अहमदनगरमधून खवले मांजराची खरेदी-विक्री उघडकीस

15 Feb 2021 12:40:43


पुणे वन विभागाची धडक कारवाई

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात सातत्याने खवले मांजर तस्करीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पुणे वन विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी जीवंत खवले मांजराची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत खवले मांजराची विक्री करणाऱ्या चौघांना अहमदनगरमधून आणि खरेदी करणाऱ्याला जुन्नरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात खवले मांजर संवर्धनासाठी तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
 


pangolin_1  H x 
 
पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना खवले मांजर खरेदी-विक्री संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पुण्यातील वन अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील रहिवासी भानुदास जाधव या इसमाशी संपर्क साधला. या इसमाने खवले मांजर हे संगमनेरमधील साकुर येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार अधिकाऱ्यांना घेऊन जाधव साकुर गावात गेला. त्याठिकाणी आरोपींनी साधारण १० किलो वजनाचे खवले मांजर अधिकाऱ्यांना दाखवले. गावात खरेदी-विक्रीचा व्यवहार करणे विश्वासहार्य नसल्याचे कारण पुढे करुन आम्ही या आरोपींना पुणे-नाशिक महामार्गाजवळ आसरा खानावळ या हाॅटेलमध्ये घेऊन आल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे यांनी दिली.
 
 
 

हाॅटलेमध्ये पोहोचल्यानंतर त्याठिकाणी सुरुवातीपासून थांबलेल्या वन विभागाच्या टीमने आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामधील दोन आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला. अशावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईतून मच्छिंद्र केदार, सागर डोके, अशोक वारे या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता जुन्नर येथील अनिल भालेकर नामक व्यक्तीने खवले मांजराच्या खरेदीसाठी आरोपींशी संपर्क साधला असल्याचे समजले. ही माहिती मिळाल्यानंतर भालेकर यासही त्याच्या राहत्या घरी जाऊन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. राज्यात खवले मांजर तस्करीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार खवले मांजर कृती आरखडा अंमलात आणणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे यासंदर्भातील काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. खवले मांजराच्या संवर्धनासाठी कृती आराखडा अंमलात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.

Powered By Sangraha 9.0