गडकरींचा ‘मानस’ आणि विदर्भातील ऊसक्रांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

gadkari.jpg_1  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात एकरी १०० मे. टन उसाचे उत्पादन झाले पाहिजे, हे कृषीविकासाचे ‘व्हिजन’ शेतकरी बांधवांसमोर प्रकर्षाने मांडले. इतकेच नाही, तर ‘मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्री’च्या माध्यमातून शेतकर्‍यांना ऊस उत्पादनासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षणही दिले. परिणामी, २०२०-२१च्या गाळप हंगामात अजनी गावातील राजेश भगल या तरुण शेतकर्‍याने १०० मे. टन इतके उसाचे उत्पादन घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यानिमित्ताने ‘मानस अ‍ॅग्रो’ आणि या तरुण शेतकर्‍याच्या यशोगाथेचा घेतलेला हा आढावा...

 
विदर्भातील शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासासाठी केवळ ऊस उत्पादन हाच पर्याय शिल्लक आहे. केवळ ऊस लागवडीकडे लक्ष न देता, एकरी उत्पन्न कसे वाढविता येईल याकडे गांभीर्याने व अभ्यासूवृत्तीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध व्यासपीठांवर सातत्याने केले. तसेच नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ‘मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजआणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’च्या अंतर्गत येणारे तीन साखर कारखाने आज राजेश भगल यांच्यासारख्या शेतकर्‍यांच्या प्रयोगशील धडपडीमुळे विदर्भाच्या विकासाची नांदी ठरू पाहात आहेत.विदर्भातील अनेक शेतकर्‍यांनी तीन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली. त्यापैकीच एक तरुण शेतकरी म्हणजे राजेश भगल. नितीन गडकरी यांनी विदर्भातील शेतकर्‍यांना दाखवलेले एकरी १०० टनाचे स्वप्न राजेश यांनी अथक परिश्रमांती पूर्ण केले. २०२१-२२ या चालू गाळप हंगामामध्ये सव्वा दोन एकर क्षेत्रात त्यांनी २४८.६८८ मे. टन म्हणजेच ११०.५२८ मे. टन प्रतिएकर असे उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन विक्रम रचला.नागपूरपासून काही अंतरावरच असलेल्या सावनेर तालुक्यातील अजनी गावात राजेश भगल यांची शेती. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून वडिलोपार्जित आपल्या वाटेला आलेल्या ३५ एकर जमिनीत शेती करण्याचा निर्णय राजेश यांनी घेतला. मागील २० वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने कपाशी, सोयाबीन, तूर, संत्री आणि मोसंबी या पिकांची प्रामुख्याने लागवड करीत होते. मात्र, या पिकांतून नफा कमी अन् तोटाच अधिक अशी परिस्थिती होती. याविषयी राजेश अधिक विस्ताराने सांगतात की, “विदर्भातील शेतकर्‍यांच्या सातत्याने होणार्‍या तोट्याचा बारकाईने अभ्यास केल्यास लक्षात येते की, विदर्भातील शेतकर्‍याने कधीही नफा कमविता येईल, असे उत्पादन घेतले नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍याला नाईलाजाने वडिलोपार्जित जमिनीही विकाव्या लागल्या. मलाही असंख्य वेळा जमिनी विकण्याचा विचार आला. मात्र, जमीन विकण्याची तयारी मात्र झाली नाही.”
शेतीविषयी अशाप्रकारे अभ्यास आणि अनुभव गाठीशी असणारे राजेश हे कायमच शेतीत नवनवीन प्रयोगांसाठी आग्रही असतात. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रही पालथा घातला. त्यामुळे उसाभोवती फिरणार्‍या अर्थकारणाची चक्रांची त्यांना बारकाईने कल्पना होती. यादरम्यान राजेश यांचा संपर्क ‘मानस अ‍ॅग्रो’ या कृषी क्षेत्रात कार्यरत समूहाशी आला.

‘मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ ही संस्था शेतकर्‍यांना जमिनीचे परीक्षण, उसाच्या लागवडीचे नियोजन, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे नियोजन याचबरोबर ऊस कापणी प्रक्रिया यासाठी मार्गदर्शन, मदत आणि नियोजन साहाय्य करते. म्हणजेच उसाची लागवड करण्यापूर्वी ते ऊस पूर्ण तयार होऊन कारखान्यापर्यंत नेण्याच्या प्रक्रियेत ‘मानस’ शेतकर्‍यांना पुरेपूर सहकार्य आणि प्रशिक्षण देते. यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातील तज्ज्ञ शेतकरी विदर्भात ऊस लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात. याचबरोबर तयार ऊस कारखान्यात नेल्यानंतर त्या उत्पादनाचा बाजारभावाप्रमाणे पूर्ण मोबदला शेतकर्‍यांना योग्य वेळेत दिला जातो.राजेश सांगतात की, “यापूर्वी विदर्भात ऊस पिकत होता. मात्र, तो केवळ रसवंतीचा ऊस होता. साखर कारखानदारी हे विदर्भासमोरील मोठं आव्हान. त्यात विदर्भातील २२ साखर कारखाने बंद पडल्यामुळे येथील शेतकर्‍यांमध्ये ऊस लागवडीबाबत गैरसमज आणि विदर्भाला साखर कारखानदारी लाभणारी नाही ही भीती होती. अशावेळी स्थानिक शेतकर्‍यांकडे पारंपरिक पीक घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मात्र, अशावेळी तो पर्याय आणि ऊस उत्पादन घेऊन योग्य नफा मिळवून देण्याबाबतचा विश्वास नितीन गडकरी आणि ‘मानस अ‍ॅग्रो’ समूहाने शेतकर्‍यांना दिला. इतकंच नाही तर, शेतकर्‍यांना त्यांच्या उसाचा योग्य नफा देत वेळेवर करत ‘मानस’ समूहाने आम्हा शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला.” परिणामी, पाच वर्षांपूर्वी तीन एकरात राजेश यांनी सुरुवात केली होती. पण, आज ते १०० टक्के उसाचे उत्पादन घेत आहेत.

