उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतुचक्राप्रमाणे मुंबईतले आजारदेखील बदलत असतात. पावसाळ्याच्या शेवटी डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनियाचे रूग्ण वाढतात. आता हिवाळा सुरु झाला आहे. डेंग्यू तापाचे प्रमाण जरी कमी झाले, तरी इतर काही आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती करुन घेऊया.
सृष्टी रचना आणि व्यवस्था अगाध आहे. ब्रह्मांडातील असंख्य ग्रहतार्यांचे भ्रमण एका व्यवस्थेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने होत असते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते व स्वत: भोवती फिरते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या भ्रमणामुळे दिवस-रात्रीची निर्मिती झाली व तीन मुख्य ऋतू निर्माण झाले. पृथ्वीतलावर असंख्य सजीव जीवांचे वास्तव्य आहे. ‘व्हायरस’ ते मनुष्य प्रजाती एवढा मोठा सजीवांचा व्याप आहे. या सर्वांचे एकमेकांशी बर्यापैकी सामंजस्य आहे. हे सामंजस्य ढासळले की, जगाला कोरोना महामारीसारख्या प्रलयकारी आजाराला सामोरे जावे लागते. आज जगाची लोकसंख्या ७०० कोटींच्या घरात आहे. ती भौगोलिकदृष्ट्या अनेक भागांत विखुरली गेली आहे. भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे. कारण, या भूमीस अध्यात्माचा वारसा आहे. संत महात्म्यांची आणि समाज सुधारकांची ही भूमी आहे. मुंबईसारख्या शहरात वर्षातले तिन्ही ऋतू सुसह्य असतात, तरीदेखील ऋतूबदलाप्रमाणे आजारपणाचे प्रकारही बदलतात. या ऋतू बदलाप्रमाणे योग्य काळजी घेतली, तर आजारपण सहसा आपल्या वाट्याला येत नाही.
गेली दोन वर्षे आपण कोरोना महामारीच्या भीतीखाली वावरत आहोत. प्रसार माध्यमातील क्रांतीमुळे वाईट बातम्या, दु:खद बातम्या वार्यासारख्या पसरतात व भीती वाढत जाते.
गेले दोन वर्षे आपण ‘लॉकडाऊन’, ‘आरटीपीसीआर’, ‘क्वारंटाईन’, आप्तजनांचा मृत्यू, कोरोनाची पहिली, दुसरी आणि तिसरी लाट, लसीकरण, ‘डेल्टा व्हेरिएंट’, ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ याचीच अधिक चर्चा करत बसलो. प्रसारमाध्यमाद्वारे लोकांच्या मनातील भीती कमी होईल, त्यांना धीर येईल, अशा फार कमी गोष्टी राज्य शासनाकडून करण्यात आल्या. या काळात ताप आला किंवा साधी शिंक जरी आली, तरी कोरोनाची शंका येऊ लागली. इतर आजार आणि खासकरुन इतर साथीचे आजार यांचा आम्हाला पार विसर पडला. पहिल्या दीड वर्षात लहान मुलांना आठ ते दहा प्रकारच्या लसी दिल्या जातात.‘लॉकडाऊन’च्या काळात या महत्त्वाच्या प्राथमिक लसीकरणापासून असंख्य मुले वंचित राहिली. आजही शासकीय पातळीवर या गोष्टींचा आढावा घेऊन त्यावर प्रभावी उपाय योजले आहे, असे दिसत नाही. गेले दीड वर्षे आम्ही फक्त कोरोना साथीचा आणि कोरोनाच्या लसीकरणाचाच विचार केला. एवढेही करुन मुलांना द्यायच्या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेने शेवटचे प्राधान्य दिले. महाराष्ट्रात आता शाळा सुरु झाल्या आहेत. ही मुले कोरोनाची लस घेतल्याविनाच शाळेत जात आहेत. जी मुले आठव्या व दहाव्या वर्षी विविध आजारांसाठी लसी घेतात, त्यांना कोरोनाची लस मानवली नसती का, हा प्रश्न माझ्यासारख्या छोट्या आरोग्य सेवकास पडतो.
कोरोना महामारीने आपणास एक शिकविले आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आजाराचा प्रतिबंध फक्त लस घेऊनच होत नाही, तर आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती, स्वच्छ पाणीपुरवठा, पर्यावरणाची काळजी, आनंदी सामाजिक वातावरण आणि शांत मन या सर्वांची त्यासाठी आवश्यकता आहे. हिवाळ्यातील आजार हे दरवर्षी येतात आणि जातात. ऋतूप्रमाणे दिनचर्येत आणि आहारात बदल केला, तर हिवाळा सुसह्य होऊ शकतो.मुंबईकरांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या असतील. परंतु, इतर शहरांच्या मानाने मुंबईत उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू बर्यापैकी सुसह्य असतात. मुंबई शहर समुद्र किनार्यालगत असल्यामुळे येथील हवा दमट असते व घाम जास्त येतो. पण, ऊन, पाऊस व थंडी यांचा अतिरेक सहसा मुंबईत आढळत नाही.
