शरजील उस्मानीच्या अटकेसाठी भाजपचे आज ‘मातोश्री’समोर धरणे

10 Feb 2021 11:47:01

sharjiol usmani_1 &n
 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून काढणार 'शांततापूर्ण मोर्चा'

मुंबई: छत्रपती शिवरायांच्या या पावन भूमीत हिंदूंविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या अलिगढ विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या अटकेसाठी भाजप उत्तर भारतीय मोर्चातर्फे बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थान असणार्‍या ‘मातोश्री’समोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
 
 
 
भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे यांनी सांगितले की, “शिवाजी पार्क येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’पर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर शरजील उस्मानी याच्या अटकेच्या मागणीसाठी एका दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हिंदूंच्या वेदना पोहोचवता येतील, तसेच सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून देता येईल,”असे त्यांनी सांगितले.
 
 
 
शरजील उस्मानीविरोधात राज्यभरातून तक्रारी करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0