विनामास्क कारवाईसाठी ‘लोकल’मध्ये ‘मार्शल’ नेमणार!

18 Feb 2021 12:51:52

local train_1  


निष्काळजीपणे विनामास्क फिरणार्‍यांवर होणार कारवाई


मुंबई: कोरोनाचा धोका कायम असतानाही लोकलमध्ये निष्काळजीपणे विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘मार्शल’ नेमण्यात येणार आहेत. कोरोना आटोक्यात येत आहे, असे दिसत असले तरी धोका कायम आहे. पालिका प्रशासनातर्फे तशी वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे.
 
 
तरीही लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणार्‍यांची संख्या वाढल्याने कोरोनाचा धोका वाढत असल्याने पालिकेतर्फे लोकलमध्ये विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी ‘मार्शल’ नेमण्यात येणार आहेत. सदर १०० ‘मार्शल’ची नियुक्ती एजन्सीच्या माध्यमातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गांवर केली जाणार आहे. या कारवाईदरम्यान मास्क नसल्यास प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
 
 
 
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. दि. १ फेब्रुवारीपासून लोकल सुरू झाल्यानंतर १० दिवसांनंतर रुग्णवाढ दिसू लागल्याने पालिका सतर्क झाली. साडेतीनशेपर्यंत घसरलेली रुग्णसंख्या सहाशेपर्यंत वाढताना दिसते आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क प्रभावी असताना नागरिकांकडून त्याबाबत हलगर्जीपणा होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर ‘मार्शल’ची नेमणूक करून येत्या दोन दिवसांनंतर कार्यवाही होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.




Powered By Sangraha 9.0