चरैवेति चरैवेति...

21 Dec 2021 13:28:42

buffalo.jpg_1


जमिनीवर आदळून पुन्हा जिद्दीने आकाशाला गवसणी घालायची... त्यांची जमात न थांबणारी न थिजणारी... आपल्या भारतातसुद्धा अरुणिमा सिंग, पुलेला गोपिचंद, युवराज सिंग, ‘मॅग्निफिसंट मेरी’ उर्फ ‘मेरी कॉम’ या सगळ्यांच्या सातत्याने आणि अदम्य अस्तित्वाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. नियतीचा जणू निर्णय मागे घ्यायची आज्ञा देणारे हे खेळाडू जगतात, ते त्यांच्या स्वतःच्या ‘चरैवेति चरैवेति’ अर्थात ‘चालत राहा’ या वृत्तीमुळे!

खेळ चालू असताना आपत्कालीन परिस्थिती आहे, खडाजंगी चालू आहे, बाजी हाताबाहेर जाते आहे, असं वाटत असताना, केवळ मानसिक क्षमतेच्या जोरावर बाजी मारता येण्याची सक्षमता आणि कसब ज्याच्यात आहे, अशा व्यक्ती खर्‍या अर्थाने जगज्जेत्या ठरतात. ‘शर्थ लढ्याची करु, जिंकू किंवा मरु’ अशी त्यांची लढाऊ प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती कशी विकसित करावी, हे ज्याला कळले, त्याने खरच जग जिंकले. तुमची ही प्रवृत्ती हीच खरी या जगातली ‘सुपर पॉवर’ आहे. आपल्या पाठीवर नकारात्मक विचारांचे वा भावनांचे ओझे घेऊन पळ काढणे, म्हणजे त्या विघातक, नकारार्थी भावनांचे आपल्या आयुष्यातील अस्तित्व नाकारणे! साहजिकच पुढे जाऊन या नकारात्मक भावानांची अभेद्य भिंत बनते, जिला पार करणे खूप कठीण होऊन जाते. अपयशाची भाषा पचविणे कठीण आहे. पण, तिचे अस्तित्व नाकारणे म्हणजे लढाईत उतरायच्या आधीच शरणागती पत्करण्यासारखे आहे. यासाठी आपल्या नकाराच्या भूमिकेचा ‘स्वीच’ ‘ऑफ’ करायला लागतो. त्या भूमिकेच्या तळाशी जाऊन विश्लेषण करायला लागते. स्वत:ला आवरुन अनेक प्रश्न अशावेळी स्वत:ला विचारायला पाहिजेत की, आपल्याला सगळं काही ठीकठाक वाटत असताना, आपल्याला आपलं यश मिळेल, याची पूर्ण खात्री असताना ते असं कसं ‘बुम्म’ झाले! हे व्यवस्थित समजावून घेतले, तरच आपल्याला काय वेगळं करायला पाहिजे, काय बदलायला पाहिजे, याचा व्यवस्थित अदमास लागतो. जेव्हा परिस्थिती कठीण असते, तेव्हा आपली निराशा, आपली चुकलेली गणिते आणि आपला ओसरलेला उत्साह यामुळे आपण स्वत:ला दोष देत राहतो. स्वत:लाच ओरबाडत राहतो. आपण स्वत:वर इतके क्रूद्ध होऊन चालत नाही. अपयशाच्या वाटेवर कदाचित आपण आलेले असू, तर त्याचा तिरस्कार करुन चालत नाही. आपली ऊर्जा आपण हे अपयश स्वीकारण्यासाठी कामाला लावायला पाहिजे, ज्यायोगे आपण पुढची पावले सकारात्मक दृष्टीने घेऊ शकतो. यशाची गुरुकिल्ली चुकांतून शिकता येणार्‍या ज्ञानात आणि अनुभवांत सापडते.


कृष्णा पुनिया या हरियाणातील खेळाडू आहेत. २०२० साली त्यांनी ‘कॉमनवेल्थ’मधील वैयक्तिक धावपटूचे ‘सुवर्णपदक’ मिळविले होते. त्या ट्रॅकवर धावपटूचे सुवर्ण पदक मिळविणार्‍या पहिल्या भारतीय महिला तर होत्याच; पण, मिल्खा सिंग यांच्या १९७८ सालातील ‘कॉमनवेल्थ’मधील सुवर्ण पदकानंतर इतक्या वर्षांनी भारताने मिळविलेले ते अनमोल सुवर्ण पदक होते. त्यानंतर त्या राजकारणात करिअर करण्यासाठी शिरल्या. मात्र, २०१८ साली त्या राजस्थानातून निवडणूक हारल्या. त्यावेळी खेळातून प्रेरणा घेत आयुष्यातही आपण कसे सकारात्मक आणि उत्स्फूर्त राहू शकतो, याचे उदाहरण त्यांनी दिले. राजकारणात खूप नकारात्मक विचारांचा मारा जरी आपल्यावर होत असला, तरी खेळाची पार्श्वभूमी पाठीशी असल्याने आपण सकारात्मक विचार करु शकतो, असे त्या म्हणाल्या. ही अदम्य इच्छाशक्ती त्यांनी खेळाच्या भूमीत मिळवली, असे त्या म्हणतात. मूळात आपल्या मनातले स्वप्न आपण मिटू द्यायचे नाही, तुमचे स्वप्न पाहात राहा, ते सजवत राहा... निवडणुकीत हरल्यानंरतही निवडणूक जिंकायचे, हा आशादीप त्यांनी ज्वलंत ठेवला. खेळात कधी हार वाट्याला आली, तरी खेळाडू मात्र आपला दमदार सराव सुरुच ठेवतो. तसेच कृष्णा पुनिया यांनी निवडणूक हरल्यानंरतही आपले काम सातत्याने चालूच ठेवले. त्यांच्या नंतरच्या सभांमध्ये ‘कृष्णा पुनिया आँधी हैं’ हा जननाद दुमदुमत राहिला.



