती दाखवत यंदाच्या शिवजयंती दिनी सर्वप्रकारच्या उत्साही जल्लोषावर बंदी घातली. शिवाजीराजांचे नाव लावून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या शिवसेनेने त्यांच्याच जयंतीच्या पार्श्वभूमीवर तमाम शिवभक्तांच्या माथी निर्बंधांचे परिपत्रक मारले आणि राज्यात मोगलाई अवतरल्यावर शिक्कामोर्तब केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससारख्या स्वधर्म-स्वसंस्कृतीबद्दल आस्था नसणाऱ्या पक्षांची साथसंगत असल्यावर असेच होणार म्हणा, हिंदुत्ववादी प्रतिमा बाळगणारी शिवसेनादेखील ‘जनाबसेने’प्रमाणेच वागणार! पण, शिवजयंतीला सर्वप्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभात फेरी, बाईक रॅली, पोवाडे, नाटक, मिरवणुकांना परवानगी नाकारणाऱ्या ठाकरे सरकारने त्याच्याच दुसऱ्या दिवशी पुण्यातील चांदणी लॉन्समध्ये होणाऱ्या वशाटोत्सवाला आधी उदार मनाने मंजुरीही दिली. पण, नंतर त्यावर सर्वच स्तरातून खरमरीत टीका होताच, लगेच ‘साहेबांच्या सूचनेनुसार’ वशाटोत्सव पुढे ढकलण्याची आयोजकांवर नामुष्कीही ओढवली.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलला, त्या शिवनेरी आणि राज्याभिषेक झाला, त्या किल्ले रायगडावर शिवभक्तांनी एकत्र येऊ नये म्हणून जमावबंदीचे ‘कलम १४४’ लावणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वातील राज्यकारभाऱ्यांनी खादाडखाऊंना मात्र बोकडाचे मटण हादडण्यासाठी मोकाट सोडले होते. अर्थातच, शिवसेनेचा हा शिवद्रोही आणि हिंदुद्रोही निर्णय होता. कारण, त्यांच्याच म्होरक्याच्या संमतीने शिवजयंतीवर बंधने आणि वशाटोत्सवावर खैरातीच्या निर्णयाचा शिवभक्तांनाही चांगलाच समाचार घेतला आणि अखेरीस आयोजकांना माघार घ्यावीच लागली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा ऐन कोरोना काळात आरोग्य व्यवस्था राखण्यात पुरता बोजवारा उडाला होता आणि आताही त्यांच्याच ढिसाळ नियोजनामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाप्रसार वाढू नये म्हणून काळजी घेणे ठीकच, पण वशाटोत्सव जोरात आणि जोशात साजरा करण्यासाठी आधी परवानगी द्यायची, तर फक्त शिवरायांच्या जयंतीवरच निर्बंध का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. तत्पूर्वी, ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असताना राज्यातल्या ठाकरे सरकारने चक्क ‘ईद-ए-मिलाद’ला प्रतीकात्मक स्वरुपातील ‘खिलाफत हाऊस’मध्ये मिरवणुकीची परवानगी दिली होती. म्हणजे, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ‘ईद-ए-मिलाद’ आपली वाटली, तर शिवजयंती परकी! तसेच त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिमांना बकरी ईदची कुर्बानी आनंदाने देता यावी म्हणून मध्यस्थी करत राज्य सरकारने घातलेल्या बंधनांत शिथीलता मिळवली होती व ठाकरेंनी ती दिलीही होती. पण, त्यावेळी कोरोना फैलावेल, याची चिंता सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना नव्हती का? राज्य सरकारचे मार्गदर्शक असलेल्या पवारांनी बकरी ईदवेळी मुस्लिमांच्या भावना जपण्यासाठी तरफदारी केली, तशी शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनीही निर्बंधांत सवलतीसाठी मध्यस्थीची आठवण त्यांना झाली नाही का, हाही प्रश्न आहेच. त्यानंतर हिंदूंविरोधात विषवमन करणाऱ्या ‘एल्गार परिषदे’लाही ठाकरे सरकारने बंधनांशिवाय मंजुरी दिली होती. तेव्हाही शिवसेना, काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसला कोरोना पसरण्याची चिंता वाटत नव्हती. इतकेच नव्हे, तर बाळासाहेब ठाकरेंच्या फोर्टमधील पुतळ्याचे अनावरणही भरघोस गर्दीत करण्यात आले, शरद पवारांच्या वाढदिवसाचा केकही मोठ्या जमावाच्या उपस्थितीत कापण्यात आला, पवारांनी आझाद मैदानावरील शेकडोंच्या शेतकरी मेळाव्यातही जोरदार भाषणबाजी केली, तसेच बाळासाहेब थोरातांपासून नाना पटोलेंपर्यंत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारविरोधात मोर्चे काढले, त्यावर कधी गर्दीचे निर्बंध घातलेले नव्हते. मग अशी बंधने केवळ शिवजयंतीवरच का?
