आता उरले लग्न जुळवण्यापुरते

12 Feb 2021 22:32:28

china_1  H x W:
चिनी कम्युनिस्ट पार्टीची युवा शाखा आता नवीन जबाबदारी पार पाडणार आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीची युवा शाखा आता युवकांना आणि युवतींना लग्न करण्यास प्रोत्साहित करणार आहे, तसेच मुलांना जन्माला घालावे, यासाठी त्या जोडप्यांना प्रेरणा देणार आहे. इतकेच नाही, तर ज्यांचा विवाह झाला आहे, त्या जोडप्यांना विवाह टिकवण्यासाठी मार्गदर्शन, मदत करणार आहे. त्यासाठी ही युवा शाखा विवाह जुळवणाऱ्या मंडळाची भूमिका करणार आहे. अर्थात, चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या युवा शाखेला हे काम काही नवीन नाही. कारण, सत्तेच्या विरोधात किंवा नेत्याच्या विरोधात काही चालले नाही ना? हे तपासण्यासाठी लोकांच्या घरात डोकावणे, संशय आला किंवा नाही आला, तरीसुद्धा काही तरी काम करत आहोत, हे दाखवण्यासाठी लोकांच्या वैयक्तिक हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांची सोशल मीडियावरची भूमिका तपासणे, हीच कामे या पार्टीची युवा शाखा करते. त्यामुळे आता लोकांचे विवाह जुळवणे आणि टिकवणे, तसेच जोडप्यांनी मुलांना जन्म द्यावा, यासाठीची माहिती जमवण्याचे आणि त्यावर कार्यवाही करण्याचे कामही युवा शाखा करणार आहे.
 
 
हे कशासाठी? तर, चिनी प्रशासनाला वाटते की, चीनमध्ये जन्मणाऱ्या अधिकृत चिनी बालकांचा जन्मदर कमी झाला आहे. दुसरीकडे चीनमध्ये वृद्धांची संख्या अगणितपणे वाढली आहे. नवीन बाळ जन्माला येते, त्याच्या कितीतरी पटीने मृत्युदर कमी झाला आहे. चीनमध्ये बालक, युवकांपेक्षा वृद्धांची लोकसंख्या जास्त आहे. थोडक्यात, आपला भारत ज्याप्रमाणे युवा देश आहे. त्याचप्रमाणे चीन वृद्धांचा देश आहे. वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळे सध्या चीनची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्याचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये जो हाहाकार माजला, हे त्याचे उत्तम उदाहरण. देशासाठी काम करणारी, लढणारी युवाशक्तीच कमी आहे. तसेच उद्याचे नागरिक बनणाऱ्या नवीन बालकांचा जन्मदर अत्यंत कमी आहे. यामुळे चीन सध्या चिंतेत आहे.
 
 
देशाच्या अजस्र लोकसंख्येला आळा बसावा म्हणून चीनने १९७९ साली एक कायदाच केला. त्यानुसार चीनमध्ये नागरिक एकाच अपत्याला जन्म देऊ शकत होते. या उपक्रमाला शासनाने युद्धपातळीवर राबवले. एकच बालक जन्माला घातल्यामुळे नागरिकांचा खर्च कमी झाला. तो खर्च ते स्वतःसाठी, भौतिक सोयीसुविधा, आरोग्य सुरक्षिततेसाठी करू लागले. त्यामुळे या पालकांचा मृत्युदर कमी झाला. याउलट घरटी एकच बालक जन्माला आल्यामुळे बालकांचाही जन्मदर कमी झाला. चीनला या परिणामाची जाणीव काही वर्षांपूर्वी झाली. त्यामुळे २०१६ साली चिनी प्रशासनाने जाहीर केले की, चीनमध्ये नागरिक दोन अपत्यांना जन्म देऊ शकतात. चीनच्या सामाजिक अभ्यासकांनी चीनला जाणीव करून दिली की, २०१३ साली चीनमध्ये विवाह करणाऱ्या लोकांची संख्या २३.८ दशलक्ष (२ कोटी ३८ लाख) होती, ती २०१९ साली १३.९ दशलक्ष (१ कोटी ३९ लाख) झाली. याचाच अर्थ ६१ लाख लोकांनी विवाह केला नाही. विवाहच नाही, त्यामुळे चिनी संस्कृतीप्रमाणे कायदेशीर मुलंही नाहीत. विवाह न होण्याचे कारण म्हणजे चीनमधला मुलींचा कमी होणारा जन्मदर. मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे आता सध्या चीनमध्ये तीन कोटी पुरुष विवाहासाठी जोडीदार शोधत आहेत. पण, मुलींची संख्या कमी म्हणून जोडीदार मिळत नाही, त्यामुळेच पाकिस्तानमधून तेथील अल्पसंख्याक समाजाच्या मुलींचे अपहरण किंवा सरळ सरळ विक्री करून चीनमध्ये त्यांचा विवाह केला जातो.
 
मागे अनेक जागतिक सामाजिक संघटनांनी हा विषय मांडला होता. चीन आणि पाकिस्तान यांचे राजकीय संबंध कसेही असले, तरी भौतिक आणि सांस्कृतिक संबंधांत दूरान्वयेही साधर्म्य नाही. त्यामुळे चिनी पुरुषाबरोबर विवाह झाल्यावर पाकिस्तानी मुली कैदेचेच जीवन जगतात. असो, यावरूनच कळते की, चीनमध्ये जन्मदर त्यातही मुलींचा जन्मदर हा जटील प्रश्न आहे. चिनी सरकारच्या मते चीनमध्ये जन्मदर कमी झाला किंवा इतर देशातील मुली-सुना म्हणून आल्या, तर चीनच्या संस्कृतीला आणि राष्ट्रनिष्ठेला पुढच्या काळात आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पार्टी यावर काम करणार आहे. मात्र, चीनचा हा प्रश्न काही दिवसांनी भारतालासुद्धा सतावेल, यात शंका नाही.
 
Powered By Sangraha 9.0