पाटील साहेब पहाताय ना! : फुकट दारूसाठी पोलीसांचा गुंडाराज!

24 Dec 2021 19:12:04

Dilip Patil _1




मुंबई :
राज्य सरकारने विदेशी मद्यांवरील करकपात केल्यानंतर वाकोल्यातील एका बारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाकोला पोलीस ठाण्यात एएसआयविरोधात त्यांच्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाकोल्यातील स्वागत बारमध्ये फुकटची दारू हवी, म्हणून पोलीसांनी बारमधील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार उघड झाला आहे.


या प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली आहे. विक्रम पाटील, असे या आरोपीचे नाव असून ते वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विक्रम पाटील यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. 'बार बंद झाले असताना देखील त्यांनी फुकटची दारू आणि जेवण मागितले. ते न दिल्याने त्यांनी कर्मचाऱ्यास मारहाण केली', असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

स्वागत बारचे मालक महेश शेट्टी यांनी या प्रकरणी पोलीसांत तक्रार केली. 'बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास काही पोलीस अधिकारी साध्या वेशात बारच्या मागच्या दरवाज्यातून आत शिरले. बार बंद झाल्याचे सांगताच त्यांनी रामदास पाटील (४१) या कर्मचाऱ्यास मारहाण केली.' पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आरोपी विरुद्ध कारवाई होत असल्याचे सांगितले. "या प्रकारचे कृत्य हे केवळ पोलीस खात्याला बदनाम करणारे नसून व्यापारी वर्गातसुद्धा अविश्वास निर्माण करणारे आहे", असे निगमप्रमुख शिवानंद शेट्टी यावेळी म्हणाले.


बारमालकांकडून वसुली प्रकरणाचा तपास



महिन्याला बारमालकांतर्फे शंभर कोटींची वसुलीच्या प्रकारामुळे राज्य सरकारचे गृहखाते यापूर्वीच चर्चेत आले होते. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह या दोघांची चौकशी सुरू आहे. देशमुख पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार सांभाळला आहे.





Powered By Sangraha 9.0