‘लिंचिंग’वरुन राहुलला ‘इचिंग’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2021   
Total Views |

rahul gandhi_1
 
“२०१४ से पहले ‘लिंचिंग’ शब्द सुनने में भी नहीं आता था।” इति काँग्रेसचे युवराज आणि माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी. त्यांनी सवयीप्रमाणे ट्विटरवर नुकतेच पाजळलेले हे अघोरी अज्ञान! खरंतर राहुल गांधी यांनी ‘लिंचिंग’ आणि ‘२०१४’ असा शब्दच्छल करण्याचा केविलवाणा प्रयत्न यावेळी केला. पण, आताच राहुल गांधींना ‘लिंचिंग’वरुन असं एकाएकी ‘इचिंग’ का झालं? कोणत्या घटनेचा संदर्भ ते देऊ पाहत होते? त्याविषयी मात्र एकही चकार शब्द त्यांनी का उच्चारला नाही? त्याचे कारण म्हणजे काँग्रेसशासित पंजाबमध्येच नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘लिंचिंग’च्या दोन धक्कादायक घटना. त्यामुळे पंजाबचा साधा उल्लेखही न करता, राहुल गांधींनी ‘लिंचिंग’, ‘२०१४’ असे शब्दप्रयोग करत, देशात मोदी सरकार आल्यानंतरच जणू ‘लिंचिंग’च्या घटना घडू लागल्या, असा अविचारी भ्रम पसरविण्याचा तथ्यहीन प्रयत्न केला. पण, काँग्रेसच्याच पंजाब राज्यात हे ‘लिंचिंग’चे प्रकार का घडले? त्या दोषींवर चन्नी सरकारने काय कारवाई केली? याविषयी बहुधा राहुल गांधी अनभिज्ञच असावे. कारण, काँग्रेसच्या राज्यात घडलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवायचेच नाही, त्या गोष्टी अनुल्लेखाने दाबून टाकायच्या, हीच कायम काँग्रेस सरकारची नीती राहिली. म्हणूनच कर्नाटकच्या ज्या आमदाराने ‘बलात्काराची मजा घ्या’ असे विधानसभेत निर्लज्ज विधान केल्यानंतरही, त्या आमदारावर काँग्रेस पक्षाने कारवाईचा बडगा का उगारला नाही? तेव्हा दिव्याखाली अंधार म्हणतात, हाच तो प्रकार! पंजाबमधील ‘लिंचिंग’च्या दोन्ही घटनांकडे काँग्रेस सरकारने सपशेल दुर्लक्ष केले. एवढेच नाही, तर त्याविषयी तक्रारी दाखल करण्यातही चालढकल केली असून, उलट या दोन्ही घटनांना ‘षड्यंत्र’ असल्याचे दर्शवित त्यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न केला. गुरु ग्रंथ साहिब किंवा शीख धर्माचा, धर्मप्रतिकांचा अवमान हा सर्वस्वी निषेधार्हच, पण म्हणून गुरुद्वारामध्येच जमावाने कायदा हातात घेऊन खून पाडणे हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नक्कीच नाही. परंतु, पंजाबमधील आगामी निवडणुका लक्षात घेता, काँग्रेस सरकारने अतिशय सावध पवित्रा घेतला असून, दोषींविरोधात कारवाई न करता, त्यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न चालवलेला दिसतो. तेव्हा, राहुल गांधींनी पंजाबमधील या ‘लिंचिंग’विषयी, ज्या दोघांचा यात बळी गेला, त्यांच्याविषयी ट्विटरवर संवेदना व्यक्त करुन दाखवावी आणि दोषींवर काय कारवाई केली, त्याचीही माहिती देशवासीयांना द्यावी.

मग शीखबळींचे पातक कोणाचे?

राहुल गांधींची कुठल्याही विषयातील ‘समज’ किती, हे वेगळे सांगणे न लगे! त्यातच काही तरी संदर्भहीन बरळायचे आणि आपल्याच पक्षाला, नेत्यांना अडचणीत आणायचे, यात तर त्यांचा हातखंडाच! म्हणूनच तर कॅप्टन अमरिंदर सिंग जेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री होते, तेव्हा गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारातही त्यांनी राहुल गांधींना प्रचारापासून चार ‘हात’ लांब ठेवण्याचाच प्रयत्न केला. कारण, हा माणूस कधी काय निरर्थक बोलून अनर्थ घडवेल आणि उरलीसुरली इज्जतही घालवून बसेल, याचा अजिबात नेम नाही. आताही राहुल गांधींना ‘लिंचिंग’वरुन मोदी सरकारवर निशाणा साधण्यापूर्वी, त्यांच्या पिताश्रींच्या आणि काँग्रेसवरील १९८४च्या शीखबळींच्या पातकाचा मात्र सपेशल विसर पडलेला दिसतो. १९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्ली आणि देशभरात काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी अमानुष पद्धतीने दंगली घडवून शीखांचे रक्त सांडले. कित्येकांना भर रस्त्यात जाळून मारले, तर निर्दोष शीख बांधवांच्या आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. “जब कोई बड़ा पेड़ गिरता हैं, तो आसपास की धरती हिलती हैं,” असे विवादास्पद विधान करत तीन हजारांहून अधिक शीखांच्या नरसंहाराचे राजीव गांधी यांनी समर्थनच केले. म्हणूनच राहुल गांधींच्या या विधानावर राजीव गांधी हेच ‘फादर ऑफ लिंचिंग’ आहेत, अशाच शब्दांत भाजपने राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. पण, सुषमा स्वराज राहुल गांधींना एकदा संसदेतील त्यांच्या भाषणात म्हणाल्या होत्या तसे, राहुलने आपल्या परिवाराचा, गांधी घराण्याच्या कुकृत्यांचा इतिहासच एकदा नीट वाचावा आणि मग इतरांवर चिखलफेक करण्याचे धारिष्ट्य दाखवावे. तेव्हा सत्य हेच की, ‘लिंचिंग’च्या घटना काँग्रेसच्या कार्यकाळातही घडल्या. एवढेच काय, तर महाराष्ट्रात काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार असतानाही पालघरमध्ये साधूंची निर्घृण हत्या झाली. तत्पूर्वीही अहमदाबाद (१९६९), जळगाव (१९७०), मुरादाबाद (१९८०), भिवंडी (१९८४), अहमदाबाद (१९८५), भागलपूर (१९८९), हैदराबाद (१९९०), कानपूर (१९९२), मुंबई (१९९३) आणि अशा शेकडो झुंडबळीच्या दुर्देवी घटना काँग्रेसच्या कार्यकाळातच घडल्या. तेव्हा, राहुल गांधींनी या सगळ्या घटना आणि शीखबळींच्या पातकालाही ‘लिंचिंग’च म्हणतात, ही खूणगाठ बांधावी आणि मग याही झुंडबळींची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारावी!
@@AUTHORINFO_V1@@