दि. १९ फेब्रुवारी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्रजी तारखेनुसार जयंती. दरवर्षी ढोल-ताशांच्या गजरात आपण सर्वच शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची शैली कशी होती, राज्यकारभाराची प्रणाली कशी होती, राज्यकारभाराची सुसूत्रता कशी होती, याची माहिती फारशी पुढे येत नाही. आजच्या लेखातून त्याची माहिती घेऊया...
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगी स्फुरण चढत नाही, असा मराठी माणूस शोधूनही सापडायचा नाही. जेव्हा अखंड हिंदुस्थानात सुलतानी धुमाकूळ चालला होता तेव्हा अंधारात प्रकाशाची एक शलाका तेजःपुंज व्हावी, तद्वत महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्रराज्य या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य शिवप्रभूंनी केले. सुलतानी अंमलातून रयतेला आधार देणे, हे शिवाजी महाराजांनी आपले आद्यकर्तव्य मानले त्यासोबतच इथे एक उत्तम शासनव्यवस्था निर्माण केली किंवा आधीची शासनव्यवस्था सुधारली, असेही म्हणता येईल. महाराजांचा राज्याभिषेक होणे, हे अनेक ग्रंथांच्या रचनेसाठी निमित्त ठरले. पण यासोबतच महाराजांनी स्वराज्यातील मंत्रिमंडळाची कामेही निश्चित करून दिली. याचा अर्थ असा नक्कीच नाही की राज्याभिषेकापूर्वी मंत्री ही कामे करत नव्हते, पण राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी लिखित स्वरूपात ही नियमावली तयार करवून घेतली. थोडक्यात, आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स’ अथवा आपण ज्याला ’SOP’ म्हणतो, अशा प्रकारचे हे नियम होते. याला एक सुंदर नाव देण्यात आलं ते म्हणजे ‘कानूनजाबिता.’ या ‘कानूनजाबित्या’मध्ये वास्तविक अष्टप्रधानांपासून ते अगदी गडावरच्या सबनीस-कारखानिसांनी काय काय कामे करायची, हे स्पष्ट वर्णित केलेले आहे. परंतु, आज आपण त्यातील केवळ पहिल्या भागाविषयी, अष्टप्रधान मंडळ आणि त्यांच्या कामकाजासंबंधी माहिती घेणार आहोत.
सर्वप्रथम महाराजांनी रघुनाथपंत हणमंते आणि धुंडिराज व्यासांकडून ‘राज्यव्यवहारकोष’ लिहून घेतला, ज्यात तत्कालीन रूढ फारसी शब्दांना संस्कृतप्रचुर मराठी प्रतिशब्द देण्यात आले. यात अष्टप्रधानांचीही मूळ फारसी नावे बदलून त्यांना शुद्ध मराठी नावे देण्यात आली. उदाहरणार्थ : ‘पेशवे’ म्हणजे ‘मुख्य प्रधान’, ‘सरनोबत’ म्हणजे ‘सेनापती’, ‘मुजुमदार’ म्हणजे ‘अमात्य’, ‘डबीर’ म्हणजे ‘सुमंत’, ‘सुरनिस’ म्हणजे ‘सचिव’, ‘वाकनिस’ म्हणजे ‘मंत्री’, ‘काझी’ म्हणजे ‘न्यायाधीश’ आणि आठवं पद हे ‘पंडितराव’ अथवा ‘दानाध्यक्ष’. या सगळ्यांची कामं ‘कानूनजाबित्या’त निश्चित केलेली दिसतात. महाराजांनी केलेल्या जाबित्यांचा सारांश असा-
‘पेशवा’ उर्फ ‘मुख्य प्रधान’ यांनी सगळं राजकार्य करून राजपत्रांवर शिक्का करावा आणि आपल्या हाताखालील सैन्य घेऊन युद्धप्रसंगी स्वारी करावी. जे जे तालुके जिंकले जातील तिथला बंदोबस्त करून म्हणजेच व्यवस्था लावून द्यावी. सगळ्या सैन्याने त्यांच्यासोबत जावं आणि पेशव्यांनीही सगळ्यांना आपल्यासोबत घेऊन काम करावं! इथे राजपत्र म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांनी आज्ञा केलेले पत्र. या राजपत्राची सुरुवात राज्याभिषेकानंतर ‘स्वस्तिश्री राज्याभिषेक शका’ने होई. या राजपत्राच्या माथ्यावर खुद्द महाराजांचा शिक्का आणि डावीकडे मायन्यानंतर अथवा साधारणतः दुसऱ्या/तिसऱ्या ओळींनंतर मुख्य प्रधानांचा शिक्का असे. महाराजांचे पहिले पेशवे होते शामराज नीळकंठ रांझेकर. पुढे नरहरी आनंदराव नावाचा एक काळजीवाहू प्रधान नेमल्यावर लगेच काही महिन्यात त्यांच्या जागी मोरो त्रिमल पिंगळे यांना नेमण्यात आले, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत पेशवेपदी होते. आणखी एका मुख्य प्रधानाचा शिक्का आपल्याला काही पत्रांवर मिळतो ते म्हणजे महादजी शामराज. अंदाज असा आहे की, हे शामराजपंतांचे पुत्र असावेत आणि मोरोपंतांच्या गैरहजेरीत शिक्के करत असावेत.
