डॉ. शिरीष अंबेकर यांची 'कमल' साधना : एक प्रगल्भ रंगप्रवास

18 Dec 2021 12:15:55

Shirish Ambekar_1 &n
डॉ. अंबेकरांना फक्त कलासृजनाचं व्यसन आहे आणि कलाप्रशासनाकडे ते कर्तव्यभावनेतून बघतात. इतर कुठल्याही प्रकारचे व्यसन-मद्यपान वा आणखी काही यांचा त्यांच्या कलासाधनेशी आणि कलाप्रशासन कर्तव्यांशी संबंध येत नाही. त्यांच्या या स्वभावामुळेच कदाचित त्यांनी 'वॉटर लिलीज् पेंटिंग सीरिज' निर्माण केली असावी.
 
'व्यक्ती तितक्या प्रकृती' अशी म्हण आपल्याला सर्वश्रुत आहे. त्याच स्वरुपाने कलाक्षेत्रातही अशाच कलाप्रवृत्ती आणि कलाप्रकृती पाहावयास मिळतात. चित्रकार आणि 'डॉक्टरेट' असलेल्या विशेष म्हणजे, एका स्वतंत्र विभागाचे 'फाईन आर्ट फॅकल्टी'चे प्रमुख पद सांभाळणाऱ्या तरीही शांत, संयमी, निगर्वी आणि कलेच्या उपासनेत सतत व्यग्र राहत आपली कलाविषयक प्रशासकीय, शैक्षणिक तत्त्वे-कर्तव्ये चोख बजावणाऱ्या डॉ. शिरीष अंबेकर यांच्या प्रदर्शनातील कलाकृतींविषयी लिहिण्याअगोदर...
 
या 'प्रमुख' पदांवर असणाऱ्या 'कलाकार' म्हणून असणाऱ्या प्रवृत्तींविषयी सांगावंच लागेल. खरं म्हणजे हा विषय डॉ. अंबेकर यांच्या स्वभावगुण विशेषामुळेच लिहावा लागणार आहे. कलाक्षेत्रात विविध विभागांमध्ये, विविध स्वभावांचे, विविध प्रकृतींचे आणि भन्नाट कथित गुण(?) असणारी व्यक्तिमत्त्वे बसलेली वा बसवलेली पाहायला, अनुभवायला मिळतात. काही 'प्रमुख' मंडळी मिळालेले वा मिळविलेले पद हे सेवा नसून सत्तेत वा मनमानीचं केंद्रस्थान म्हणून अंमलात आणण्याचं खुर्चीस्थान आहे, असं मानतात. काही 'प्रमुख' हे कलाक्षेत्राशी संबंधित नसतात, तरीही कलाक्षेत्राची जाण असणाऱ्या तज्ज्ञाप्रमाणे वावरत उद्घाटनं-दौरे-बैठका घेत मुशाफिरी करीत फिरतात. चेष्टा-टवाळक्या- छद्म बोलत, सहकाऱ्यांशी टोचून बोलत, स्व(अ)ज्ञानाचे दीपस्तंभ उभे करत, कलाप्रशासनात तज्ज्ञ असल्याचे स्वतःला 'प्रोजेक्ट' करता येणं, खरंतर हीदेखील एक कलाच आहे. असंही काही प्रमुख सेलिब्रिटींना चपखलपणे जमत असतं. अहो, नुसतं 'प्रमुख' हे विशेषनाम जरी चर्चेत घ्यायचं ठरवलं, तर एखादा लेखच काय, ग्रंथ निर्माण होईल. या लेखाचे नायक हेदेखील एका कला विभागाचे प्रमुख आहेत. मात्र, ते वरील वर्णन केलेल्या 'प्रमुखां'पासून कोसो मैल दूर आहेत.
 
