नवी दिल्ली : आगामी 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार अमेरिकेच्या 'कॅपिटल हिल'मध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी चित्रिकरणादरम्यानचे काही अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले. यावेळी ९०च्या दशकात काश्मिरी पंडितांसोबत काय झाले? हे सांगताना अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या की, "चित्रपटाच्या सुरुवातीला आम्हाला काही पीडितांच्या मुलाखती घेतल्या. यादरम्यान एका पीडितेने सांगितले की काश्मीरमध्ये माझ्या वडिलांचे १५ तुकडे करण्यात आले आणि ते बॅगेत भरून ती बॅग झेलमच्या काठावर फेकली."
अभिनेत्री पल्लवी जोशी या अनुभव सांगताना म्हंटले की, "आम्ही सर्वांनी एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अमेरिकेच्या ट्रीपवर आला. परत आल्यावर तो म्हणाला की आपण काश्मीरवर चित्रपट बनवणार आहोत. त्याने सांगितले की, आपण काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवणार आहोत. यानंतर विवेकने काश्मिरी पंडितांच्या कथा सांगितल्या. त्यावर आम्ही संशोधन सुरू केले. यावरून आम्हाला काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीचा अनुभव आला."
पुढे त्या म्हणाल्या की, "आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांना आणि ज्यांना या हत्याकांडाचा सामना करावा लागला त्यांना भेटलो. डॉ. सुरेंदर कौर यांनी आम्हाला अमेरिकेत येऊन काश्मिरी पंडितांना भेटण्यास सांगितले. चित्रपटासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर काश्मिरी पंडितांच्या मुलाखती घेण्याचे ठरवले." त्यानंतर एका विदारक अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, "मला माझी पहिली मुलाखत आठवते. जेव्हा आम्ही एका घरी मुलाखतीसाठी गेलो तेव्हा महिलेने सांगितले की, माझ्या वडिलांचे १५ तुकडे करून ते एका बॅगेत भरून झेलम नदीच्या काठावर फेकून दिले. आम्ही रोज ४-५ मुलाखती घेतल्या. ते भयानक होते. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. मी विवेकला सांगितले की मी हे करू शकणार नाही. पण तो आमच्या संशोधनाचा भाग होता आणि आम्ही ते केले."
पुढे त्यांनी सांगितले की, "सर्व अभ्यास केल्यानंतर आम्ही ठरवले की हा प्रोजेक्ट आम्हाला करायचाच आहे. फक्त एक प्रोजेक्ट म्हणून नाही तर ३० वर्षांपूर्वी काय घडले ते आम्ही सांगू शकू म्हणून. काश्मीरचे सत्य जगाला दाखवायचे ठरवले. आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा त्यातील प्रत्येक दृश्य सत्य घटनांवर आधारित आहे. त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या काश्मिरी कुटुंबांच्या आत्म्याला आम्ही सलाम करतो."