मेस्किकोच्या आखातात थंडीची लाट; किनाऱ्यांवर ३ हजार कासवे आली वाहून

17 Feb 2021 15:30:16
sea turtle_1  H
 


अमेरिका -
गेल्या चार दिवसांमध्ये अमेरिकेमधील दक्षिण पाद्रे बेटावर ३ हजाराहून अधिक समुद्री कासवे वाहून आली आहेत. मॅस्किकोच्या आखातामधील तापमानाचा पारा उतरल्यामुळे थंड पडलेली कासवे समुद्र किनाऱ्यांवर वाहून आली आहेत. स्थानिक प्रशासन वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने या कासवांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
अमेरिकेच्या टेक्सास प्रातांमध्ये दक्षिण प्रादे हे बेट आहे. गेल्या काही दिवसांपासून या बेटावर मोठ्या प्रमाणात समुद्री कासवे गारठलेल्या अवस्थेत वाहून येत आहेत. दरवर्षी मॅस्किकोच्या आखातामधील तापमानाचा पारा उतरल्यानंतर समुद्राचे पाणी थंड होते. अशावेळी गारठलेली समुद्री कासवे मोठ्या संख्येने किनाऱ्यांवर वाहून येतात. ही संख्या थोडीथोडकी नसून काही हजारांमध्ये असते. यामध्ये प्रामुख्याने समुद्री कासवांमधील आॅलिव्ह रिडले प्रजातींचा समावेश असतो.
 
 
 
 
१४ फेब्रुवारीपासून दक्षिण पाद्रे बेटाच्या विस्तीर्ण पसरलेल्या किनाऱ्यावर तीन हजारांहून अधिक कासवे गारठलेल्या अवस्थेत वाहून आली आहेत. या प्रकाराला हायपोथर्मिक म्हणतात. कासव हा सरीसृप वर्गात मोडला जाणारा जीव आहे. म्हणजेच तो आपल्या शरीराअंतर्गत तापमान स्वत: नियंत्रित करू शकत नाही. अशावेळी त्यांना जमिनीवर येऊन उन्हाचा शेक घेणे आवश्यक असते. मात्र, मेस्किकोच्या आखातामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली उतरल्यानंतर समुद्री कासवे गारठतात. ते आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित न करू शकल्याने गोठलेल्या अवस्थेत किनाऱ्यावर वाहून येतात.
 
 
दक्षिण प्रादे बेटावर हायपोथर्मिक अवस्थेत वाहून येणाऱ्या कासवांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. येथील स्थानिक प्रशासन आणि वन्यजीव बचाव संस्था मोठ्या शर्थीने कासवांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जागेचा अभाव, हिटर, विद्युत पुरवठा खंडीत होण्यासारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बचावकर्त्यांना आर्थिक बरोबरीनेच मनुष्य़बळाचीही आवश्यकता आहे.

Powered By Sangraha 9.0