विमाने आणि विमानतळांवर वाजणार भारतीय संगीत

29 Dec 2021 18:16:14
music_1


डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रयत्नांना यश
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : विमाने आणि विमानतळांवर भारतीय संगीत वाजविण्यात यावे, अशी मागणी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून करण्यात आली होती. त्या मागणीस केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
 
 
जगभरात बहुतांश विमानांमध्ये संबंधित देशातील सर्वोत्कृष्ट संगीत वाजवले जाते. अमेरिकन एयरलाईन्समध्ये 'जॅझ', ऑस्ट्रियन एअरलाईन्स मध्ये 'मोझार्ट' तसेच मध्यपूर्वेकडील एअरलाईन्स मध्ये अरब संगीत वाजवले जाते. मात्र, समृद्ध परंपरा असलेले भारतीय संगीत भारतीय विमाने आणि विमानतळांवर वाजविले जात नाही. त्यामुळे भारतातील विमानसेवा तसेच भारतीय विमानतळावरून संचालित केल्या जाणाऱ्या विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवण्यात यावे, अशी मागणी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील संगीतकार – गायक यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सिंधिया यांना नुकतेच दिले होते.
 
 
केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला असून देशातील विमानतळांसह विमानांमध्ये भारतीय संगीत वाजवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव उषा पाधी यांनी विमान वाहतूक संचालनालयाचे (डीजीसीए) प्रमुख अरुण कुमार तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) तसे पत्र पाठवले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0