हवामानात होणारा बदल प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही परिणाम करत असतो. रुग्णांची प्रतिकारशक्ती, त्याची दिनचर्या, त्याची प्रकृती (वात, कफ व पित्त) यांच्या अनुषंगाने रुग्णात लक्षणे दिसू लागतात. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर या ऋतुबदलाचा विशेष त्रास होत नाही. त्याचप्रमाणे ऋतुपरत्वे आपल्या दिनचर्येत व आहारात बदल केले, तर हिवाळा सुसह्य होतो. हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्याचप्रमाणे श्रम करण्याची शक्ती देखील वाढते. हिवाळ्यात व्यायामाचे प्रमाण वाढविले, तर त्याचे इष्ट परिणाम दिसतात.
हिवाळ्यातील आजार :
१) त्वचेचे आजार : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. ओठ फाटतात. पायांना भेगा पडतात. सोयरासीसच्या रुग्णांसाठी हिवाळा जास्त त्रासदायक ठरतो. अंगाला खाज येणे, पुरळ उठणे, त्वचा खरखरीत होणे देखील हिवाळ्यात जाणवते.
प्रतिबंधात्मक उपाय : अंघोळीपूर्वी अंगास तेल चोळणे, अंघोळ कोमट पाण्याने करावी. ओठांना दुधाची साय लावावी. चेहर्यासाठी व हातापायासाठी कोल्ड क्रिम लावावी. शक्य असेल, तर सकाळी कोवळ्या उन्हात चालण्याचा व्यायाम घ्यावा.
२) श्वसन संस्थेचे आजार : सर्दी, पडसे, खोकला, दमा इत्यादी आजार हिवाळ्यात बळावतात. कफ प्रकृती असलेल्या रुग्णांना याचा अधिक त्रास होतो. शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे, धाप लागणे इत्यादी लक्षणे रुग्णास हैराण करुन टाकतात.
प्रतिबंधात्मक उपाय : तज्ज्ञांच्या सल्ल्याने नेती, प्राणायाम, ब्रह्मविद्या, नाकात अणू तेलाचे थेंब सोडणे, या उपायांनी प्राथमिक लक्षणांवर मात करता येते. वरील लक्षणे जास्त प्रमाणात असतील किंवा ताप येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३) पोटाचे विकार : वायू प्रकोप हिवाळ्यात बर्याच रुग्णांमध्ये दिसून येतो, जास्त प्रमाणात उलट्या व जुलाब होणे, पोटात दुखणे ही याची लक्षणे. हिवाळ्यात वातजन्य पदार्थ बाधतात. स्निग्ध पदार्थ, दूध, तूप, मांसाहार, उडीद, ऊस, रवा, गहू, बाजरी यांचा आहारात जास्त उपयोग करावा.
हृदयरोग व अर्धांग वायू : हिवाळ्यात या आजारांचे प्रमाण अंशत: वाढलेले आढळते आणि थंडीमुळे हृदयाच्या व मेंदूच्या रक्तवाहिन्या जास्त आंकुचन पावतात. रक्तदाब, मधुमेह व हृदयरोगाच्या रुग्णांनी हिवाळ्यात जास्त काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित चाचण्या व औषधे घेणे. जुना मधुमेह असणार्या रुग्णास ‘सायलेंट इन्फेक्शन’ होण्याची शक्यता हिवाळ्यात जास्त असते.
मानसिक आजार : जीवनात आशेचा किरण हा सूर्यकिरणामुळे निर्माण झालेला आहे. हिवाळ्यात सूर्यदर्शन कमी होत असल्यामुळे नैराश्य, अवास्तव भीती आदी मानसिक आजार बळावण्याची शक्यता असते. कोवळ्या उन्हात फिरणे हा त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय.
हिवाळ्यातील आहारातील बदल : मासांहार करणार्यांनी अंडी, मटण, चिकन यांचे प्रमाण वाढवावे. गोड, आंबट व खारट या रसांच्या पदार्थांचे सेवन वाढवावे. उडीद, मेथी, खजूर, शेंगदाणे, खोबरे, गूळ, गाजर, आवळा यांचा उपयोग आहारात जास्त करावा. खीर, रबडी यांसारख्या पदार्थांचे सेवन वाढवावे. जास्त वेळ उपाशी राहू नये. फ्रिजचे पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स शक्यतो टाळावे.
हिवाळ्यात व्यायामाचे प्रमाण वाढवावे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामशाळेतील उपकरणांवरील व्यायाम, योगा, प्राणायाम, ब्रह्मविद्या व सूर्यनमस्कार यांचा अभ्यास वाढवावा. हा हिवाळा सर्व वाचकांना आरोग्यदायी व बलशाली ठरो, ही सदिच्छा!
डॉ. मिलिंद शेजवळ