‘मुजुमदार’ अथवा ‘अमात्य’ यांनी राज्यातील जो काही जमाखर्च वगैरे होत असेल त्याची व्यवस्थित चौकशी करून आपल्या हाताखाली असलेल्या दफ्तरदार, फडणवीस वगैरे लोकांच्या मदतीने कामाचा फडशा पाडावा. जी काही कागदपत्रे वगैरे तयार करायची असतील ती व्यवस्थित चौकशी करून तयार करावीत. फडणिशी आणि चिटणिशी कागदपत्रांवर अमात्यांनी आपला शिक्का उमटवावा. यासोबतच त्यांनी आपल्या हाताखाली दिलेलं सैन्य घेऊन युद्धप्रसंग उभा ठाकल्यास युद्धावर जावे आणि जो प्रांत दिला जाईल, त्याची व्यवस्था लावावी. पूर्वीचे नीळोपंत वयस्क झाल्याने राज्याभिषेकासमयी महाराजांनी त्यांच्या दोन पुत्रांना, नारो नीळकंठ आणि रामचंद्र नीळकंठ यांना अमात्यपद वाटून दिलं. धाकटा रामचंद्र हा कारभारात पहिल्यापासून तरबेज असल्याने तेच मुख्य कामकाज पाहत असावेत. पुढे राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातले प्रसिद्ध रामचंद्रपंत अमात्य ते हेच होत.
‘सुरनीस’ अथवा ‘सचिव’ यांच्यासाठी मुख्य काम म्हणजे जी राजपत्रं पाठवायची असतील त्या राजपत्रांचे बारकाईने वाचन करून काही लेखनाच्या चुका असतील अथवा एखादा शब्द अशुद्ध लिहिला गेला असेल तो शुद्ध करावा. राजपत्राच्या शेवटी संमतीचे चिन्ह अथवा पत्रे नीट पाहिल्याची खूण करावी आणि यासोबतच आपल्या हाताखालील सैन्य घेऊन युद्धप्रसंगी हजर राहावे. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर हे राज्याभिषेकापूर्वीपासून आणि नंतरही सचिवपदी कायम होते.
‘वाकनीस’ अथवा ‘मंत्री’ यांनी जे काही राजकारण घटत असेल त्यात सावधतेने विचार करून सल्ले द्यावेत, शिवाय निरनिराळे वाके-हकिकती लिहिणे, आमंत्रणे पाठवणे वगैरे गोष्टी या मंत्र्यांच्या अखत्यारित असत. हे सगळं करण्यासोबत त्यांनी आपली फौज घेऊन युद्धक्षेत्रावर जाणे हे होतेच. इ. स. १६६१ मध्ये सुरुवातीला काही दिवसांसाठी अण्णाजी दत्तो प्रभुणीकरांना वाकेनवीशी दिली होती, पण लगेच त्या जागी दत्ताजी त्रिंबक यांना मंत्रिपदी नेमण्यात आले.
‘सरनोबत’ अथवा ‘सेनापती’ यांनी सगळ्या सैन्याचा आटोप करून युद्धप्रसंगी स्वारी करावी हे त्यांचे मुख्य काम. जो काही तालुका त्यांना दिला जाईल अथवा ते जिंकून घेतील त्याचा बंदोबस्त लावून सगळ्या सरदार-दरकदारांना त्यांनी सोबत घेऊन चालावे, आणि हिशोब सरकारात सादर करावा. इथे सेनापती हा शब्द येतो तेव्हा ते घोडदळाचे सेनापती असतात हे लक्षात घ्यावं लागते. पायदळाच्या सेनापतींसाठी ‘पाउलोकावर’चा मुख्याधिकारी असे. जेव्हा सेनापती म्हटले जाई तेव्हा घोडदळाचा सेनापती आणि त्याच्या हाताखाली पायदळाचाही सेनापती असे. या मुख्य सेनापतिपदी सुरुवातीला माणकोजी दहातोंडे होते. पुढे महाराजांनी सगळ्याच पदांवर नवी माणसे नेमली तेव्हा माणकोजींच्या जागी नेतोजी पालकरांना सेनापती करण्यात आले. इ. स. १६६६ मध्ये नेतोजी मोगलांकडे गेल्यावर त्यांच्या जागी कुडतोजी गुजर यांना प्रतापराव हा किताब देऊन नेमले. पुढे राज्याभिषेकाच्या अगदी अलीकडे नेसरीच्या संग्रामात प्रतापराव गुजर मारले गेले तेव्हा त्यांच्या जागी हंसाजी मोहिते हंबीररराव यांना नेमण्यात आले जे महाराजांच्या मृत्यूपर्यंत सेनापतीपदी कायम होते.
