आज दि. २६ डिसेंबर रोजी वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांची जयंती व ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिवस. त्यानिमित्ताने बाळासाहेब देशपांडे यांचे कार्यस्मरण करणारा हा लेख...
दि. २६ डिसेंबर, १९१३ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म झाला. त्यांची जन्मभूमी महाराष्ट्रातील अमरावती असली, तरी कर्मभूमी मात्र भारत भूमी होती.१९२६ मध्ये त्यांनी रा. स्व. संघाच्या शाखेत जाण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनात महत्त्वाचे संस्कार करणार्या व्यक्तींशी त्यांचा परिचय होत गेला. परमपूज्य डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींचे सान्निध्य, सहवास त्यांना लाभला.भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यात झोकून देऊन त्यावेळी कार्यकर्ते काम करत होते. स्वातंत्र्य मिळणे जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच स्वराज्य मिळाल्यावर सुराज्य स्थापन करणे किती अवघड आहे; ते एक मोठे आव्हान ठरणार आहे, याची जाणीव ठेवून अनेक विचारवंत त्यादृष्टीने कार्यरत होते.दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. आसमंतात सनईचे मंगल स्वर ऐकू येत होते. पण, त्याच वेळी फाळणीचा आक्रोशही ऐकू येत होता. स्वराज्याच्या सुरुवातीलाच सुराज्य स्थापन करण्याच्या मार्गावर अनेक संकटे वाट अडवून उभी होती. लवकरच त्यांची झलक अनुभवाला आली.
स्वतंत्र भारतात मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री शुक्लाजी यांचा जनतेला भेटण्यासाठी प्रवास सुरू होता, तेव्हा शेकडो धर्मांतरित वनवासींनी काळे झेंडे दाखवून ’जय येशू’ अशा घोषणा दिल्या व ’शुक्लाजी वापस जावो’ असे फलकही दाखविले. या घटनेने ब्रिटिश काळात मिशनर्यांनी केलेल्या कारवायांची केवळ एक झलक दाखवली होती.या घटनेने नेते अस्वस्थ झाले. या प्रकाराची सरदार वल्लभभाई पटेल यांनी गंभीर दखल घेतली व महात्मा गांधींचे ज्येष्ठ सहकारी ठक्कर बाप्पा यांच्या बरोबर विचारविनिमय करून पुढील योजना ठरवावी, असे सुचविले. ठक्कर बाप्पा यांनी वनवासींसाठी खूप काम केले होते. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शुक्लाजींना सूचविले की यावर महत्त्वाचा उपाय म्हणजे, या भागात राष्ट्रीय शिक्षण देणार्या शासकीय शाळांचे जाळे विणले पाहिजे. त्यासाठी स्वयंसेवी वृत्तीच्या एखाद्या निर्भीड तरूणाची नियुक्ती करावी. ठक्कर बाप्पांचे एक विश्वसनीय सहकारी पी. जी. वणीकर यांनी त्यांना रमाकांत केशव उर्फ बाळासाहेब देशपांडे या तरुणाचे नाव सूचविले. मुख्यमंत्र्यांनी लगेचच ‘रूरल डेव्हलपमेंट’च्या अंतर्गत त्यांची ‘एरिया ऑर्गनायझर’ म्हणून नियुक्ती केली. १९४९ मध्ये पहिल्या वर्षातच झंझावाती प्रवास करत व मिशनर्यांचा विरोध मोडून काढत त्यांनी १०० पेक्षा जास्त प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करून दाखविल्या. हे पाहून ठक्कर बाप्पासुद्धा थक्क झाले. पण, १९५० मध्ये ठक्कर बाप्पा यांचे निधन झाले. बाळासाहेबांचा मुख्य आधारच नाहीसा झाला. याशिवाय सरकारी नोकरीतील कुरबुरीला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर रामटेक येथे जाऊन पूर्वीप्रमाणे वकिली करावी, असा त्यांचा विचार होता. ते जशपूर सोडण्याच्या विचारात असताना रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांनी बाळासाहेबांना जशपूरमध्ये राहूनच वकिली करावी व स्वतःच्या कार्याच्या अनुभवाचा उपयोग करून कार्य चालू ठेवावे, असे सुचविले. बाळासाहेबांनी पण लगेच ते मान्य केले आणि तो क्षण आला. उरांव जनजातीतील सहा बालकांना शिकविण्यासाठी घेऊन दि. २६ डिसेंबर, १९५२ रोजी ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना जशपूरमध्ये केली.
