खलिस्तानी गायक मूसवालाचा पंजाब काॅंग्रेसमध्ये प्रवेश; सिद्धूंचा खरा चेहरा उघड

03 Dec 2021 16:40:56
congress_1  H x


अमृतसर
- खलिस्तानबद्दल सहानुभूती असलेला वादग्रस्त पंजाबी गायक सिद्धू मूसवालाने काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मूसवाला यांनी शुक्रवारी (3 डिसेंबर) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षात सामील झाल्यानंतर माध्यमांना संबोधित करताना मुसेवाला म्हणाले की, "पंजाबींचा आवाज बुलंद करण्यासाठी" मी राजकारणात प्रवेश केला आहे.

सिद्धू मूसवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू असून ते मूळचे मानसा जिल्ह्यातील मुसा गावचे आहेत. मूसवाला यांच्यावर त्यांच्या गाण्यांमध्ये हिंसा आणि बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुसेवाला यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढेच नाही तर कोरोना महामारीच्या काळात फायरिंग रेंजमध्ये एके-47 ने गोळीबार करतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मुसेवाला यांच्यावर आणखी एका प्रकरणात आरोप ठेवण्यात आले. सिद्धू मुसेवाला हीच व्यक्ती आहे, ज्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ज्यामुळे अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या. मुसेवाला हा खलिस्तान समर्थक आणि खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचा चाहता आहे.

प्रजासत्ताक दिनी खलिस्तान समर्थकांच्या जमावाने लाल किल्ल्यावर शीख ध्वज फडकवल्याने 'शेतकऱ्यांच्या निषेधाचा' खलिस्तानी चेहरा समोर आला. हा खलिस्तानी ध्वज नसून फक्त शीख ध्वज असल्याचा दावा काही लोक करत असले, तरी हा ध्वज पंजाबी गायक दीप सिद्धू आणि त्याच्या लोकांनी लावला होता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. दीप सिद्धू हा एक प्रसिद्ध खलिस्तानी आहे. शेतकरी आंदोलनांमध्ये खलिस्तानी विचारसरणीला हवा देण्यात सिद्धू मुसेवालासारख्या गायकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सिद्धू मूसवाला यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान एक गाणे गायले होते, ज्याद्वारे त्यांनी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवालेचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर नवज्योतसिंग सिद्धू यांनी मूसवालाचे युथ आयकॉन म्हणून स्वागत केले. मात्र, मुसेवाला यांचा काँग्रेसमध्ये समावेश झाल्यानंतर काँग्रेस आता फुटीरतावाद आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी उघड्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.


Powered By Sangraha 9.0