नेव्हर से डाय

07 Dec 2021 13:22:21

never say die.jpg_1 



आपण सगळेच जाणतो की, व्यक्तीच्या आयुष्यात यश हे त्याच्या वृत्ती वा दृष्टिकोनावर अवलंबून असते. नैसर्गिक प्रतिभा महत्त्वाची आहेच. खेळांत काय किंवा इतर गोष्टींमध्ये काय, ‘टॅलेंट्स’ वा प्रतिभा महत्त्वाच्या आहेतच, पण त्याहीपेक्षा अधिक निर्णायक ठरते ते या निसर्गदत्त प्रतिभेला किंवा कौशल्याला तुम्ही किती विधायकरित्या वा उत्साहाने हाताळता! आपण कित्येक माणसांना ‘टॅलेंट’ असूनही त्याचा वापर न करता आल्याने वा संगोपन न करता आल्याने ते ‘टॅलेंट’ तर फुकट गेलेच, पण त्या व्यक्तीही निराशेच्या गर्तेत गेल्या, त्या व्यक्ती कमकुवत ठरल्या आणि शेवटी जीवनाच्या प्रवाहात वाहून गेल्याचे पाहतो.







 बहुधा विशेष प्रतिभा असलेल्या व्यक्ती अनेक असतात, पण त्यातून त्या प्रतिभेला पैलू पाडणार्‍या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतात. इतरांच्या बाबत आपण फक्त उद्गार काढतो की, किती ‘टॅलेंटेड’ होती ही माणसे, पण शेवटी वाया गेली. दुर्दैव आणखी काय? या माणसांना आपल्या प्रतिभेकडे सकारात्मक लक्ष देता आले नाही. जगाच्या सर्वसामान्य व्यवहारात त्यांना जुळवून घेता आले नाही. आपत्कालीन परिस्थितीत स्वत:ला सांभाळून काहींना पुन्हा उभं ठाकणं जमलं नाही. त्यामुळे ती मागे राहिली आणि काहीजणं तर लुप्त झाली. जगाच्या व्यवहारात स्वत:ची प्रतिभा टिकवणं आणि तिचा यथोचित विकास करणं लोकहो, सोप्पं नाही. अनेक अडचणी आणि आव्हानं समोर ठाकतात. मदतीचे हात तोकडे पडतात आणि कधीकधी आपलीच माणसं ओळखही दाखवत नाहीत. आपण अनेक खेळाडू आणि कलाकारांना या मायावी जगात खचलेलं पाहिलं आहे. या लोकांना गरज असते, ती स्वतःला नकारात्मक प्रवृत्तीतून सांभाळून घेऊन सकारात्मक जीवन जगायची. हे शिकायला लागतं. शरीराप्रमाणे मनालासुद्धा यश संपादन करायचं असेल, तर पोषण लागतं. शरीराप्रमाणे ‘मानसिक फिटनेस’सुद्धा विकसित करायला लागतो. खेळासारख्या क्षेत्रात क्षणाक्षणाला झगडत अंतिम विजय मिळवायचा असेल, तर खेळतंत्राबरोबर गरज असते, ती अदम्य इच्छाशक्तीची, ‘नेव्हर से डाय’ प्रवृत्तीची.


 
भारतीय क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी आपल्या संघाचा सहकप्तान विराट कोहली आणि आपल्या सगळ्यांचा आवडता उत्साहमूर्ती कपिलदेव यांच्यात असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धावांचा विलक्षण हमरातुमरीने पाठलाग करीत यशश्री आपल्या बाजूने खेचत आणण्याच्या दुर्घट प्रवृत्ती आणि असीमित आत्मविश्वास यामधील समानतेचा तेवढा उल्लेख केला होता. या दोघांमध्ये अदम्य इच्छाशक्ती आणि आवश्यक असलेली आक्रमक ऊर्जा असल्याने ते क्षितिजापलीकडून विजयश्री खेचून आणू शकतात. विराट आज जगातील एक सुप्रसिद्ध सक्षम फलंदाज आहे. तो फीट तर आहेच, पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर तो मैदानावरचे चित्रच बदलून टाकतो. त्याचा सध्याचा ‘रनरेट’ दृष्ट लागण्यासारखा तुफान आहे. पण रसिक क्रिकेटप्रेमींना भावते ती त्याच्या नसनसांत भिनलेली कोलंबसची वृत्ती, जी खुल्या सागराला ठणकावते. कुसुमाग्रजांच्या मुक्त लेखणीतून ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’ खेळाडूंची हीच दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना अफाट अवकाशात भरारी घेण्यास शिकविते. या जबरदस्त भारदस्त ओळीतून एका जगप्रसिद्ध टेनिसपटूची आठवण येते.



