उद्योजक विश्वाची आंबेडकरी प्रेरणा

05 Dec 2021 20:20:30

ambedkar 51.jpg_1 &n
 




भारतीय समाजकारणात उद्योगविश्व समृद्ध व्हावं, यासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या तत्त्व आणि कार्यप्रणालीशी सुसंगत उद्योजकता वाढीस लागावी, यासाठीचे काम ‘ट्रान्सग्लोबल इंटरप्रेन्युअर चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चर’ करते. उद्योजकांपुढे असलेल्या आवहानांना सामोरे जाण्याचे बळ चेंबर्स देते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांचा वारसा घेऊन कार्य करणार्‍या या कंपनीचे अध्यक्ष आणि ‘सीएमडी’ आहेत चंद्रकांत जगताप. त्यांच्या उद्यमशीलतेचा इथे घेतलेला आढावा...


 
कोणतीही चळवळ आर्थिक सक्षमता आल्याशिवाय उभारता येत नाही. व्यक्तिगत पातळीवरील यशाला आपण सामाजिक यश समजून इतरांच्या पालख्या वाहण्यात आयुष्य घालवतो आणि शेवटी हाती येते, ते अपयश! त्यामुळे नोकरीच्या शोधात न पडता व्यवसायामध्ये उतरा थेट, पण थेट यश नक्की मिळेल. हा बाबासाहेबांचा आर्थिक विचार मनाला भावला आणि व्यवसायामध्ये प्रवेश करावा, असे वाटले,” असे चंद्रकांत जगताप यांचे म्हणणे आहे. मूळ सातार्‍याचे जगताप कुटुंब. कोंडिबा जगताप हे साधारण १०० वर्षांपूर्वी मुंबईत आले. बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी झालेले कोंडिबा हे चंद्रकांत यांचे आजोबा, तर भिकाजी हे वडील आणि आई शारदा. आंबेडकरी विचारांचा आणि चळवळीचा समर्थ वारसा लाभलेले जगताप कुटुंब. भिकाजी हे सरकारी कर्मचारी होते. जगताप कुटुंबाला तीन अपत्ये. त्यापैकी एक चंद्रकांत. आजोबा कोंडिबा चंद्रकांत यांना बाबासाहेबांसोबत केलेल्या चळवळी आंदोलन यांच्या कथा सांगत. त्यात महाडच्या चवदार तळ्याची कथा, तर असेच असे. आजोबा सांगत, “बघ एक रक्ताचा थेंबही न सांडता बाबासाहेबांनी समाजक्रांती केली. नुकसान, हिंसा, मारधाड असे, बाबासाहेबांनी कुणालाही काहीही करायला कधीही सांगितले नाही.





बाबासाहेब नेहमी म्हणायचे, ‘शिका, सत्ताधारी व्हा, आर्थिक सक्षम बना,इ तरच उरलेल्या समाजाचे भले करू शकाल.’ आजोबांचे सांगणे चंद्रकांत यांच्या हृदयपटलावर कायमचे कोरले गेले. त्यातच आजोबांनी छोट्या चंद्रकांत यांना वाचनाची गोडी लावली. धनंजय किर यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे चरित्र चंद्रकात यांनी वाचले. त्यावेळी त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणेने ते अक्षरशः झपाटले. पण त्याच नकळत्या वयात त्यांच्या मनाने निर्णय घेतला की, आपण लेखक-साहित्यिक बनायचे. मात्र, आयुष्यात काहीतरी वेगळे घडणार होते.ते लहान असताना शाळेत त्यांना शिष्यवृत्ती मिळायची. एकदा एक शिक्षक भर वर्गात छोट्या चंद्रकांतना म्हणाले, “तुला काय सगळं फुकट मिळतं.” हे ऐकून चंद्रकांत यांच्या बालमनावर खूप परिणाम झाला. आपण स्वकष्टाने स्वत:चे स्थान तयार करायचे आणि आपल्यासोबत दुसर्‍यांनाही स्थान मिळवून द्यायचेच, असा निश्चय त्यांनी केला. घरी तशी आर्थिक आणि सांस्कृतिक सुबत्ता होतीच. दहावीनंतर त्यांनी कला शाखा निवडली. पुढे पत्रकारितेचे शिक्षणही घेतले. त्यांच्या घराशेजारी ‘सिद्धार्थविहार’ होते. तिथे समाजचळवळीतले कार्यकर्ते, नेते यांचे बस्तानच असे.




