राज्यपाल महाविकास आघाडीला खुपतात का ?

11 Feb 2021 16:44:08
 
 
governor_1  H x
 
 
 
 
 
 
मुंबई : राज्यपालांचा विमानप्रवास नाकारल्यामुळे पुन्हा वाद पेटला आहे. कारण राज्यसरकारने राज्यपालांना सरकारी विमान नाकारले. त्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले .राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. तसेच राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.पण राज्यपालांसोबत हे सरकार सूडबुद्धीने करतंय सरकार हे राज्यपाल खुपतात असे विरोधक म्हणत आहेत.
 
 
उत्तराखंडला हिमकडा कोसळून आलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी आज निघाले होते. माजी मुख्यमंत्री म्हणून ते उत्तराखंडला निघाले होते. त्याकरिता ते सकाळी विमानात बसले. मात्र, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधण्यात आला. परंतु, कोणतेही उत्तर न मिळाल्याने राज्यपालांना विमानातून उतरुन परत माघारी राजभवनावर परतावे लागले. त्यामुळे आता सरकार आणि राज्यपालांमध्ये शीतयुद्ध रंगले आहे
 
खासगी विमानाने रवाना झाले
 
राज्य सरकारने विमान नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले आहे. ते येथे हिमकडा दुर्घटनास्थळाला भेट देणार आहे. राज्यपाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत डेहरादूनला पोहोचणार आहे.
 
 
राज्य सरकारला दिली होती पूर्वकल्पना 
 
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उत्तराखंड दौऱ्याची राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. तरीही राज्य सरकारने राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्यानंतर राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्य सरकारला राज्यपालांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
 
 
या अगोदर विधानपरिषदेच्या १२ जागेवरूनही सुरू आहे वाद 
 
विधानसभेचे अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होत आहे. अवघ्या १५ दिवसांचा अवधी असतानाही अद्याप १२ राज्यपालनियुक्त सदस्यांना मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडीने याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आता विमानप्रवासाच्या नव्या वादाने ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील दरी रुंदावण्याची शक्यता आहे.
 
 
मंदिरे उघडण्यावरूनही झाला होता वाद 
 
राज्यात लॉकडाउन असताना राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या वाद झाला होता. राज्यातील मंदिरे बंद असण्याच्या मुद्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर, हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करत टीका केली होती. तुम्हीही धर्मनिरपेक्ष झालात का अशी विचारणा करत, एकीकडे सरकार बार, रेस्टारंट खुले करत आहे. पण देवीदेवतांची मंदिरे अजून ही बंद आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. हे सार्वजनिकरित्या मान्य करता. अयोध्येला आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात कोश्यारी यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती.
 
राज्यपालांना विमान न दिल्याने भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारची ही सर्वात मोठे अपयश असल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने द्वेष भावनेतून हा निर्णय घेतला असून कोणत्याही राज्याच्या राज्यपालांना विमान सेवा देण्यास नकार दिला जाऊ शकत नाही. राज्याचे प्रथम नागरिक असल्याने तो त्यांचा अधिकार आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी हा विषय गंभीर आहे. यावर चर्चा केली जाईल. राज्यपालांना विमान सेवा देण्यापासून का रोखले, याची चौकशीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
 
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
 
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी असून असा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही. राज्यपाल हा व्यक्ती नाही, तर हे पद आहे. व्यक्ती येतात जातात. खर म्हणजे राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. या प्रकरणात जाणीवपूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यत परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपालांना विमानात बसल्यानंतर उतरावे लागले. हा पोरखेळ आहे, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यांनी म्हटले.
 
 
हा सूड भावनेचा अतिरेक - प्रवीण दरेकर
 
राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंग सिंह कोश्यारी यांना विमानप्रवास नाकारल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सूड भावनेचा अतिरेक झाला असून राज्यपालांना जर विमानात बसू दिले जात नसेल, तर हा संविधानाचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतची माहिती नसेल, असे वाटत नाही, असा टोलादेखील त्यांनी अजित पवारांना लगावला.
 
 
हे सर्वसामान्य जनता पाहत आहे - चंद्रकांत पाटील
 
राज्यपालांना विमाना नाकारणे हे अत्यंत शुद्ध मनाचा छोट्या मनाचा कद्रू मनाचा लक्षण आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तसेच राज्यपालांना खाजगी विमानाने कार्यक्रमाला जावे लागले, हे अत्यंत दुर्देवी असून हे सर्वसामान्य जनता पाहत आहे, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
 
जनता सरकारचा घमंड उतरवेल - आशिष शेलार
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करायला महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारल्याने विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांना सरकारने विमानातून उतरवले, महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारचा घमंड उतरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
सरकारचे स्पष्टीकरण
 
राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. राजभवनाने राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता देण्याविषयी राज्य शासनास विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार परवानगी मागितली जाते व मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात आहे. यानुसार काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही. वस्तूत: राज्यपालांसारख्या महनीय पदावरील व्यक्तींच्या बाबतीत राजभवन सचिवालयाने पुरेशी काळजी घेणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने या प्रकाराबाबत शासनाने देखील गंभीर दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
 
 
काय असते प्रक्रिया -
 
 
राज्यपालांना कोणत्याही दौऱ्यावर जाण्यासाठी विमान हवे असेल तर त्यांना महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपालांच्या दौऱ्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयला देते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात.मात्र या ठिकाणी पूर्वकल्पना राज्यपाल कार्यालय सांगत आहे दिली होती आणि सरकार म्हणतंय नाही दिली .
Powered By Sangraha 9.0