वनमंत्र्यांचा थांगपत्ता कोणालाच नाही ?

15 Feb 2021 17:32:12

sanjay rathod_1 &nbs


बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधक आणि राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले तर, आठ दिवसांपासून संजय राठोड गायब असल्याने भाजपने आक्रमक पवित्र घेतला आहे. हाच विषय आज आपण समजावून घेऊया...


आठ दिवसांपासून मंत्री संजय राठोड नॉटरिचेबल


पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येला आठ दिवस उलटून गेले आहेत. तरी तिच्या मृत्यूबाबतच्या ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पूजाने आत्महत्या केली, तिची हत्या झाली की तिचा अपघाती मृत्यू झाला? याबाबत काहीही ठोस माहिती ना पोलिसांकडून दिली जाते ना गृहखात्याकडून. त्यातच रोजच पूजाच्या मृत्यूप्रकरणी नवनवे खुलासे येत असल्याने तिच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे. अद्यापही या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात अरूण राठोड आणि शिवसेनेचे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव प्रखरतेने समोर येतंय.या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या ज्यांच्या आधारावर विरोधीपक्षाने थेट संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केलीये. मात्र या आरोपानंतर मंत्री संजय राठोड अद्याप नॉटरिचेबल आहेत.


'संजय राठोड कुठे आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न' ; गृहमंत्र्यांची टोलवाटोलवी


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत यांनी समोर आलेल्या सर्व पुराव्यानुसार चौकशी करण्यात येईल असे सांगितले.“या संदर्भात अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की, नियमानुसारच चौकशी होणार आहे. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं म्हणत आहे तर पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. संजय राठोड कुठे आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रा समोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्यशासन निर्णय घेईल, असे अनिल देशमुख म्हणाले. मात्र संजय राठोड यांच्याबद्दल शिवसेनेच्या महिला नेत्या मनीषा कायंदे यांनी सूचक वक्तव्य केले ते असे की “मंत्री संजय राठोड गायब आहेत की काय, ते आपल्याला माहिती नाही. परंतु मला असं वाटतं, की योग्य वेळ आली की ते बोलतील. ही इतकी गंभीर बाब असल्याने चुकीचे वक्तव्य होऊ नये, याची दक्षता ते घेत असतील. हा कट रचला गेला असेल, तर निश्चितच तो अतिशय गंभीर आहे. ते सावधानता बाळगत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे” असंही मनिषा कायंदे म्हणाल्या.


संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा फसला ; मोर्चाला समर्थन नाहीच !


एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्या वतीने वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. संजय राठोड बंजारा समाजाचे नेते असून त्यांना सोशल मीडियावर लक्ष केले जातंय. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यासोब बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे असे कारण देत त्यासर्व बाबींना प्रतिउत्तर देण्यासाठी आज मोर्चेकऱ्यांनी पुसदच्या वसंतराव नाईक चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, हा मोर्चा कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्यामुळे रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे.


शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची कारकीर्द


शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा २००४ साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले. फडणवीसांच्या २०१४ साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. २०१९मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला आहे. मात्र आता पूजा चव्हाण प्रकरणात त्यांचं नाव आल्याने महाविकास आघाडी आणि खुद्द मुख्यमंत्री संजय राठोड यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे संजय राठोड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहे, त्याच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र गृहखातं, मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनही याबाबत मौन बाळगून आहेत. राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाच अदर्ज असणारे मंत्री आठ दिवसांपासून गायब आहेत आणि गृहमंत्री संजय राठोड कुठे आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे म्हणत टोलवाटोलवी करत आहेत ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजूनही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले नाही का? असे असंख्य प्रश्न इथे उभे राहतात.
Powered By Sangraha 9.0