‘शिनजियांग पेपर्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2021   
Total Views |

china_1  H x W:
 
 
चीनमधील उघूर मुसलमानांवर होणाऱ्या घृणास्पद अन्याय-अत्याचारांविरोधात जगभरातील पाश्चात्त्य देशांनी वेळोवेळी चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ‘आम्ही कुणाला जुमानत नाही’, ‘आम्ही कोणालाही उत्तरदायी नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत चीनने वारंवार उघूरांच्या नृशंस हत्याकांडाला केराची टोपलीच दाखविली. उघूरांवरील चिनी अत्याचारांची कुकृत्ये यापूर्वीही बरेचदा अनेक अहवालांतून, काही सुखरुप सुटका करुन घेतलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून जगासमोरही आली. पण, तरीही उघूरांवरील या अमानवीय अत्याचारांना चीनने ‘समुपदेशन’ आणि ‘संस्कृती बदल’सारखे गोंडस नाव देऊन त्यावर कायमच पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. खरंतर चीनच्या या हत्याकांडांमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा शी जिनपिंगयांचाही सहभाग तसा उघडच! कारण, त्यांच्या आदेशाशिवाय चीनमध्ये साधे पानदेखील हलत नाही, तिथे उघूरांची म्हणा काय गत! त्यामुळे फक्त जिनपिंगच नाही, तर पंतप्रधान ली केकियांग आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या इतरही नेत्यांचे हात उघूरांच्या रक्ताने माखले आहेत. खरंतर हे तसे ढळढळीत सत्य, पण यापूर्वी त्यावर शिक्कामोर्तब होईल, असे कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नव्हते. परंतु, आता उघूरांच्या या नरसंहारात चिनी नेत्यांचा प्रत्यक्ष सहभाग ‘शिनजियांग पेपर्स’च्या नावाखाली आता जगासमोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिनी षड्यंत्राचा पदार्फाश झाला असला तरी चीनने मात्र नेहमीप्रमाणे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
 
या दस्ताऐवजांतून बाहेर आलेल्या माहितीनुसार, २०१४ साली जिनपिंग यांच्यासह कित्येक चिनी नेत्यांच्या भडकाऊ भाषणांमुळेच उघूरांवरील अत्याचारांना खतपाणी घातले गेले. एवढेच नाही, तर ‘सीसीपी’च्या ज्येष्ठ नेत्यांनीच कशाप्रकारे उघूरांना मृत्यूच्या दरीत लोटले, याचा इत्यंभूत तपशील या दस्ताऐवजांमधून समोर येतो. तसेच उघूरांच्या पिढ्यांच्या पिढ्या कशा कायमस्वरुपी नष्ट होतील, याची तजवीजही चीन सरकारने अगदी पद्धतशीरपणे केली. यामध्ये उघूर पुरुषांना त्यांच्या कुटुंबापासून मुद्दाम वेगळे करणे, त्यांना वेठबिगारीच्या, शारीरिक श्रमाच्या कामांना जुंपणे, उघूर महिलांची बळजबरीने शस्त्रक्रिया करुन त्यांचा वंशच वाढणार नाही, यांसारख्या जालीम उपायांचा अवलंब चीन सरकारतर्फे वेळोवेळी करण्यात आला. तसेच उघूरांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबापासून कायमस्वरुपी दूर करणे, त्यांना चिनी ’हान’ वंशाची शिकवण, प्रथा-परंपरांचे पालन करण्यासाठी बळजबरी करणे इत्यादी अघोरी प्रकारांचादेखील समावेश आहे. पण, चीनने मात्र ‘तो मी नव्हेच’ म्हणत कायमच उघूरांवरील अत्याचारांचा साफ इन्कार केला. उलट ‘आम्ही त्यांच्यात सुधारणा करीत आहोत, त्यांना पुनर्शिक्षित करीत आहोत, त्यांना दहशतवादाच्या कट्टरपंथी विषवल्लीपासून दूर लोटत आहोत,’ यांसारखे असत्य दावे करुन या चिंताजनक नरसंहारावर पांघरुण घालण्याचाच उद्योग वेळोवेळी ड्रॅगनने केला.
 
 
‘शिनजियांग पेपर्स’मध्ये केलेल्या दाव्यानुसार उघूरांवर अशाप्रकारे वरवंटा फिरवण्यामागेही चिनी उद्योगाचे गणितच कारणीभूत असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आले आहे. जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बीआरओ’ प्रकल्पांतर्गत चीनच्या पश्चिम सीमावर्ती भागातील शिनजियांग प्रांत हा मुस्लीमबहुलतेमुळे अडचणीचा ठरु शकतो. तसेच शेजारी पाकिस्तानातून इस्लामिक कट्टरवादाची मूळं या प्रांतातही रुजली, तर ‘बीआरओ’चे प्रकल्प रेटणे चीनसाठी एक मोठी डोकेदुखी ठरेल. तेव्हा, पाकिस्तानातील ग्वादर प्रकल्पाशी जोडणारा मार्ग हा शिनजियांगमधूनच जात असल्यामुळे जिनपिंग यांच्याच आदेशान्वये उघूरांचे रक्त सांडण्यात आले. अमेरिकाच नाही, तर कॅनडा, नेदरलँड्स यांसारख्या देशांनी यापूर्वी बरेचदा उघूरांवरील अत्याचारांवरुन चीनला दोषी ठरविले आहे. इतकेच नाही अमेरिकेने चीनवर तीव्र निर्बंधही लादले. परंतु, या जागतिक विरोधाचा, निर्बंधांचा तीळमात्रही परिणाम चीनच्या उघूरविषयक धोरणांवर झाला नाहीच. भविष्यातही असे शेकडो ‘शिनजियांग पेपर्स’ आणि उघूरांवरील अत्याचारांचे जघन्य अपराध जरी समोर आले तरी, चीन आंतरराष्ट्रीय जगताला जुमानेल, याची शक्यता धुसरच! तेव्हा, चीनमधील उघूरांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पाश्चिमात्त्य देशांबरोबरच इस्लामिक देशांनीही पुढाकार घेऊन त्यांच्या तथाकथित ‘उम्मा’ची ताकद दाखवून चीनला झुकवूनच दाखवावे!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@