 
तसेच ते स्वतःसामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयात शिकले होते. चळवळीच्या माध्यमातून त्यांचा संपर्क राजाभाऊ ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार यांच्याशी झालाच होता. समाजाचे एकंदर वास्तव त्यांनी जवळून पाहिले. हीच संवेदनशीलता घेऊन काही वर्षे त्यांनी प्रसारमाध्यमांमध्ये कामही केले. प्रसिद्ध अशा ‘प्रिंट’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक’ मीडियामध्ये काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. पण हे करत असताना समाजातले वास्तव आणि शोकांतिका त्यांना अस्वस्थ करून जात होती. समाजप्रवाहातून दूर सारले गेलेले गट, त्यांचे शोषण, त्यांच्यावर होणारा अन्याय आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी होणारी फरफट हे सगळे पाहत असताना एका क्षणी चंद्रकांत यांनी प्रसारमाध्यमांतले काम सोडले. ‘इंटरनॅशनल आंबेकरराईट मूव्हमेंट’ तसेच ‘पॅबू’सारख्या संस्थांशी ते जोडले गेले. संस्थेतर्फे १२ वर्षे ते लंडनला राहिले. जागतिक स्तरावर आंबेडकरांचे विचार विविध माध्यमातून पोहोचावे, त्यासाठी जगभरच्या समविचारी संस्थांशी समन्वय साधावा, हे काम ते करू लागले. ‘पॅबू’ संस्थेचे अध्यक्ष गौतम चक्रवर्ती हे लंडनलाच राहायचे. ८० वर्षांच्या गौतम यांनी आयुष्यातली ६० वर्षे शोषित, वंचित पिढीतील युवक, उद्योजक घडावे, यासाठी खर्ची घातलेली! त्यांचा संघर्ष आणि कार्य यामुळेही चंद्रकांतना वाटू लागले की, आपणही आपल्या देशातील बांधवांना उद्योेजकतेसाठी प्रेरित करावे, सहकार्य करावे. त्यातच लंडनच्या एका कार्यक्रमात त्यांची भेट रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी झाली. त्यावेळी भारतातील युवकांच्या रोजगारसंदर्भातील संघटन करण्याविषयी त्यांनी चर्चा केली. चंद्रकांत पुढेे भारतात परतले.
 
भारतातील युवक मेहनती आहेत. योग्य सहकार्य आणि तंत्रज्ञानाची मदत मिळाली,तर ते यशस्वी उद्योजक होऊ शकतात, असे चंद्रकांत यांना वाटू लागले. त्यातूनच मग त्यांनी ‘ट्रान्सग्लोबल इंटरप्रेन्युअर चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चर’ची निर्मिती केली. समाजाच्या वाणिज्य, कला, विज्ञान, खेळ, शिक्षण, संशोधन, सामाजिक कल्याण, धार्मिक, धर्मदाय, पर्यावरण संरक्षण, व्यवसायिक, आंतरराष्ट्रीय व्यापार व आयात-निर्यात आणि इतर अनुषंगाने केले गेलेले व्यावसायिक नाते या सर्व बाबींचा प्रामुख्याने उद्देश व धोरण म्हणून संस्थेने स्वीकार केला. संघटित व असंघटित असे दोन विभाग देशाची अर्थव्यवस्था चालवत असतात. असंघटित हे बदली ड्रायव्हर, विक्रेते, फुटपाथ विक्रेते, हातगाडी विक्रेते, फिरून विकणारे, चारचाकी, तीनचाकी, दुचाकी भाड्याने देणारे, पारंपरिक व्यवसाय करणारे, घरोघरी जाऊन पेपर टाकणारे, दुकान नसणारे इलेक्ट्रिशियन इ. यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आर्थिक विकास करण्याचे प्रयत्न संस्था करते. चेंबर हा उद्योजक व शेतकरी यांच्यासोबत व त्यांना जोडून घेऊन काम करणारा आहे. त्यामुळे आपण उद्योजक व शेतकरी यांना जोडून घेण्यासाठी आपले पत्रक, अर्ज, सभासद शुल्क, सभासद नियम इ. बाबी ठरविलेल्या आहे. परिसंवाद, प्रशिक्षण शिबीर या माध्यमांतून संस्था अत्यंत माफक शुल्कामध्ये उद्योजक होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीस संपूर्ण प्रशिक्षण देते.





