...तर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल

17 Feb 2021 11:45:42

narayan rane_1  

आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नारायण राणे यांचा हल्लाबोल

ठाणे: “राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार नाहीत. कारण, त्यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या प्रकरणातील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल,” अशी बोचरी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती देण्यासाठी नारायण राणे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसह तीनचाकी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचशे स्केअर फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देऊ, वीजबिल माफ करू, शेतकर्‍यांना करमाफी देऊ, सातबारा कोरा करू, शेतकर्‍यांच्या खात्यावर ५० हजार रूपये जमा करू, अशा घोषणा केल्या त्या केवळ ‘निवडणूक गप्पा’ होत्या, सत्तेत आल्यानंतर त्यापैकी काहीच करू शकलेले नाहीत,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.
 
 
 
“राज्याला मुख्यमंत्रीच नाही ते केवळ ‘मातोश्री’च्या पिंजर्‍यात राहणारे मुख्यमंत्री आहेत. सरकार आल्यापासून महिलांवर अत्याचार करणार्‍यांना पाठीशी घालत असून अत्याचार करण्याचे ‘लायसन्स’ देत आहे. इथे कुंपणच शेत खात असून जनता याविरोधात आक्रमक झाल्यास यांना पळता भुई थोडी होईल,” असे राणे म्हणाले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत असताना शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवल्याच्या वदंतेबाबत राणे यांना छेडले असता ते म्हणाले, “हे सरकार महिलांवर अत्याचार करणार्‍यांना पाठबळ देत आहे. शिवसेनेच्या ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्या हत्यांच्या आत्महत्या केल्या. सुशांतप्रकरणी दिशाच्या केसमध्ये हत्येऐवजी आत्महत्याच सांगितली. या मुद्द्यावर शिवसेना बोलायला तयार नाही. वनमंत्री राठोड यांचा राजीनामा सरकार घेणार नाही. कारण, राठोड यांचा राजीनामा घेतला तर आधीच्या सुशांत सिंह प्रकरणात आणखीन एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल,” अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता राणे यांनी केली.
 
 
 
“ ‘मातोश्री’ आणि नगरविकास विभागामध्ये समन्वय नसल्याने एकत्रित विकास नियंत्रण नियमावली वादग्रस्त ठरली आहे. शिवसेना आणि हिंदुत्वाचा संबंध संपला असून बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना राहिलेली नाही. गुंडांच्या मिरवणुका निघत असून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घातले जात आहेत,” असे राणे म्हणाले.
 
 
ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामे
“ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. प्रशासनावर अंकुश राहिलेला नसल्याने अधिकार्‍यांना हाताशी धरून दुकानदारी सुरू आहे. जनतेच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. भाजपच्या पदाधिकार्‍यांना अधिकार्‍यांकडून धमक्या दिल्या जातात. भाजप असल्या धमक्यांना भीक घालत नाही. आता आमच्या धमक्या ऐका,” अशा इशारा राणे यांनी दिला. ठाणे मनपा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढून जिंकेल, असा दावाही त्यांनी केला. मनसेशी युतीबाबतचा प्रश्न टाळत यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.
 
 
अधिवेशन आले की ‘कोरोना’ वाढतो
राज्याच्या अर्थसंकल्पाचे सत्र यापूर्वी दीड महिना चालायचे. आता पुन्हा कोरोना वाढत असल्याचे सांगून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे. अधिवेशन आले की, राज्यात कोरोना वाढतो का? अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली.




Powered By Sangraha 9.0