ऊस उत्पादनात शतकवीर होण्यापर्यंतचा प्रवास करताना राजेश यांनी पश्चिम महाराष्ट्राला ज्या पद्धतीने ऊस शेतीने ’सुजलाम् सुफलाम्’ केले, त्याच धर्तीवर आता विदर्भातही उसाचे उत्पादन घ्यायचे, हा ‘मानस’ केला. पाच वर्षांपूर्वी राजेश यांनी तीन एकर शेतात ऊस लावला. विदर्भातील वातावरण मात्र उसासाठी अनुकूल नाही, याची राजेश यांनाही पूर्ण कल्पना होती. मात्र, तरीही महाराष्ट्रातील ऊस उत्पादक जिल्ह्यांचे सातत्याने दौरे करून ते तंत्रज्ञान, तेथील ऊस लागवडीच्या पद्धती याचा सखोल अभ्यास करून विदर्भातील प्रतिकूल परिस्थितीतही इथल्या मातीत एकरी १०० टन इतके उत्पादन घेतले जाऊ शकते, असा विश्वास राजेश यांच्या मनात निर्माण झाला. हेच तंत्रज्ञान आणि अर्थकारण शिकून घेत प्रयोग म्हणून राजेश यांनी त्यांच्या शेतात तीन एकरात उसाची लागवड केली. यावेळी माती परीक्षण, औषध फवारणी ते उसाला पाणी देण्यासाठी ‘ड्रिपिंग’ तंत्रज्ञान यामध्ये ‘मानस’च्या कृषीतज्ज्ञ व अधिकार्‍यांनी राजेश यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. म्हणूनच आज विदर्भातही १०० टन ऊस उत्पादन शक्य आहे, हा विश्वास आपल्या प्रयोगातून राजेश यांनी सार्थ करुन दाखवला आहे.


२०२०-२१च्या गाळप हंगामात ‘मानस’ समूहाच्या ‘मॉडेल प्लॉट स्कीम’ उपक्रमात राजेश हे १२५ टन ऊस उत्पादनाचे ध्येय घेऊन उतरले. १२५ टनाचे ध्येय गाठण्यासाठी ‘गन्ना मास्टर’ तंत्रज्ञानाचा वापर राजेश यांनी प्लॉट उभारण्यासाठी केला. सव्वा दोन एकरात हा प्लॉट उभारण्यात आला. प्लॉट तयार करण्यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले, तर चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्याकडून देण्यात येणार्‍या सेंद्रिय उत्पादनांचा वापर केला. बूस्टर, न्यूट्रस देण्यासाठी नियोजनबद्धरित्या सेंद्रिय उत्पादनांचा वापर केला. राजेश यांनी ही लढाई जिंकली, ती सात तत्वांच्या आधारे. ते असे की, जमिनीची तयारी, लागवडीची पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, आळवणी आणि फवारणीचे नियोजन, कीड रोगाचे व्यवस्थापन, मोठी बांधणी आणि बाड बांधणीचं नियोजन, रोपांच्या संख्येचं आणि पाण्याचं नियोजन यांच्याआधारे राजेश यांनी विदर्भासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही उसाचे इतकी विक्रमी उत्पादन घेतले. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार झालेला हा एक ऊस वजनाने साडेतीन किलोचा आहे. “माझ्या पाठीशी ‘मानस अ‍ॅग्रो’ आणि नितीन गडकरी साहेब खंबीरपणे उभे असल्यामुळेच माझ्या शेतीत हा प्रयोग मी यशस्वी करू शकलो,” हे राजेश अत्यंत अभिमानाने सांगतात. त्याचबरोबर आज ‘मानस’सारख्या अनेक संस्था शेतकर्‍यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यास विदर्भातील शेतकर्‍यांसमोर आत्महत्येसारखे विचार येणारच नाहीत, हेही राजेश अत्यंत विश्वासाने सांगतात. राजेश आणि नितीन गडकरी यांच्या ‘मानस अ‍ॅग्रो’ यांचे हे यश विदर्भाच्या भविष्यातील ऊस उत्पादन आणि साखर उद्योगाच्या प्रगतीची नांदी ठरेल, हे नक्की!


@@AUTHORINFO_V1@@