त्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेल्या व्यवसायासंदर्भात संपूर्ण माहिती, प्रत्यक्ष आणि तांत्रिक प्रशिक्षण, रोजगारासंदर्भातल्या संधी वगैरे अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. गेल्या दोन वर्षांत संस्थेने ११ यशस्वी उद्योजक घडवले आहेत. याचे सगळे श्रेय चंद्रकांत डॉ. बाबासाहेबांना देतात. ते म्हणतात, “शिक्षणाचे महत्त्व कळल्यामुळे स्वतः उच्च विद्याविभूषित होऊन बाबासाहेबांनी समाजातील अनेक होतकरू गोरगरिबांच्या मुलांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.” व्यवसायातल्या समस्या मांडताना ते म्हणतात की,“ ‘ट्रान्सग्लोबल इंटरप्रेन्युअर चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चर’द्वारे व्यवसायाला सुरुवात केली. सदर व्यवसाय करताना अनेक अडचणी आल्या. विशेष आणि महत्त्वाची अडचण म्हणजे, व्यवसायामध्ये प्रवेश केला खरा, पण तांत्रिकरित्या परिपूर्ण कसे होता येईल याची माहिती नव्हती. त्यामुळे सरकारी तसेच खासगी कंपन्यांसोबत व्यावसायिक करार होऊ शकत नव्हता. तसेच सुरुवातीला जनसंपर्क कमी असल्याने लोकांपर्यंत पोहोचता आले नाही. पण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि परिपूर्णता आल्याने आज व्यवसायामध्ये सुसूत्रता आणि प्रवास सुखकर सुरू आहे.





 
चेंबर्सच्या माध्यमातून उद्योग-व्यवसाय उभारू पाहणार्‍या तरुणांनी व्यवसायातील यश-अपयशाला हुरळून किंवा खचून न जाता स्थिरपणे मार्गक्रमण करत राहावे, यासाठी ‘ट्रान्सग्लोबल’ काळजी घेते. चंद्रकांत याबाबत सांगतात की, स्वातंत्र्यपूर्व काळात मागासवर्गीय मराठी भाषिक उद्योगात पुढे नव्हताच. मात्र, पंजाबी आणि गुजराती भाषिक त्याही काळात काही ना काही उद्योग-व्यवसाय करायचे. यांच्याशी संवाद साधताना बाबासाहेब म्हणाले होते की, “आपण स्थानिक स्तरावरच उद्योगाची स्वप्न न बघता देशाबाहेरची क्षेत्रेही काबीज करा. आर्थिक सक्षम व्हा. देशालाही आर्थिक सक्षम बनवा.” बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कितीतरी पंजाबी आणि गुजराती कुटुंब परदेशात गेली. तिथे उद्योग-व्यवसायात स्थिर झाली. हा इतिहास सध्याच्या व्यावसायिकांनी विसरू नये. त्यामुळेच की काय, स्थानिक उद्योजकांनी केवळ स्थानिक स्तरावरच न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या उद्योगाचा विस्तार व्हावा, हे ‘ट्रान्सग्लोबल’चे ध्येय आहे.





 
Powered By Sangraha 9.0