संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त...

    16-Feb-2021
Total Views |

Saint Sevalal Maharaj Jay
 
 
 
संपूर्ण भारत देश दीडशे वर्षे परकीयांच्या गुलामीत होता. मात्र, बंजारा समाजाने हलाखीचे काबाडकष्ट झेलून राहणे पसंत केले. मात्र, कुण्या परक्यांची गुलामगिरी स्वीकारली नाही. संत सेवालाल महाराजांची अनमोल शिकवण अजूनही बंजारा तांड्या-तांड्यांत कवी शाहीर भजन करणारे मनोरंजनात्मक प्रबोधनातून सांगतात. त्यांच्या परिवर्तनवादी, विज्ञानवादी, पुरोगामी, क्रांतिकारी, मानवतावादी, तत्त्ववादी, सत्यवादी, विचारांची आज गरज असल्याचे प्रभावाने जाणवते.
 
 
 
संत सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी रोजी दोडीतांडा ता. गुत्तीबेलारी जि. अनंतपूर, आंध्रप्रदेश येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा रामजी नायक असे होते. ते ५२ तांड्यांचे नायक होते. त्यांच्या आईचे नाव धरमणी होते. बंजारा समाज इतरांना अन्नधान्य, मसाल्याचे पदार्थ इ. रसद पुरविण्याच्या निमित्ताने गाई-बैलांच्या कळपासह पूर्ण भारतभर नव्हे, तर विदेशातही प्रवास करीत असे. म्हणून हिंदी कवितेत एक कवी म्हणतो -
 
 
मै बंजारा ले एकतारा
घुमा भारत सारा!
 
 
संत सेवालाल महाराजांची प्रखर आणि परिवर्तनवादी मानवतावादी विचारसरणी म्हणजे ते आपल्या वर्तनातून सांगायचे, प्राणिमात्रांवर दया करा. निसर्गाचे संगोपन करा. कोणत्याही गोष्टीचा बुद्धीच्या कसोटीवर तपासून स्वीकार करा. अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नका. परंतु, स्वतः विश्वासपात्र बना. प्रगत विचारांचा मिळून मिसळून राहणारा समाज प्रगतिपथावर जाईल. कुणाची निंदा करू नका. सत्याचा मार्ग स्वीकारा. सत्तेच्या सोबत राहा. कसायला गाई विकू नका. गरिबावर अन्याय करू नका. चोरी-हिंसा करू नका. भावा-भावांमध्ये वैर नको. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. बुवाबाजी अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. संत सेवालाल महाराज म्हणायचे, “जाणजो छाणजो पंचज माणजो.” म्हणजे विज्ञानवादी निरीक्षणातून पाहा. त्या गोष्टीचा अर्थ ओळखा आणि त्यानंतरच स्वीकारा. समाजासाठी आजन्म ब्रह्मचारी राहून बंजारा समाजाला अंधश्रद्धेतून विचारातून पुढे आणणारे काळाच्या बाबतीत दूरदृष्टी असणारे संत सेवालाल महाराज अत्यंत स्वाभिमानी होते.
 
 
हैदराबादमध्ये निजामाच्या प्रदेशांमध्ये जाऊनही कर देत नाही, असे ठणकावून सांगत महाराजांनी पुढील घोषणा केली. ‘हमारा तांडा हमारा राज’ अर्थात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या अगोदर मागासलेल्या बंजारा समाजाचा स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याचे मंत्र देणारे संत सेवालाल महाराज म्हणजे एक प्रकारचे वीरपुरुष क्रांतिकारकच होते. इंग्रजांनी भारतात रेल्वेमार्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण देशात सेवालाल महाराजांनी व्यापाराच्या निमित्ताने भ्रमंती केली होती. अजूनही त्यांच्या कार्याची पावती देशभरातील विविध स्मारके देत असतात. त्यात
 
 
 
१. बंजारा हिल्स, हैदराबाद
२. निजामांनी दिलेला ताम्रपट पोहरादेवी तालुका मानोरा येथे अजूनही आहे.
३. दिल्लीमध्ये गुलाब खानचा पराभव (१७६०).
४. लढाईसाठी हातात तलवार घेतली.
५. राजस्थान जयपूर येथे सवाई मानसिंग हॉस्पिटल प्रांगणामध्ये संत सेवालाल महाराज यांचा पुतळा आहे.
६. मुंबई जवळचा बंदर ‘सेवालाल पोर्ट’ सध्या ‘जवाहरलाल पोर्ट’ या नावाने ओळखला जातो.
 
