राज्यात मंत्र्यांपासून महिला असुरक्षित

11 Feb 2021 15:54:43

mahavikas aghadi_1 &

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व एसआयटी चौकशी करण्याची मागणी

 
 
मुंबई : पुण्याच्या वानवडी परिसरात ९ फेब्रुवारी २०२१ रोजी एका तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे नाव पुढे येत आहे.त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी व या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते अतुल भातखलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहत केली आहे.
 
 
 
अतुल भातखलकर यांनी पत्र लिहत म्हटले आहे की, पुण्याच्या वानवडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव या प्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडिया वर सुरू आहेत, यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत . ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून, या प्रकरणाची तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी ही देखील विनंती भातखलकर यांनी पत्रात केली .
 
 
डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसला आहात अशी भावना सर्वसामान्यांमध्ये
काही दिवसांपूर्वी आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती .  तसेच या मंत्र्यांनी आपली दोन नाबालिक मुले डांबून ठेवली असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आपल्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्यांचे नाव थेट एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणाशी जोडले जात आहे. इतक्या गंभीर प्रकरणांमध्ये आपल्याच मंत्री मंडळातील सहकारी मंत्र्याची नावे पुढे येत असताना आपण डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसला आहात , अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे असे भातखलकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलय .
 
 
महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का ?
 
 
राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांच्या संदर्भातील प्रकरणांमध्ये समोर येत असतील तर महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का  असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी अशी मागणी भातखलकर यांनी उद्धव ठाकरेंना केली.
Powered By Sangraha 9.0