ज्योतीसम जीवन जगले...

09 Dec 2021 12:53:20
ipin Rawat _1  




नवी दिल्ली :
देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधील कुन्नूर येथे बुधवार, दि. ८ डिसेंबर रोजी अपघात झाला. या अपघातामध्ये ‘सीडीएस’ जनरल रावत, त्यांच्या पत्नी आणि ११ लष्करी अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. भारतीय वायुदलाने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीची बैठकदेखील बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली. केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी संसदेत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले जाणार असल्याची माहिती आहे.
 
 
देशाचे ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत प्रवास करीत असलेल्या ‘एमआय-१७व्ही५’ हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये ‘सीडीएस’ जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर आणि लेफ्टनंट कर्नल दर्जाचे प्रत्येकी एक अधिकारी, हेलिकॉप्टरचे पायलट आणि अन्य लष्करी कर्मचारी अशा १४ जणांचा समावेश होता. भारतीय वायुसेनेतर्फे देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत हे बुधवारी निलगिरी हिल्स, वेलिंग्टन येथील ‘डिफेन्स सर्व्हिस स्टाफ’ कॉलेज येथील प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना संबोधित करण्यासाठी जात होते.
 
 
साधारणपणे दुपारच्या सुमारास भारतीय वायुसेनेच्या ‘एमआय-१७व्ही५’ या हेलिकॉप्टरमध्ये ‘सीडीएस’ आणि अन्य नऊ प्रवाशांचा समावेश, त्यास कुन्नूर येथे दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामध्ये ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमधील ११ अन्य व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (डायरेक्टिंग स्टाफ, डीएसएससी) हे जखमी असून विलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 
 
मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीची बैठक
 
राष्ट्रीय सुरक्षेविषयी निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक समितीची तातडीची बैठक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ७, लोककल्याण मार्ग येथे पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अपघाताच्या घटना आणि पुढील महत्त्वाचे निर्णय याविषयी चर्चा करण्यात आल्याचे समजते.


Powered By Sangraha 9.0