अदम्य मानसिक ऊर्जा कमवायची असेल, तर आणखी एक महत्त्वाचे नियोजन खेळाडू करतात. त्यांचा प्लॅन ‘अ’ जर यशस्वी होत नाही, असे दिसले, तर त्यांचा प्लॅन ‘ब’ आणि ‘क’तयारच असतो. याचा अर्थ व्यक्ती एखादी कठीण परिस्थिती अनेक दृष्टिकोनातून पाहात असते. यातून आपल्याला नेमकं कुठलं उत्तर हवं आहे, याचा वेध व्यक्ती घेत असते. नवनवीन डावपेच ती शिकत असते. आपण आपल्या सगळ्यांचे आवडते क्रिकेटपटू पाहिले. उदा. सुनिल गावसकर,कपिल देव, महिंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड हे सगळे या खास युद्धतंंत्राचा वापर मैदानात निर्वाणीच्या क्षणी कसा करायचा, हे फार परिणामकारकरित्या शिकवून गेलेत.या सगळ्या गोष्टीत आपल्याला सांभाळून घेत, योग्य सल्ले देणार्‍या गुरुची वा ‘मेंटॉर’ची गरज खेळाडूंना सातत्याने भासते. असा कुणीतरी गुरु जो परिस्थितीकडे वस्तूनिष्टपणे व भावूक न होता पाहतो. नक्की अडथळे कोणते येणार आहेत आणि त्यांच्याशी कशाप्रकारे झुंज द्यायची, याचा आढावा घेत त्या खेळाडूला आव्हान स्वीकारण्यास प्रेरणा देतो. तसेही व्यावसायिक खेळाडूंसाठी आयुष्यभर शिकत राहणे गरजेचे आहे. याशिवाय भूतकाळातील अपयशामुळे कोणी आपली पुढची वाटचाल आणि निर्णयक्षमता थांबवणे योग्य नाही. स्वतःवरचाविश्वास ढळू न देता, खोल समुद्रात उडी मारता येणे आवश्यक आहे. आपल्या लक्षात यायच्या आधीच लोकांनी पुन्हा भरारी घेतलेली आपण पाहतो. इजा झाली, अपघात झाले व त्यातूनही बरे होत कित्येक खेळाडू पुनश्च आपले व्यावसायिक करिअर सुरु करतात.
 
 
यातील एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. गोल्फ खेळाडू टायगर वूड यांचे. क्रीडा क्षेत्रात जे काही लोक ‘आख्यायिका’ बनले आहेत, त्यातील हा एक उच्च दर्जाचा खेळाडू. पण, एकेकाळी व्यसनामुळे तो पूर्ण बदनाम झाला. त्याने केलेला अपघात, नंतर अनेक बायकांनी त्याच्यावर केलेले आरोप आणि लफडी /प्रकरण असल्याचे दावे, यामुळे तो पूर्ण रसातळाला गेलाच, असा जगभर प्रवाद झाला. त्याची गोल्फमधील अद्वितीय कला संपली असे मानले जात असतानाच, टायगर वूड काही वर्षे पुनर्वसन प्रकियेत गेला आणि जवळजवळ दहा वर्षांनी २०१९ साली हा खेळाचा बंदा ‘मास्टर्स’ जिंकला. त्याच्या चाहत्यांना गगन ठेंगणे झाले. मुहम्म्द अली व माईक टायसन यांच्याही अशाच कथा. जमिनीवर आदळून पुन्हा जिद्दीने आकाशाला गवसणी घालायची... त्यांची जमात न थांबणारी न थिजणारी... आपल्या भारतातसुद्धा अरुणिमा सिंग, पुलेला गोपिचंद, युवराज सिंग, ‘मॅग्निफिसंट मेरी’ उर्फ ‘मेरी कॉम’ या सगळ्यांच्या सातत्याने आणि अदम्य अस्तित्वाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. नियतीचा जणू निर्णय मागे घ्यायची आज्ञा देणारे हे खेळाडू जगतात, ते त्यांच्या स्वतःच्या ‘चालत राहा’ या वृत्तीमुळे!
 
डॉ. शुभांगी पारकर




 
Powered By Sangraha 9.0