‘किंगफिशर’, खंड्या हा पक्षी आपल्याला नेहमी पाणवठ्याजवळ आढळतो. एका दारूच्या ब्रॅण्डमुळे या पक्ष्याचे फोटो पूर्वी सर्व वर्तमानपत्रात दिसत होते. त्यामुळे तर हा पक्षी सर्वांच्या परिचयाचा. खंड्याच्या जातीचे पक्षी समुद्रावर घरटी करतात, असा पूर्वीच्या ग्रीक लोकांचा समज होता. यामुळेच खंड्या जातीतील काही पक्ष्यांना ‘हलसियोन’ या वर्गात टाकण्यात आले. या वर्गाची निर्मिती कशी झाली, याची ही कथा.
खंड्या म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण ‘व्हाईट थ्रोटेड किंगफिशर’ म्हणतो तो पक्षी. त्याचे पूर्वीचे नाव ‘स्मर्णा किंगफिशर’ (Smyrna Kingfisher) असे होते. या पक्ष्याची नावे कशी बदलत गेली आणि त्यामागची कहाणी काय होती, हे अत्यंत मनोरंजक आहे.’एलीएझर अल्बीन’ (Eleazar Albin) या निसर्ग शास्त्रज्ञाने १७३८ साली आपला ‘ग्रंथ नॅचरल हिस्ट्री ऑफ बर्ड्स(- Natural History of Birds)प्रसिद्ध केला. त्यात ‘स्मर्णा किंगफिशर’ या नावाने या पक्ष्याचे वर्णन केले होते.यानंतर ‘कार्ल लिनियस’ (Carl Linnaeus) या स्विडीश निसर्ग शास्त्रज्ञाने सर्व सजीवांची वर्गवारी आणि त्यांची शास्त्रीय नावे त्याच्या ‘सिस्टिमा नेचुरी’ (Systema Naturae) या ग्रंथात १७५८ साली प्रसिद्ध केली. या ग्रंथाच्या दहाव्या खंडात त्याने ‘एलीएझर अल्बीन’च्या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचा संदर्भ देत ज्या पक्ष्याला आज आपण मराठीत खंड्या अणि इंग्रजीत ‘व्हाईट थ्रोटेड किंगफिशर’ म्हणून ओळखतो त्याचे नाव ’अल्सीडो स्मिरनेंसीस’ (Alcedosmyrnensis) असे दिले. यानंतर १८२१ साली इंग्रज निसर्ग शास्त्रज्ञ विल्यम जॉन स्वाईनसन (William John Swainson) याने ‘हेल्सियोन’ या गटाची ओळख करून दिली. त्याने बंड्या धीवरच्या जातीतील पक्ष्यांना ’हेल्सियोन’ या गटात समाविष्ट केले.
ग्रीक पौराणिक कथांत ‘ल्सियोन’ किंवा ‘ल्कियोन’ ही ‘किंग एओलस’ (King Aeolus of Aeolia) आणि ‘इनार्ट’ (Enarete) यांची अत्यंत सुंदर मुलगी असते. तिचे लग्न ‘सियुक्स’ (Ceyx) नावाच्या देखण्या तरुणाबरोबर झालेले असते. ‘ल्सियोन’ आणि ‘सियुक्स’ दोघेही एकमेकावर निस्सिम प्रेम करीत असतात. ते आपल्या ’ट्रेकिस’ (Trachis) या राज्यात आनंदाने दिवस घालवित असतात. त्यांनी प्रेमाने एकमेकांना ’झ्युस’ (Zeus) आणि ’हेरा’ (Hera)अशी नावे दिलेली असतात आणि ते एकमेकांना याच नावाने हाका मारीत असतात. वास्तविक ‘झ्युस’ हे नाव ग्रीक पुराणात सर्वश्रेष्ठ देवाचे नाव आहे. आपल्या नावाचा गैरवापर केल्यामुळे ‘झ्युस’ हा देवांचा राजा प्रचंड रागावतो आणि ‘सियुक्स’ जेव्हा समुद्रात गेलेला असतो तेव्हा तो आकाशातून प्रचंड अग्निगोल त्याच्या जहाजावर पाडतो. त्यात ‘सिक्युस’चा अंत होतो. ही घटना स्वप्न दाखविणारी देवता ‘मॉर्फियस’ (Morpheus)’झ्युस’ चा