ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणी दिशा रवीला अटक

    दिनांक  15-Feb-2021 11:04:40
|

disha ravi_1  H


खलिस्तानी समर्थकांनी हे ‘टूलकिट’ तयार केले असल्याचा अंदाज

बंगळुरु: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने एक ‘टूलकिट’ शेअर केले होते. त्यासंबंधी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. आता ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधील २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्युचर’ मोहिमेची संस्थापक सदस्य आहे. आता तिला पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
 
 
ग्रेटा थनबर्गने शेअर केलेल्या ‘टूलकिट’च्या माध्यमातून देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचला जातोय, भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव आहे, असा आरोप करत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ‘कलम १२४ ए’ (राजद्रोह), ‘१५३ ए’, ‘१५३’ आणि ‘१२० बी’अंतर्गत फिर्याद दाखल केली. या गुन्ह्यामध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, पण तिच्या ट्विट आणि ‘टूलकिट’वर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने स्पष्ट केले. पॉप गायिका रिहानानंतर, ग्रेटा थनबर्ग हिच्यासह अनेक जागतिक ख्यातनाम व्यक्तींनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते.
 
 
दिल्ली पोलिसांनी दिशा रवीची चौकशी केल्यानंतर तिने या ‘टूलकिट’मध्ये काही बदल केले असल्याचे कबुल केल्याची माहिती समोर आली आहे. आपण या ‘टूलकिट’मध्ये काही गोष्टींमध्ये संपादन केले आणि काही गोष्टी समाविष्ट केल्या आणि नंतर ते ‘टूलकिट’ ‘फॉरवर्ड’ केले असे दिशा रवीने दिल्ली पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासातून हे स्पष्ट होत आहे की, संबंधित ‘टूलकिट’ हे खलिस्तानी समर्थकांनी तयार केले आहे. त्याचा उद्देश हा शेतकरी आंदोलनाच्या आड देशात सामाजिक तणाव वाढवण्याचा आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.