 
 
उरण तालुक्यात सेवा गाव जवळ सेवा नावाचा बंदरात होता. संत सेवालाल महाराजांकडे स्वतःच्या ३,७५५ गाई होत्या. त्यांच्या प्रिय घोड्याचे नाव तोळाराम होते. प्रिय सांड म्हणजे बैलांचे नाव ‘गराशा’ होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचा ध्वज त्याला बंजारी भाषेत आम्ही (लगी) म्हणतो, तो स्वीकारला होता, जो अहिंसा- शांतीचा प्रतीक मानला जातो. २५० वर्षांनंतरही संत सेवालाल महाराजांचे विचार प्रेरक ठरत आहे. निसर्गावर आधारित जवळीक साधणारे बंजारा समाजाचे सण-उत्सव उदाहरणार्थ तीज, दिवाळी, होळी खऱ्या अर्थाने समाजाची संकल्पना सार्थ ठरवतो. संत सेवालाल महाराज यांच्या कार्याच्या महतीनुसार विविध उपाध्या (बिरुदावली) लावण्यात येतात.जसे-
 
 
 
१. क्रांतिसिंह २. शूरवीर ३. मोतीवाळो ४. आईवाळो ५. गादिवाळो ६. पोरीयातारा ७. तोडावाळो ८.धोळोघोडेवाळो
 
 
कार्यानुसार त्यांना समर्पक बिरुदावल्या लावल्या जातात. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. कोणावरही अन्याय होता नये, यासाठी महाराज बंजारा बोलीभाषेत दोहा म्हणत -
 
 
गोरगरिबेन दांडण खाय
सात पिडी वोर नरकेम जाय!
 
 
अर्थात जो गोर-गरिबांवर अन्याय-अत्याचार करून त्यांची आर्थिक फसवणूक करेल, त्यांच्या पुढील सात पिढ्या नरकायातना समान परिणाम भोगतील. संत सेवालाल महाराज आपला पुतण्या जेतालाल महाराजांचा लग्न उमरी येथील तुकाराम या अत्यंत गरीब घराण्यातील श्यामका नावाच्या मुलीशी लावून एक जीवंत उदाहरण समाजापुढे अजरामर ठेवले. ज्या व्यक्तींना स्वतःचे अधिकार हक्क-कर्तव्य माहीत नसतात, त्यांच्यासाठी संत सेवालाल महाराज जागृतीपर दोहे म्हणत.
 
 
 
रोयती राज मळेनी
जल्दी धासेती दाडो आटपेनी
कल्लोळ करो
केशुलानई मोरयो...
 
 
 
अर्थात, रडल्याने राज्य मिळत नाही. धरसोड वृत्तीने धावपळ करून जीवनात चांगले यश मिळणार नाही. म्हणजेच कामाचे नियोजन आवश्यक आहे. लढा,उभारा आवाज उठवा. समाजाची प्रगती कष्टाशिवाय, समाजाच्या एकजुटीशिवाय, अन्यायाविरुद्ध प्रतिकार केल्याशिवाय होणार नाहीत. अशा प्रकारे समतेवर आधारित अहिंसावादी, न्यायप्रिय, निसर्गवादी, क्रांतिकारी, मानवतेचे पुजारी संत सेवालाल महाराजांनी दि. २ जानेवारी, १७७३. मध्ये रुईगड येथे स्वेच्छामरण पत्करले. महाराजांचा अंत्यविधी पोहरादेवी तालुका मानोरा जि. वाशिम येथे करण्यात आला. दरवर्षी रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. बंजारा समाजाची जणू ती काशी मानली जाते. आजही काळाच्या प्रवाहात संत सेवालाल महाराजांचे विचार ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ आहेत. भटक्या-विमुक्तांच्या जातीसाठी नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी हितकारक आहेत त्यांच्या विचारापासून-कार्यापासून आपल्या पुढील आयुष्यासाठी आपण काही प्रेरणा घेऊया! जय सेवालाल! जय वसंत! जय बहुजन! जय संविधान! जय भारत! जय मानवता!
 
 
- कैलास पवार