‘डबीर’ अथवा ‘सुमंत’ म्हणजे परराष्ट्रमंत्रीच. त्यांनी परराज्याशी असलेल्या संबंधाचा लेखाजोखा घेऊन त्यासंबंधी विचार करावा हे त्यांचं मुख्य काम. परराज्याच्या वकिलांचे सत्कार करणं, राजपत्रांवर संमतीचं चिन्ह करणं वगैरे सोबतच युद्धप्रसंगी सुमंतांनाही युद्धात उतरून लढण्याची आज्ञा होती. स्वराज्याच्या सुरुवातीपासून या कामी सोनो विश्वनाथ नावाचा एक चाणाक्ष अन् वृद्ध मुत्सद्दी कार्यरत होता. सोनोपंत डबीरांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र त्र्यंबक सोनदेव यांनी काही काळ सुमंतपद सांभाळलं आणि राज्याभिषेकासमयी त्यांच्या पुत्राला, रामचंद्र त्रिंबक यांना सुमंत म्हणून नेमण्यात आलं.
‘पंडितराव’ अथवा ‘दानाध्यक्ष’ हे पद धर्माधिकारी अशा अर्थाने निर्माण करण्यात आलं होतं. धर्माची खडानखडा माहिती असणारी व्यक्ती इथे नेमली जाई. धर्मातील चांगल्या वाईट गोष्टी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी पंडितराव होते. शिष्ट व्यक्तींचे सत्कार करणे, जे काही धार्मिक व्यवहार होतील त्यात लक्ष घालणे, एखाद्याला त्याने केलेल्या दुष्कृत्याबद्दल प्रायश्चित्त देणे वगैरे कामे करून यासंबंधीच्या पत्रांवर संमत चिन्हे करण्याची आज्ञा पंडितरावांना होती. एखाद्या विशिष्ट प्रसंगी दानधर्म करणे, शांती-अनुष्ठान करणे हादेखील त्यांच्या कामाचा एक भाग होता. रघुनाथ यांना ‘पंडितराव’ हा किताब देण्यात आला, पण ते बहुतांशी दक्षिणेत असल्याने त्यांच्या जागी इथे त्यांच्या पुत्राला इथले कामकाज देण्यात आले. यांचे नाव मात्र काही सापडत नाही.
शेवटचं पद म्हणजे न्यायाधीश. राज्यात कुठे न्याय-अन्याय होत आहे या सगळ्यावर लक्ष देऊन अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य न्यायाधीशांना होते. जी काही न्यायाची निवाडपत्रे होत असत त्यांवर संमत चिन्ह करावे, अशी न्यायाधीशांची योग्यता होती. ही निवाडपत्रे म्हणजे ‘महजर’ किंवा आजच्या भाषेत ज्याला ‘जजमेंट’ म्हणतात ते होय. गोतसभा भरवल्यानंतर निरनिराळ्या लोकांची मतं न्यायाधीशांना ऐकून घ्यावी लागत आणि त्यावरूनच ते निवाडा करत असत. महाराजांच्या काळात ते स्वतःच न्यायनिवाडे करत असत. राज्याभिषेकापर्यंत स्वतंत्र अशा न्यायाधीशाचं नाव आढळत नाही. राज्याभिषेकानंतर हे पद निराजी रावजी नाशिककर यांना देण्यात आले. पुढे त्यांचे पुत्र प्रल्हाद निराजी हे न्यायाधीशी पाहू लागले.
या सगळ्यात आपण जर नीट पाहिले तर असे दिसून येईल की, आठपैकी सहा प्रधानांना सेना घेऊन युद्धप्रसंगी स्वारी करावी अशी राजाज्ञा आहे. म्हणजे न्यायाधीश आणि पंडितराव सोडल्यास तुम्ही कितीही मोठ्या पदावर असा, खुद्द महाराज जातीने युद्धाच्या आघाडीवर जात असल्याने सगळ्यांना हे काम करावेच लागे. अशा वेळी मग दरबारातील कामे करण्यासाठी या अष्टप्रधानांचे मुतालिक नेमले जात असत, ते दरबारातील कामकाज पाहत. महाराजांच्या काळात प्रत्येक अष्टप्रधानाचे मुतालिक कोण होते हे आज सांगणे अवघड आहे, पण पुढे शाहू महाराजांच्या काळात बाजीराव वगैरे सर्व पेशवे स्वाऱ्यांनिमित्त बाहेर असताना सातारा दरबारात कामकाजासाठी पुरंदरे मुतालिक असल्याचे ज्ञात आहेच. एकंदरीतच अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची उभारणी केली आणि ज्याला त्याला आपल्या पदानुसार कामे वाटून दिली. आज शिवजयंतीनिमित्त केवळ जयघोष न करता आपल्याला महाराजांच्या या साऱ्या सुसूत्रतेचं, या सगळ्यांच्या एकंदर कार्याचे स्मरण असणे आवश्यक आहे. बहुत काय लिहिणे? अगत्य असू द्यावे. लेखनावधी!
- कौस्तुभ कस्तुरे