भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणे हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे - गोपीचंद पडळकर

12 Feb 2021 20:20:31


padalkar_1  H x

 
 
जेजुरी : जेजुरीमध्ये जेजुरी संस्थानाच्या वतीने आहिल्यादेवी होळकर यांना पुतळा उभारण्यात आला आहे. 13 फेब्रुवारीला शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. पण, आज पहाटे अचानक गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमधे झटापटही झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.यावेळी त्यांनी उद्घाटन झाल्याचा दावाही केला.
 
 
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठे काम केले आहे. पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे ठरवलं होते. पण महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचे म्हणणे होतं की शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणे हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये', असे पडळकर यांनी म्हटले आहे.
 
 

यासाठी पडळकरांविरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.या सर्व गोंधळानंतर गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0