दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. कोरोनामुळे ती साजरी करण्यावर काही सरकारी बंधने आली असली, तरी शिवरायांच्या नुसत्या स्मरणाने महाराष्ट्रीय माणसाची मान अभिमानाने उंचावते. ऊर भरून येतो आणि आदराने तो नतमस्तकही होतो. शिवाजी महाराजांप्रमाणेच संत तुकाराम व रामदासस्वामी या त्यांच्या समकालीन महापुरुषांपुढे नतमस्तक होणार नाही, तो महाराष्ट्रीयन नव्हेच, इतके दोघांचे बौद्धिक सामर्थ्य व कार्य होते. शिवरायांचा जन्म शालिवाहन शके १५५१ या वर्षी शुक्लनाम संवत्सरात फाल्गुन वद्य तृतीयेला हस्त नक्षत्रावर आणि सिंह लग्नावर शुक्रवारी जिजाबाई आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अभ्यासकांच्या मते, तो दिवस दि. १९ फेबु्रवारी, १६३० हा होता. आज जगभर प्रचलित ग्रेगीरियन पंचांगाची तारीख दृष्टीसमोर ठेवून सरकारी आदेशानुसार तिथीऐवजी शिवजयंती उत्सव तारखेनुसार करावा, म्हणजे तो १९ फेबु्रवारीला करावा, असे ठरले. उद्या अनेक वर्षांनंतर शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या मूळ जन्मवारी म्हणजे शुक्रवारी येत आहे.
तुकाराम, रामदासस्वामी आणि शिवाजी महाराज तिघेही प्रचंड बुद्धिमान, पराक्रमी महानुभव एकाच कालखंडात जन्माला आले, हे महाराष्ट्राचे महाभाग्य! हे तिघे महापुरुष म्हणजे बुद्धी, इच्छाशक्ती, पराक्रम याची भव्य स्फुरणे होते. विशेष म्हणजे, त्यांच्यात विरोधी मतप्रवाह निर्माण न होता ते परस्परांना पूरक ठरले. कारण, तिघांच्याही ठिकाणी प्रचंड औदार्य होते, असे दिसून येते. रामदासस्वामी व शिवाजी महाराज दोघेही मेहनती आणि हिंदवी स्वराज्याविषयी आग्रही होते. जुलमी अन्यायी म्लेंच्छसत्ता दोघांनाही खुपत होती. समर्थांनी ‘धर्मरक्षी’ राजाच्या शोधार्थ अनेक वर्षे भ्रमंती केली होती. पण हवा तसा गुणसंपन्न धर्मरक्षी राजा त्यांना आढळत नव्हता.
तत्कालीन इतिहासावर नजर टाकली, तर कृष्णा खोऱ्यात उतरल्यावर समर्थांच्या प्रथम दृष्टीस पडला तो चंद्रराव मोरे, अतिशय शूर असून तो वाघाची शिकार समोरून करीत असे. जावळी खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचे वर्चस्व होते. तेथील बाजी घोरपडे ही शूर होता. या बाजी घोरपडेने रामनवमी उत्सवासाठी चाफळच्या मठाला काही जमिनी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो, पण दोघांच्याही वागणुकीत नीतिन्याय नव्हता, शूर असले तरी ते दोघेही विजापूरच्या दरबाराचे गुलाम झालेले होते. अशा अन्यायी आणि मुसलमानांचे गुलाम झालेल्यांचा आपल्या कार्यासाठी काही उपयोग नाही, हे समर्थांनी ओळखले होते. याच सुमारास रोहितेश्वरापुढे हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन आपल्या विश्वासू मावळ्यांसह शिवरायांनी बिकट आणि बळकट असा तोरणा किल्ला घेतला. तेथील तटबंदीची दुरुस्ती करताना त्यात द्रव्याचा हंडा सापडला, त्या द्रव्याचा उपयोग करून मुरुंबदेवाच्या गडाची तटदुरुस्ती त्यांनी करून घेतली. महाराजांनी त्या गडाला नाव दिले ‘राजगड.’ मग शिवाजी महाराजांनी एका मागून एक गड-किल्ले घेण्यास सुरुवात केली. या सर्व बातम्या महंताद्वारा समर्थांना मिळत होत्या. त्यांंचा धर्मरक्षी राजाचा शोध आता संपला होता.
