भय इथले संपत नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2021   
Total Views |

Taliban _1ऑगस्ट महिन्यात तालिबानने हळूहळू अफगाणिस्तान गिळंकृत केले. त्यानंतर तिथे जे काही अराजक माजले, ते अख्ख्या जगाने विविध माध्यमांतून पाहिले, वाचले. तालिबानच्या अधिपत्याखाली आलेला हा देश जणू आता आपला नाहीच, म्हणून परकीयांनी आक्रमण केल्याप्रमाणे अफगाणी नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आपल्याच देशातून पलायन करण्यासाठी जीवाचे अक्षरश: रान केले. काहींनी तर चक्क ट्रकप्रमाणे विमानावर चढून आपला जीवही गमावला. पण, त्या अनागोंदीतून दिसून आली ती सामान्य अफगाणी माणसाची अगतिकता अन् हतबलता.
 
 
आता आपण आपल्याच देशात असलो तरी जणू कैदेत असल्याप्रमाणे जीवन व्यथित करावे लागणार, या भावनेनेच अफगाणी नागरिकांचा जीव गुदमरायला सुरुवात झाली. त्यातही आधीच्या तालिबान राजवटीचा काळा काळ लक्षात घेता, अफगाणी महिलांची परिस्थिती अधिक असहनीय होणार, ही काळ्या दगडावरची रेष होतीच आणि झालेही तसेच! तालिबानला सत्ता ओरबाडून पाच महिने उलटल्यानंतरही अफगाणिस्तान अस्थिरतेच्या गर्तेतच आहे. खासकरुन महिला आणि बालकांची परिस्थिती ही अजूनही बिकट असून, त्यात सुधारणा सोडा, आता आणखीन कठोर निर्बंधांचीच भर पडलेली दिसते.
 
 
तालिबानराजची अफगाणिस्तानमध्ये टांगती तलवार असल्यापासूनच महिलांच्या स्वातंत्र्याची आणि हक्कांची गळचेपी होणार, याबाबत आशंका होती आणि झालेही म्हणा तसेच! खरंतर अफगाणिस्तानमधून आलेल्या वृत्तानुसार, तेथील महिलांनी स्वेच्छेने घराबाहेर निघणेच बंद केले. ज्या महिला आपल्या न्याय-हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या, त्यांनाही तालिबानच्या कडक शिक्षांना सामोरे जावे लागले.
 
 
त्यामुळे अगदी लहान बालिकांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत तालिबानच्या या क्रूर राज्यात आज कोणीच सुरक्षित नाही, स्वछंदी नाही. म्हणूनच तालिबानच्या नव्या नियमांनुसार, ७२ किमीपेक्षा जास्तचे अंतर यापुढे महिलांना एकट्याने कापता येणार नाही. त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणे हे अनिवार्य असेल. खरंतर यापूर्वीही महिलांच्या वावरण्यावर अशाप्रकारचे निर्बंध कायम होतेच. पण, आता त्याची एक अंतरमर्यादा तालिबानने जाहीर केली.
 
म्हणजे संबंधित अफगाणी महिलेसोबत जर तिच्या कुठल्याही पुरुष नातेवाईकाने एवढ्या लांब जाण्यास नकार दिला किंवा कोणी त्याक्षणी उपलब्ध नसेल, तर ती महिला एकटी घराबाहेर पडू शकत नाही. शिवाय वाहनचालकांनाही यासंबंधी तालिबानने ताकीद दिली असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही, तर वाहनांमध्ये संगीत ऐकण्यावरही तालिबानने बंदी घोषित केली आहे. महिलांच्या या फिरण्या-हिंडण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच त्यांच्या वेशभूषेवरही तालिबानने बंधने अधिक कठोर केली आहेत. त्यामुळे डोक्यापासून ते पायाच्या नखांपर्यंत महिलांना हिजाब-बुरख्याने अंग काटेकोरपणे झाकावे लागेल. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी टीव्हीवरील मालिका आणि नाटकांमध्ये महिला कलाकारांना यापुढे काम करता येणार नाही.
 
 
तसेच वृत्तवाहिन्यांमधील महिला वृत्तनिवेदकांना ‘हेडस्कार्फ’ वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिलांच्या शिक्षणाबाबतही तालिबानची भूमिका अशीच चिंताजनक आहे. पण, तालिबान म्हणते आम्हाला मुलींचे शिक्षण मान्य आहे. पण, त्यांनी एकत्रितपणे पुरुषांबरोबर शिक्षण घेणे मात्र अमान्य! एकूणच काय तर, महिला या तालिबानी कायद्यानुसार दुय्यम नागरिक नसून त्यांना जगण्याचा, शिक्षणाचा आणि इतर कुठलाही मूलभूत अधिकार तालिबानी राजवटीत यापूर्वीही नव्हताच आणि आताही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती! त्यामुळे एकप्रकारे महिलांना घरात कैद करुन त्यांच्याकडून चाकरी आणि घरातली कामे करुन घेणे, अत्याचार करणे हीच तालिबानची कट्टरपंथी मानसिकता समोर येते.
 
 
जगभरातील महिला हक्क कार्यकर्त्यांनी तालिबानच्या या अरेरावीचा जाहीर निषेध केला असला तरी त्यातून काहीही साध्य होणे केवळ अशक्यच! मूळात, तालिबानकडून सुधारण्याची, महिलांना सन्मानपूर्वक वागणुकीची अपेक्षाच फोल ठरावी. कारण, ही रानटी, लिंगभेदाची पराकोटीची मानसिकता अन्यायकारक आहे. त्यातच अफगाणिस्तानमध्ये आगामी काळात २२ दशलक्ष नागरिक कुपोषणाला बळी पडतील, असा धोक्याचा इशारा अफगाणिस्तानला देण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आहे, तोपर्यंत या देशावर भीतीचे सावट असेच कायम राहील, हे वेगळे सांगायला नको.@@AUTHORINFO_V1@@