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'फाईन आर्ट' विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून तब्बल १४ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या विशेष म्हणजे, 'युजीसी'ची मान्यता असणाऱ्या विद्यापीठातून अधिकृतपणे आणि पाचच वर्षांत पीएच.डी अर्थात 'डॉक्टरेट' मिळविलेले डॉ. शिरीष अंबेकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, जहांगिर कला दालनाच्या 'हिरजी जहांगिर आर्ट गॅलरी'त नुकतेच संपन्न झाले. त्यांच्या कलाकृती, त्यांचा विषय, कलारंग लेपनातील वैशिष्ट्य आणि सातत्यपूर्ण कलोपासना या 'कलाव्रता'मध्ये त्यांनी कला प्रशासनिक जबाबदारीचा अडथळा होऊ दिला नाही आणि येऊ पण दिला नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने हा माणूस 'कलाकार' म्हणावा लागेल. कधी जर एखादं कला-विद्यापीठ स्थापन झालं, तर अशा मोठ्या जबाबदारीच्या पदावर प्रत्यक्ष अनुभव जो 'तात्पुरता-अतिरिक्त' अशा स्वरुपाचा नसून 'स्थायी नियुक्ती'चा कला प्रशासनचा, अधिकृत 'डॉक्टरेट' जी विहीत मुदतीत मिळविलेली... अशा अनुभवी व्यक्तीस कुलगुरू पदावर नेमावं, असाही विचार कधी कुणी वरिष्ठांनी केला तर चुकीचं ठरणार नाही, असं जाणकार सांगतात.
 
डॉ. अंबेकरांना फक्त कलासृजनाचं व्यसन आहे आणि कलाप्रशासनाकडे ते कर्तव्यभावनेतून बघतात. इतर कुठल्याही प्रकारचे व्यसन-मद्यपान वा आणखी काही यांचा त्यांच्या कलासाधनेशी आणि कलाप्रशासन कर्तव्यांशी संबंध येत नाही. त्यांच्या या स्वभावामुळेच कदाचित त्यांनी 'वॉटर लिलीज् पेंटिंग सीरिज' निर्माण केली असावी.
 
'कमलपुष्प' हे भगवान बुद्धाचे, माता लक्ष्मीचे, भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू यांचे प्रतीक आहे. अजिंठ्यातील 'पद्मपाणि बोधिसत्व' ही जगप्रसिद्ध कलाकृती सर्व कलाजगताला ज्ञात आहेच. 'निसर्गचित्रण' या कला प्रकारातील त्यांची प्रत्येक कलाकृती ही हिरव्या, गडद हिरव्या, पांढऱ्या रंगाचा प्रभाव असलेल्या, परंतु फिक्कट हिरव्या अशाच परंतु, मोजक्याच रंगयोजनेत साकारलेली आहे.
 
त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत कमळांच्या तळ्याचे वास्तववादी कलाशैलीत रंगलेपन व चित्रण केलेले आढळत असले, तरी त्यात पाश्चिमात्य 'इम्प्रेशनिझम' आणि 'रोमँटिसिझम' या दोन कलाप्रवाहांचा सुंदर सहयोग मिलाफ दिसतो. विशेष म्हणजे, हे दोन कलाप्रवाह जरी त्यांनी हाताळले असले, तरी त्यात शिरीष अंबेकर यांची स्वतंत्र छाप आहे. हेच त्यांच्या कलाकृतीचं वैशिष्ट्य ठरावं. त्यांच्या चित्रात पाण्याने भरलेली तळी, गवत, झाडी, पाण्यातील निसर्गाचे नितळ प्रतिबिंब आणि त्यावर कमलपत्रांची विविध छोटी-छोटी बेटे, त्या त्या कमलपत्रांवर विसावलेली कमलपुष्पे, कळ्या, काही उमलू पाहत असणाऱ्या कळ्या, कमलपुष्पांची देठं, त्यांची पानं हे सर्व इतकं सूक्ष्म, तसेच बारीकसारीक तपशीलांसह त्यांनी चित्रबद्ध केलेलं आहे, ते पाहताना कलारसिक थक्क होतो.
 