‘नेव्हर से डाय’ या उक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्बियाच्या नोवाक जोकोविक या टेनिसपटूला जग ओळखते. टेनिसमधील एक अजरामर खेळाडू बोरीस बेकर हा नोवाकचा काहीकाळ प्रशिक्षक होता. विसाव्या ग्रॅण्ड स्लॅमकडे मार्गक्रमण करणार्‍या नोवाक जोकोविकबद्दल बेकर म्हणतो, “या खेळाडूला आपल्या खेळाच्या रणांगणात अंतिम क्षणापर्यंत युद्ध कसे लढायचे, हे चांगलेच माहीत आहे.” त्यांच्या मते, हा एक विलक्षण माणूस आहे. त्याच्या जीवनातील एक अचंबित करणार्‍या पैलूबद्दल बेकर म्हणतो, “सर्वसामान्य जीवनात अत्यंत प्रेमळ, भावूक आणि मोहक असा नोवाक खेळाच्या स्पर्धेतदुसराच कोणीतरी असतो. खेळाच्या टेनिस कोर्टात तो रोबोटिक मशीनसारखा अत्यंत रूक्ष आणि निर्दयपणे वावरताना दिसतो.” जिथे युद्ध करायचे, तर ते जिंकण्यासाठीच करायचे, असा जगज्जेत्याचा उत्तुंग ध्येयवाद आणि दुर्दम्य आशावादाचा आविष्कार म्हणजेच टेनिसपटू नोवाक जोकोविक, ‘नेव्हर से डाय’ वृृत्तीचा.



टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये हरियाणाच्या सुमित आंतिलने सुवर्णपदक मिळवून इतिहास घडविला. लहानपणी पहिलवान बनून राष्ट्रीय पातळीवर नाव मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍या सुमितला नियतीने जबरदस्त धक्का दिला होता. २०१७ साली एका दुर्घटनेत त्याने आपला एक पाय गमावला, पण निराशेच्या भोवर्‍यात न अडकता भारतमातेच्या या सुपुत्राने आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आयुष्याला एक सुखद मार्ग दाखवला. हार न मानता त्याने भालाफेकीत आपल्यातल्या खेळाडूला जागवले आणि टोकियोत फेकला तो जागतिक नवीन रेकॉर्ड करणारा सुवर्णभाला. शिवाय काही मिनिटांतच त्याने तीन ‘विश्वविक्रम’ केले. कुठून अशी दिव्यशक्ती सुमितने मिळवली, याच ‘पॅरालिम्पिक’मध्ये अवनी लखेडा हिने केवळ १९व्या वर्षात शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. २०१२ साली ती अपघातात पंगू झाली, पण नियतीचा निर्णय तिने खंबीरपणे स्वीकारला. ‘जिएंगे तो और भी लडेंगे’ हा तिचा बाणा होता. तिनेही रायफल शूटिंगचे नवीन उच्चांक केले. पॅरालिम्पिक खेळाडूंंची तयारी पाहिली, तर ती सर्वसामान्यांना एक सुंदर ऊर्जा आणि जगण्याची सकारात्मकता देते. त्यांचा जीवनप्रवास अदम्य इच्छाशक्तीचा अनाकलनीय आविष्कार आहे, जोवर मी जिंकत नाही तोवर शर्यत संपणार नाही, असा अचंबित करणारा, आकाशाला गवसणी घालणारा आशावाद ज्यांच्या आत्म्यात रुंजी घालतो, त्यांना कसली आली आहे बंधनात अडवणारी सीमारेषा? पुढच्या लेखात हा असीमित, दुर्दम्य आशावाद कसा जगवायचा हे पाहूया.
(क्रमशः)



- डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0