मुंबई : मागील ३ दिवसांपासून राज्यभरात खळबळ माजविणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयित मृत्यूप्रकरणी पोलीस आणि गृहमंत्री गप्प का ? असा सवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.
"एका कॅबिनेट मंत्र्यावर या प्रकरणात आरोप झाले आहेत. ते पुढे येऊन का बोलत नाहीत?पूजा भोवळ येऊन पडल्याचे पोलीस सांगत आहेत. मग पोलीस त्यावर प्रेस रिलीज का काढत नाही ? कॅबिनेट मंत्र्यांचे नाव याप्रकरणात येत आहे. तरीही पोलीस महासंचालक समोर येऊन बोलायला तयार नाहीत.पोलिसांनी ऑफिशियल प्रेस रिलीज करून हे सांगावं. लहान लहान गोष्टींवर भाष्य करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री समोर येतात आता ते यावर गप्प का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, विदर्भातल्याच मंत्र्यांचं नाव समोर येतंय गृहमंत्री ही विदर्भातलेच आहेत. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात हा मंत्री चक्क पुरावे नष्ट करायला सांगत आहे. यापेक्षा आणखी काय पुरावे हवे आहेत. हे सरकार मंत्र्याच्या पाठिशी उभे असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र हे कॅबिनेट मंत्री पोलिसांच्या सुरक्षेत आहे का? काही चूक केली नसेल तर तो मंत्री का समोर येत नाही? का यवतमाळात येत नाही ? जे सुरू आहे ते योग्य नाही असे म्हणत बावनकुळे यांनी या प्रकरणाची लवकर चौकशी झाली पाहिजे, असे या प्रकरणाची योग्य माहिती जनतेसमोर आलीच पाहिजे. माहिती समोर आली नाही तर वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.