वेष घेऊन ‘ल्सियोन’ला सांगते. ‘सियुक्स’चे निधन झाल्याचे कळल्यामुळे ‘ल्सियोन’ अत्यंत दुःखी होते आणि स्वत:ला समुद्रात झोकून देते. या घटने नंतर ’झ्युस’ देवाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो आणि तो त्यांना ’खंड्या’ ‘किंगफिशर’ पक्ष्याच्या रूपात पुन्हा जन्म देतो. ग्रीक पुराणानुसार या पक्ष्यांवर देवाचे प्रेम असते आणि देव या पक्ष्याचे संरक्षण करतो. हे पक्षी समुद्रावर घरटे करतात, असा समज ग्रीक लोकांत फार पूर्वीपासून होता आणि या पक्ष्यांवर देवाची खास मर्जी असल्यामुळे देव त्याच्या विणीच्या काळात १४ दिवस समुद्र शांत ठेवतो, असे लोक मानत होते. हा काळ म्हणजे हिवाळ्यापूर्वीचा काळ.या दिवसांना ‘हेलसियोन डेज’ (Halcyon Days) असे म्हटले जाते. हे पक्षी समुद्रावर तरंगते घरटे करतात, असे लोक त्याकाळी समजत. यानंतर खंड्या धीवर (Whitethroated Kingfisher) या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ’हेल्सियोन स्मरनेंसिस’ ((Halcyon smyrnensis) असे दिले गेले. ग्रीक पुराणात ‘हाल’ म्हणजे समुद्र आणि ‘क्योन’ म्हणजे गर्भधारणा. यावरून ’हेल्सियोन’ म्हणजे समुद्रावर गर्भधारणा करणारे. या द्वीपदरी नावातील ’स्मिरनेंसीस’ हे विशेषण आहे आणि त्याचा संबंध तुर्की देशातील एक शहर ’ईझमीर’ (Izmir) याच्याशी आहे.
खंड्या हा पक्षी पाणवठ्यापासून पुष्कळ दूर जंगलातही दिसू शकतो. कारण, मासे हे त्याचे मुख्य खाद्य नाही. तो पाण्यात फार कमी बुड्या मारतो असे निरीक्षण नोंदले आहे. तो किडे, बेडूक, लहान सरपटणारे प्राणी, लहान उंदीर, इतकेच काय लहान पक्षीही खातो. तसेही त्याचे पाय गुलाबी रंगाचे आणि आखूड असतात. त्यामुळे मासे त्याला पायात पकडता येत नाहीत. मासा मोठा असेल, तर त्याला महत्प्रयासाने गिळले जाते आणि काही वेळाने त्याच्या हाडांची गोळी तोंडातून बाहेर फेकली जाते. धीवर वर्गातील सर्वच पक्ष्यांची पचनशक्ती फार तीव्र असते म्हणून लवकर पचन क्रिया होते.
थॉमस सी. जेडॉन (Thomas C. Jerdon) यांनी आपल्या १८६२ साली प्रसिद्ध झालेल्या ’द बर्ड्स ऑफ़ इंडिया’ (The Birds of India)या ग्रंथात पांढर्या गळ्याच्या खंड्या धीवर या पक्ष्याच्या वर्तनाबद्दलचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करुन ठेवले आहे. थॉमस जेर्डान हे डॉक्टर होते. ते सैन्यात सर्जन मेजर पदावर होते. पण यासोबतच ते प्राणिशास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञही होते. भारतातील अनेक प्राणी आणि पक्ष्यांना त्यांचे नाव दिले आहे.
भारतात ‘हेल्सियोन’ पोटजातीतले तीन पक्षी आढळतात.
‘व्हाईटथ्रोटेड किंगफिशर’ (Halcyon smyrnensis - White-throated Kingfisher)
(Halcyon pileata - Black-capped Kingfisher)
‘रुडी किंगफिशर’ (Halcyoncoromanda-RuddyKingfisher)
- राजकमल जोब