असुरक्षिततेचा मनाग्नी

16 Feb 2021 14:56:38

Manovata_1  H x
 
असुरक्षित मनाच्या या व्यक्ती सत्य वस्तुस्थितीपेक्षा स्वत:च्या विकृत डोक्यातच वस्तीला असतात. त्यामुळे अस्सल जगाचा निखळ आनंद त्यांना घेता येत नाही.
 
 
 
 
आपल्यापैकी जवळ जवळ प्रत्येकाला आपण आपल्या आयुष्यात सुखी असावं, आनंदी असावं, श्रीमंत असावं, असं वाटत असतं. पण, वास्तवात पाहिले तर ते तसं दिसत नाही. बर्‍याच जणांना आपली आनंदाची पातळी कमी झाल्यासारखी वाटते. आपल्या व्यक्तिमत्त्वात आपण भावनिकदृष्ट्या विकल आहोत वा असुरक्षित आहोत, असं वाटत असतं. स्वत:बद्दल अनिश्चित वाटत असतं. सामान्यपणे स्वत:बद्दल खात्री नसलेले आणि स्वत:ला असुरक्षित समजणार्‍या लोकांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे आहोत, या भावनेने हे लोक पछाडलेले असतात. लोकांनी दूर लोटलेले आणि स्वत:ला विकल मानत आयुष्य कंठणारीही मंडळी या जगात अमाप आहेत. त्यांना खरंतर आपण या जगात एकटे आहोत, असं वाटतं. परंतु, खरंतर ही लोक बहुसंख्याक आहे. आजचा कोरोना काळ हा तसा एकाकीपणाचा काळ आहे. या परिस्थितीत या लोकांची किती केविलवाणी स्थिती झाली असेल, याची कल्पनाच करता येत नाही. जेव्हा असे लोक एकटेच वेळ कंठत असतात किंवा सगळा वेळ त्यांचा त्यांच्या डोक्यातच किंवा ‘खयालों में’ घालवत असतात, तेव्हा खरंतर आपल्या असुरक्षिततेच्या विहिरीत ते अधिक बुडत असतात. त्यांच्या असुरक्षित भावनेत गुंतून जाण्याबाबत मनोविश्लेषक अनेक प्रकारची सैद्धांतिक विवरणं करतात. यामध्ये त्यांच्या बाल्यावस्थेत त्यांच्या आईबरोबर किंवा इतर लोकांबरोबर जो मानसिक विकास होत असतो, त्यामध्ये कुठेतरी विश्वासाची नाती विकसित झालेली नसतात. यामुळे आपल्या पालकांवर एक निर्धास्त अवलंबून राहणं बाल्यावस्थेत विकसित मानसिक विकासासाठी आवश्यक आहे, तेच होत नाही. यामुळे पुढे जाऊन आपण जी विश्वसनीय नाती निर्माण करतो, तीच निर्माण होत नाहीत. मनात कुठेतरी नात्याबद्दलची असुरक्षिता आणि निराशाजनक संवेदना बळावते. पुढे भविष्यात आपण पाहतो की, अशी मंडळी नवीन ओळखी करून घ्यायचे टाळतात.
 
 
समारंभात इतर लोकांना भेटायचे टाळतात. कारण, इतर नवीन लोकांमध्ये किंवा नवीन वातावरणात आपण विश्वासाने वावरू शकू, हा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो. आपण मनोरंजक संवाद साधू शकू, याची त्यांनी खात्री नसते. आपण काहीतरी चित्तवेधक करू शकू, आपल्याला उत्तम मैत्री करता येईल, याबद्दलची खात्री नसते. आपल्यात काहीतरी चांगले असेल, यावरच त्यांचा विश्वास नसतो. म्हणून इतर कोणी आपल्यात काही चांगले हेरू शकेल, असे त्यांना वाटत नाही. खरंतर ही माणसं गोड, सभ्य, मजेशीर, विनोदी, समाजप्रिय असू शकतात. असं असुरक्षित वाटणं हे व्यक्तिमत्त्वापेक्षा कधीकधी सवयही असू शकेल आणि सवय बदलायला लागते. आणखी अधिक महत्त्वाचं म्हणजे, असुरक्षित मनाच्या व्यक्ती स्वत:शी प्रामाणिक नसतात किंवा स्वत:च्या विचारांशी प्रांजळ नसतात. त्या प्रत्येक परिस्थितीनुसार किंवा समोरच्या व्यक्तीच्या दरारानुसार सरड्यासारखे आपले रंग बदलतात. आपल्याला आश्चर्य वाटते की, कसे काय बुवा यांना हे जमतं? पण, प्रत्येक बदलत्या स्थितीनुसार स्वत:ला अनुरूप करत ही माणसं यशही मिळवतात, म्हणजे यशस्वी अशी मोठी मोठी माणसंसुद्धा अंतर्मनातून असुरक्षित असतात. अर्थात, अनेक प्रकारे लबाडी करत काही टप्प्यापर्यंत यशाचा मार्ग पादाक्रांत करत चालला, तरी बर्‍याचवेळा ही माणसं तोंडावरही सपेशल आपटतात. ते काही गोष्टी नाकारतील. कधीकधी असेही वाटते की, आपण अपयशासाठीच या पृथ्वीतलावर अवतरलो आहोत. अपयशाची या व्यक्तींना इतकी खात्री असते की, पुढची एकही पायरी चढायचा ते प्रयत्न करत नाहीत. ही असुरक्षित माणसं आपल्याला पुन्हा कधी भेटू नयेत, असं आपल्याला वाटतं. त्यांचा स्वत:वर विश्वास नसतोच, पण आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवरही त्यांचा अजिबात विश्वास नसतो. आपल्याला सतत कोणीतरी पारखत असेल वा आपल्या मार्गात कुणी तरी अडथळे निर्माण करत असेल, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ते सतत एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम कसा घडेल, याचा विचार करतील आणि ते कसे बरोबर आहेत, हे सिद्ध करण्यासाठी एखाद्या चांगल्या परिस्थितीचा विध्वंस करतील. असुरक्षित मनाच्या या व्यक्ती सत्य वस्तुस्थितीपेक्षा स्वत:च्या विकृत डोक्यातच वस्तीला असतात. त्यामुळे अस्सल जगाचा निखळ आनंद त्यांना घेता येत नाही. आपल्या विध्वंसातील खरं सौंदर्य त्यांना अनुभवता येत नाही.
 
- डॉ. शुभांगी पारकर
Powered By Sangraha 9.0