आयआयटी खरगपूरच्या 2022 सालच्या दिनदर्शिकेमध्ये आर्य – द्रविड वादाची चिरफाड

30 Dec 2021 19:55:16
iit

डाव्या विचारांचा पगडा झुगारून देण्यात यश
 
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : भारतीय तज्ज्ञांनी पुराव्यानिशी खोटा ठरलेला आर्य आक्रमणाचा सिद्धांत, पाश्चात्त्यांनी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला आर्य – द्रविड सिद्धांत, वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृतीचे तत्त्वज्ञान याविषयी सविस्तर माहिती देणारी दिनदर्शिका भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी – खरगपूरने प्रकाशित केली आहे. यामुळे प्रामुख्याने डाव्यांना पोटशूळ उठला आहे.
 
 
आयआयटी खरगपूरने आपल्या 2022 सालच्या दिनदर्शिकेमध्ये प्रत्येक महिन्याच्या पानावर भारतीयत्व प्रस्थापित करणारी माहिती प्रसिद्ध केली आहे. दिनदर्शिकेच्या प्रारंभी म्हणजे जानेवारी महिन्याच्या पानावर कैलास पर्वताचे चित्र असून ही भारतीय संस्कृतीमधील एक पवित्र स्थान असल्याचे उधृत केले आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा विकास ज्या नद्यांच्या काठावर झाला, त्यांचे उगमस्थान असलेला कैलास पर्वत, पूर्व हडप्पा अर्थात सिंधु संस्कृतीचे उगमस्थान असलेली सिंधू नदीसह ऋग्वेदात उल्लेख असलेल्या अनेक नद्यांचे उगमस्थान कैलास पर्वत व परिसर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
 
iitk 
 
 
फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वस्तिक चिन्हाद्वारे कालचक्र आणि पुनर्जन्माविषयी भाष्य करण्यात आले आहे. स्वस्तिकाचा आकार हा नॉन – लिनियर आणि सायक्लिक आहे, त्याद्वारे केली जाणारी भविष्य आणि भुतकाळाची जाणीव आणि त्याद्वारे वैदिक ज्ञानाच्या मुळाशी काळ, अंतराळ आणि कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढे मार्च महिन्यामध्ये काळ – वेळ आणि कार्याचा सिद्धांत, एप्रिलमध्ये नॉन लाईनर फ्लो आणि बदलाचा सिद्धांत, मे महिन्यामध्ये स्वामी विवेकानंदाचे तत्वज्ञान मांडण्यात आले आहे. जून महिन्यात रामायणामधील ऋष्यश्रृंग ऋषी, वैदिक साहित्यात उल्लेख असणारा एकशिंगी घोडा आणि हडप्पा संस्कृतीमध्ये असलेला एकशिंगी प्राणी यातील साम्याविषयी चर्चा करण्यात आली आहे. जुलै महिन्यात कॉस्मिक निर्माण व देवीसुक्त आणि रात्रीसुक्तामधील साम्य, ऑगस्टमध्ये जुळ्या अश्विनकुमारांचा संदर्भ देण्यात आला आहे.
 
 
 
दिनदर्शिकेमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या शेवटच्या चार महिन्यांमध्ये योगी अरविंद यांनी नाकारलेला आर्य आक्रमणाचा सिद्धांत, भारतीयांवर लादण्यात आलेला आर्य आक्रमण सिद्धांत, मॅक्समुलर, ऑर्थर दे गोबिनायऊ आणि हॉस्टन स्टीवर्ट चेम्बरलेन यांचे योगदान आणि पाश्चात्त्यांनी, प्रामुख्याने युरोपातील कथित अभ्यासकांनी आर्य आक्रमणाचा मांडलेला सिद्धांत आणि त्याचाच आधार घेऊन हिटलरने ज्यू वंशाचा केलेला नरसंहार याकडे लक्ष वेधले आहे.
 
 
kiit 
 
 
पाश्चात्य इतिहासाकारांनी भारतीयांचे दमन करण्याच्या हेतूने भारतात आर्य बाहेरून आल्याचा म्हणजेच आर्य आक्रमणाचा सिद्धांत मांडला. त्याचप्रमाणे काल्पनिक आर्य – द्रविड सिद्धांत निर्माण करून उत्तर विरुद्ध दक्षिण भारत असा वाद निर्माण केला, त्यासोबतच वैदिक आणि सिंधु संस्कृतीविषयी मोठ्या प्रमाणावर खोटे आणि दिशाभूल करणारे संशोधन दीर्घकाळपर्यंत देशात प्रसारित करण्यामध्ये पाश्चात्त्यांच्या बरोबरीने डाव्या विचारांचे कथित अभ्यासक, संशोधक आणि प्राध्यापकही आघाडीवर होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे सत्य पुढे आणण्यास प्रारंभ झाला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0