उद्धव सरकार, मुस्लीम कोटा लागू करा ; कॉंग्रेस नेत्याचे पत्र

24 Dec 2021 16:02:03

naseem khan_1
मुंबई : मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी महाराष्ट्रात मुस्लिम कोटा लागू करण्याबाबत पत्र लिहिले आहे. मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याची आणि अल्पसंख्याक समाजाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लिहिले आहे.
 
 
नसीम खान यांनी पत्रात म्हंटले आहे की, "महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये मुस्लिम समाजाला आजवर पाच टक्के आरक्षण मिळालेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना त्यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली. मात्र त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही."
 
 
नसीम खान हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते. महाविकास आघाडीच्या सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण आणि निधी मिळावा यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली, पण त्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याचेदेखील त्यांनी या पत्रात म्हंटले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लीम आरक्षणावरून मुंबईच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे धरले. रईस शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आधी मुस्लिम आरक्षणाबाबत बोलले होते आणि आता ते म्हणतात की एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही."
 
 
Powered By Sangraha 9.0