बाळासाहेब देशपांडे यांनी लावलेल्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्या पश्चात जगदेव राम उरांव यांनी ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमा’चे पहिले अध्यक्ष म्हणून कार्याची धुरा वाहिली.शिक्षण, छात्रावास, आरोग्य रक्षक योजना, महिला कार्य, खेळ, श्रद्धा जागरण, हितरक्षा, ग्रामविकास, नगरीय कार्य, नगरीय जनजाती संपर्क-चर्चासत्रे- परिसंवाद -संमेलने इत्यादी, प्रचार-प्रसार असे अनेक आयामाअंतर्गत कल्याण आश्रमाचे काम वेगाने पुढे जात आहे.
ग्रामवासी वा नगर निवासी
असोत कोणी वनवासी
एक संस्कृती अमर आपुली
जोडू जीवनधारेशी
प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या समाजरचनेचे हे सुंदर वर्णन आहे. नगर, ग्राम म्हणजेच आधुनिक काळात शहर, गाव, खेडेगाव व जंगल परिसर या सर्वांमध्ये सीमारेषा अगदी पुसट होत्या. जंगल म्हणजेच वन हा काही वेगळा भाग नव्हता. ऋषिमुनींचे वास्तव्य वनामध्ये असे. गुरुकुल म्हणजे शिक्षण संस्था, पण त्याही वनात असे. गुरुकुलात देशाच्या सर्व भागातून विद्यार्थी शिकण्यास येत असत. तसेच गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमाची प्रथा होती. तात्पर्य हे की, वनात राहणारे व ग्रामस्थ, नगर निवासी सगळ्यांची संस्कृती एकत्र एकच होती. खरेतर सारेच भारतवासी ‘आदिवासी’ नव्हे, तर ‘आदिनिवासी’ आहेत.
इंग्रज किंवा पाश्चात्य विचारवंतांच्या दृष्टीने ‘आदिवासी’ म्हणजे ‘मूलनिवासी’ म्हणजेच काहीसे अडाणी, मागासलेले लोक, असे वर्णन त्या समाजाचे करतात. त्याबद्दल त्यांच्या देशातील समाजाचे स्वरूपही वेगळं आहे. याउलट भारतातील आदिवासी समाज सुसंस्कृत संपन्न समाजाचा हिस्सा आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून भारतीय संविधान तयार करणार्या आदरणीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला ‘जनजाती’ या नावाने किंवा शब्दाने संबोधित केले. कालौघात अनेक कारणांनी दूर वनात राहिलेल्या वनवासींपासून विकासाच्या प्रगतीच्या वाटा दूर होत राहिल्या. ब्रिटिश काळात परदेशी मिशनर्यांनी याचा फायदा घेत धर्मांतर करण्याचा प्रयत्न तर केलाच व भारतीय समाज आणि वनवासी समाज यात अंतर निर्माण करण्याचा ही प्रयत्न केला. त्याचे प्रत्यंतर भारत स्वतंत्र झाल्यावर काही दिवसांतच अनुभवायला आले.
या वनवासी समाजाच्या उन्नतीचा प्रयत्न करण्याच्या ध्येयाने वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांनी जशपूर येथे ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना २६ डिसेंबर, १९५२ रोजी केली. त्यांच्या कार्याला मनस्वी वंदन...
मोहिनी पाटणकर