शिवरायाच्या न्यायीपणाबद्दल समर्थांची खात्री पटली होती. कारण, याच शिवबाने वयाच्या १६व्या वर्षी रांझे गावच्या पाटलाने केलेल्या अत्याचाराबद्दल दुष्कृत्याबद्दल पाटलाचे हातपाय तोडायची शिक्षा दिली होती. याबद्दल पाटलाने गयावया व रद्दबदली करूनही शिवबाने पुनर्विचार शक्य नसल्याचे सांगितले होते. शिवरायांच्या चारित्र्यसंपन्न वागणुकीची व पराक्रमाची महती समर्थांपर्यंत पोहोचली होती. समर्थांनी शिवाजीराजांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. शिवाजीराजांची वैयक्तिक वागणूक व त्यांचा पराक्रम हे लोकोत्तर असल्याची समर्थांची खात्री पटली होती. त्यामुळे त्या पत्रात समर्थ, ‘तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैसी॥‘ असे लिहितात. समर्थ हिंदुस्थानभर फिरले होते तसेच, ते बहुश्रुत होते. यापूर्वीच्या अनेक राजांची चरित्रे समर्थांना ठाऊक होती. शिवाजीराजांच्या ठिकाणी असलेल्या अलौकिक गुणांची तुलना कुणाशी करता येणार नाही, असे समर्थांना वाटले. समर्थांनी या पत्रात शिवरायांसाठी अनेक विशेषणे वापरली आहेत. ती पाहिली म्हणजे, शिवरायांच्या ठिकाणी असलेल्या जाज्वल्य गुणांची कल्पना येते. विशेष म्हणजे, अत्यंत नि:स्पृह आणि स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या समर्थांच्या मुखातून ती निघालेली आहेत.
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी॥
परोपकाराचिया राशी।
अखंड घडती जयासी।
तयाचे गुणमहत्त्वासी। तुळणा कैसी॥
समर्थ शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांच्या प्रत्येक शब्दात शिवाजीचे रूप, गुण उभे करण्याचे सामर्थ्य होते. शिवरायांच्या ठायी असलेल्या अलौकिक गुणांचे वर्णन पाहा
यशवंत कीर्तिवंत ।
सामर्थ्यवंत वरदवंत।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
शिवरायांचे वैभव दाखवताना ‘नरपती’, ‘हयपती’, ‘गजपती’, ‘गडपती’, ‘भूपती’, ‘जळपती’ अशा अनेक शब्दांचा वापर समर्थांनी केला आहे. शेवटी ‘छत्रपती’ असेही समर्थांनी शिवरायांना राज्याभिषेकाच्या अगोदरच म्हटले आहे. या सर्वांचे शिवाजीराजे स्वामी आहेतच, तसेच शक्ती पृष्ठभागी असे सांगून त्यांच्या पराक्रमाला शक्तीचा आधार दिला आहे. शिवरायांच्या पाठीमागे जी शक्ती उभी आहे, ती म्हणजे तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि विश्वासू स्वामिनिष्ठ मावळ्यांनी साथ, जनशक्ती! शिवाजी महाराजांचे इतके यथार्थ वर्णन रामदासांनंतरच्या कुणी साहित्यिकांनी क्वचितच केले असेल. या काव्यात शिवरायांच्या बारीकसारीक गुणांच्या स्वभावाचे यथार्थ वर्णन आहे. हे लिहीत असताना आपल्या देशाची सद्यस्थिती काय आहे, हेही सांगायला समर्थ विसरले नाहीत. ‘आसेतुहिमाचल’ भ्रमण करीत असताना त्यांनी हिंदूंची दुर्दशा पाहिली होती. म्हणून पूर्ण हिंदुस्थानातील धर्माची काय अवस्था आहे, हेही त्यांनी पत्रात सांगून टाकले.
तीर्थक्षेत्रे मोडिली।
ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली।
सकळ पृथ्वी आंदोळली। धर्मे गेला॥
उदंड पंडित पुराणिक।
कवीश्वर याज्ञिक वैदिक।
धूर्त तार्किक सभानायक।
तुमच्या ठायीं।
मोगलसत्तेने वर्षानुवर्षे देवळांचा, त्यातील मूर्तींचा विध्वंस चालवला होता. धर्म तर नष्ट होण्याच्या मार्गावर होता. मुसलमानांचा हा रेटा इतका भयंकर होता की, समर्थ म्हणतात, “या त्यांच्या दुष्कृत्यांनी सर्व पृथ्वीच जणू हेलकावे घेऊ लागली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही स्थिती सांभाळणारा कोणीही धर्मनिष्ठ पराक्रमी राजा मला तरी दिसत नाही.” हिंदू धर्माची, तीर्थक्षेत्रांची झालेली वाईट अवस्था शिवरायांना विशद करुन शिवरायांचा पराक्रम व कल्याणकारी कार्य पुन्हा सांगितले.
कित्येक दुष्ट संहारिले।
कित्येकांस धाक सुटले।
कित्येकांस आश्रय जाले। शिवकल्याण राजा॥
तुमचे महाराष्ट्रातील कल्याणकारी राज्य ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणून तुम्हाला हिंदुस्थानाभर नेऊन ठेवायचे आहे, हे काम तुमची वाट पाहत आहे. तुम्ही या भूमंडळाचे धर्माचे रक्षक व्हा, असे समर्थ पत्रात म्हणतात.
या भूमंडळाचे गयी।
धर्म रक्षी ऐसा नाही॥
महाराष्ट्रधर्म राहिला काही। तुम्हांकरिता॥
आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला समर्थांनी केलेले शिवरायांचे वर्णन व त्यांच्या कार्याची महती सांगणारे काव्य, समर्थाचे उत्स्फूर्त उद्गार ऐकणे योग्य आहे, स्फूर्तिदायक आहे, असे वाटते.
- सुरेश जाखडी