रंगलेपनाचे थरावर थर देऊन, वास्तवी शैलीत साकारलेली प्रत्येक कलाकृती कलारसिकांना शांत, आनंददायी, सौंदर्यपूर्ण, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात घेऊन जाते. मुळात 'कमळ' हे प्रतीकच शांततेचं, स्थितप्रज्ञतेचं आणि प्रगल्भतेचं आहे. डॉ. अंबेकर यांच्या मूळ गावी त्यांना कमळांच्या फुलांची तळी पाहायला मिळतात. विद्यार्थी अवस्थेत त्यांच्यावर याच कमळ प्रतीकाचे संस्कार झाले. संस्कार हे सहवासानेच होतात. कमलपुष्पाच्या सहवासाने ते जागरुक विद्यार्थी बनू शकले. कमलदलाच्या सततच्या संवादामुळे त्यांच्यात एक सर्वसमावेशक प्रशासन राबविणारा जात-पात न मानणारा आणि कर्तव्यपरायण 'विभाग प्रमुख' निर्माण झाला. कमलपुष्पांच्या तळ्याचा अभ्यास निरीक्षणांतून चित्रबद्ध करण्याच्या साधनेमुळे, आपण कुठल्याही कर्तव्यांना, सार्वजनिक करत असतानाच मूळ तत्त्वांना बाधा आणायची नाही, हे समीकरण त्यांना अंगीकारता आले. त्यांच्या प्रत्येक कलाकृती आकार, रंगरचना यांची साधलेली सुसंगती, 'डेप्थ' किंवा अंतराचा आभास, खोली या सर्वांमुळे कलारसिकांना आपण खरंच कमलपुष्प तळ्याजवळ उभे आहोत, असा भास होतो. त्यांच्या अशा या अद्भुत वाटणाऱ्या कलाकृती हॉटेल्स, हॉस्पिटल्स शासकीय वा कंपन्यांची कार्यालये अशा ठिकाणी प्रदर्शित करण्यास अत्यंत समर्पक आहेत.
 
डॉक्टर आणि विभाग प्रमुख असलेले चित्रकार शिरीष अंबेकर हे सुमारे ३० वर्षांपासून दृश्यकलेचे कलावंत साधक आणि कलाध्यापक म्हणून सकारात्मक राहिलेले आहेत. त्यांनी त्यांच्या १४ वर्षांत विभागप्रमुख 'फाईन आर्ट विभाग' म्हणून पदभार स्वीकारलेला असला, तरी ते स्वतःच परदेशांत जाऊन 'जीवाची मुंबई' करत बसले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'व्हिज्युअल आर्ट सेमिनार्स' अनेक पद्धतींनी यशस्वी करून कलाजगतातील त्यांच्या विभागाची स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुख्य म्हणजे, त्यांच्या कलाकृती भारतातील मान्यताप्राप्त कला दालनांत प्रदर्शित झालेल्या आहेत. त्यांना विविध राज्यं व राष्ट्रीय स्तरावरील कला पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. या सर्व कौतुकांचा त्यांच्या साधेपणावर कुठेही प्रभाव नाही, परिणाम नाही. त्यांनी अतिगंड नाही, बोलण्यात नाटकीपणा वा कृत्रिमता नाही. मुख्य म्हणजे, ते व्यसनांच्या गर्तेत अडकलेले नाहीत, हीच खरी त्यांची शिदोरी, यातच त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्या कलासाधनेच्या, त्यांच्या कला विभाग प्रमुखपदाच्या कार्यास आणि भविष्यात त्यांना आणखी उत्तमोत्तम जबाबदाऱ्या मिळून अनेक कला विद्यार्थी निर्माण करण्याच्या कार्यास बळ मिळो, हीच त्यांच्या कलाप्रवासासह कला प्रशासकीय सेवेस सदिच्छा....
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ
Powered By Sangraha 9.0