 
 
शनिवार, दि. २० फेब्रुवारी रोजी पुण्यात वशाटोत्सवात सामील होण्यासाठी ६०० पेक्षा अधिक जणांनी नाव नोंदणीही केली होती. आयोजकांनी आता संबंधितांना प्रवेशशुल्क परत करण्याची घोषणाही केली. पण, वशाटोत्सवाला ६०० लोक चालले असते, पण १०० पेक्षा अधिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता येणार नाही, असा फतवा काढणाऱ्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांपासून प्रवक्ते आणि पक्षाध्यक्षांपर्यंत सारेच या वशाटोत्सवात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हजर राहणार होते. सारी प्रजा प्रत्यक्षात जमणार होती ती ‘वशाटा’साठीच. त्यात खासदार शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ‘पाळीव पत्रकारां’चाही समावेश होताच. मात्र, ही सगळी मंडळी जमली असती तर कोरोनाचा प्रसार झाला नसता का? शिवजयंतीला १०० शिवभक्त एकत्र आले, तर कोरोना झेप घेऊन त्यांना बाधतो आणि मटणावर ताव मारण्यासाठी शेकडोने सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेते जमले असते, तर कोरोनाने शेपूट घातली असती, असे काही आहे का?
 
 
विशेष म्हणजे, आव्हाड, मुंडे, थोरात, राऊतांसारख्या अन्य नेते वा मंत्र्यांचे सोडा, पण शरद पवारांसारखे नेतृत्वही वशाटोत्सवाला हजेरी लावणार होते, हे आश्चर्यच! कारण, त्यांचे ट्विटर खाते चाळले की, तिथे ‘कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आल्यानंतरही तुम्ही कुठे जात आहात हे तपासून बघा. घरात राहा, सुरक्षित राहा,’ असे उपदेशाचे डोस दिल्याचे दिसतात. पण, तेच डोस स्वतः पवारांना आधीच घ्यावेसे वाटले नाहीत का? आपण जनतेला जे नियम पाळायला सांगतो, सुरक्षेची काळजी घ्यायला सांगतो, ते शरद पवारांना वशाटोत्सवाला होकार देण्यापूर्वी का बरं सुचले नाही? म्हणजेच स्वतः कोणतेही नियम न पाळता कोरोना प्रसार होईल, अशा धोक्याच्या ठिकाणीही शेकडोंची गर्दी जमवायला आधी परवानगी द्यायची, पण शिवजयंतीला मात्र शिवभक्तांनी जल्लोष करायचा नाही, शिवशाहीर हेमंतराजे मावळे यांच्यासारख्या एखाद्या शिवभक्ताने तसे केल्यास त्यांनाच अटक करायची, असा हा पवारांच्या आशीर्वादाने चाललेल्या ठाकरे सरकारचा हिंदूद्रोही नि शिवद्रोही कारभार! मात्र, औरंगजेबाने कितीही मस्ती दाखवली तरी त्याच्या पातशाहीला सुरुंग लावणारी मराठी माती आणि मराठी माणसेच होती आणि आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरच राज्यातील शिवप्रेमींच्या दबावाखातर वशाटोत्सव रद्द करण्याच्या नामुष्कीतून त्यावर शिक्कामोर्तब झालेच. कारण, मटण खाण्यासाठी आधी वशाटोत्सवाला मंजुरी देत शिवजयंतीवर बंधने घालणाऱ्या, शिवनेरी व रायगडावरील जल्लोषावर निर्बंध आणणाऱ्या, औरंगजेबाच्या रुपातील ठाकरे सरकारला उलथवण्याची शपथ इथल्या प्रत्येक शिवभक्ताने शिवजयंतीला घेतली आणि त्यामुळेच वशाटोत्सवाचा गाशा आयोजकांना गुपचूप गुंडाळावा लागला.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.