‘होम शेफ’ घडविणारा ‘मास्टरशेफ’

17 Dec 2021 14:47:40

Mastershef _1  
‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्‍या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्‍या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...

कोरोनाने अनेकांना बेरोजगार केले, तसेच अनेकांना उद्योग-व्यवसाय करायलासुद्धा शिकवले. ‘फिक्की’ या उद्योजकीय संस्थेने २०२० मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अंदाजे ७० टक्के स्टार्टअप्सना कोरोनाचा फटका बसला. अनेकांनी आपले ऑफिसेस, दुकाने बंद केली. काही उद्योजकांनी ‘डिजिटल’ मंचाचा वापर केला. शिक्षणाचे ‘डिजिटलायझेशन’ झाल्यामुळे या क्षेत्रातला व्यवसाय दुपटीने वाढला.

‘ऑनलाईन’ व्यवहार करणार्‍या, सेवा देणार्‍या कंपन्या चांगला व्यवसाय करू लागल्या. हे सर्व कोरोनामुळे आलेले ‘डिजिटलायझेशन’ ते शेफ पाहत होते. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्‍या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्‍या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...
संतोष घेगडमल हे व्यवसायाने वकील. नाशिकचं सिन्नर हे त्यांचं मूळ गाव. संतोष आणि ताईबाई या दाम्पत्यास एकूण पाच अपत्ये. चार मुले आणि एक मुलगी. त्यातील चेतक हे लहानपणापासून हुशार, जरासे कल्पकवृत्तीचे. चेंबूरच्या महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. बारावीनंतर ‘हॉटेल मॅनेजमेंट’चे शिक्षण घ्यायचे, हे त्यांचे ठरलेले. त्यासाठी त्यांनी परीक्षा दिली. ‘ऑल इंडिया रँकिंग’ मिळाले आणि अहमदाबादच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये प्रवेश निश्चित झाला. तीन वर्षे अथक परिश्रम घेऊन चेतकनी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ची पदवी संपादन केली. पदवी मिळविल्यानंतर ‘सेंटॉर हॉटेल’मध्ये ‘किचन सुपरवायझर’ पदावर नियुक्ती झाली. त्याचसोबत ‘सहारा स्टार’, ‘सिरेना क्लब’ सारख्या नामांकित ठिकाणी नोकरी केली.

दरम्यान, नोकरी करता करता चेतकनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दक्षिण भारतातील मदुराई विद्यापीठाची ‘हॉटल मॅनेजमेंट’ विषयातील ‘मास्टर्स’ पदवी मिळवली. १९९४ ते २००६ एवढा कालावधी ‘सेंटॉर हॉटेल’मध्ये नोकरी केल्यावर एक वेगळी संधी चेतक यांच्यासमोर आली ती संधी होती अध्यापनाची. भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हॉटेल व्यवस्थापनाचे धडे मिळावेत, यासाठी भारती विद्यापीठाने चेतक घेगडमल यांची नियुक्ती केली. ‘शेफ चेतक ते प्राध्यापक चेतक’ असा नवीन प्रवास सुरू झाला. २००६ ते २०११ पर्यंत हा प्रवास असाच सुरू होता.

स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय असावा, या ऊर्मीतून त्यांनी ’ला’बेला केटरिंग सर्व्हिसेस’ची स्थापना केली. लग्न समारंभ असो की कोणताही आनंदमय सोहळा, या समारंभात येणार्‍या पाहुण्यांची भोजनतृप्ती ‘ला’बेला केटरिंग सर्व्हिसेस’ पूर्ण करत होती. अशा शेकडो विवाह सोहळ्यांना भोजनाची सेवा पुरवली होती. सोबतच काही कंपन्यांचे कॅन्टिन चालवण्याचे कामसुद्धा ‘ला’बेला’ करत होती. पवईमध्ये एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ‘ला’बेला’चे ‘सेंट्रल किचन’ होते. दररोज ३०० कर्मचार्‍यांचे भोजन येथे तयार होत असे.
 
 
मात्र, यातील काही कंपन्या दुसरीकडे गेल्याने चेतक यांनी घरातूनच काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कोणाला हॉटेल सुरू करायचे असेल, तर त्यासंदर्भातील सल्लागार म्हणूनदेखील काम करण्यास त्यांनी सुरुवात केले. तसेच काही ‘टू स्टार’, ‘थ्री स्टार’ तसेच ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल्सना कर्मचार्‍यांची सतत गरज लागते. अशा उमेदवारांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती करण्याचे कामसुद्धा शेफ चेतक करू लागले. सोबतच विविध महाविद्यालयांतून अध्यापनाचे काम सुरूच राहिले. ‘भारत पेट्रोलियम’सारख्या सरकारी संस्था आणि काही मोठ्या क्रूझना ‘केटरिंग’च्या सेवा ‘ला’बेला’ने पुरविलेल्या आहेत.
 
 
दरम्यान, १९९७ साली हॉटेल व्यवस्थापनाचे धडे घेतलेल्या वैशाली या सुविद्य तरुणीसोबत शेफ चेतक यांचा विवाह झाला. वैशाली घेगडमल या आता ‘ग. द. आंबेकर महाविद्यालया’तील ‘हॉटेल व्यवस्थापन’ विभागाच्या प्रमुख आहेत. २०१९च्या शेवटच्या महिन्यापासून ‘कोविड-१९’ने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली. भारतात याचं गांभीर्य कळण्यासाठी २०२०चा मार्च महिना उजाडला. मार्च अखेरीस सरकारने ‘लॉकडाऊन’ जाहीर केला आणि अवघा देश शांत झाला. जाण्या-येण्यावर संपूर्ण निर्बंध आले.
 
 
‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना रुढ झाली. ‘डिजिटल’ माध्यमांकडे सगळे वळले. ऑफिसच्या मीटिंग्ज असोत की विद्यार्थ्यांची लेक्चर्स, सगळं ‘ऑनलाईन’ सुरू झालं. नेमका हाच धागा पकडून चेतक घेगडमल हेसुद्धा ‘डिजिटल’ माध्यमांचा वापर करण्यास सज्ज झाले. विविध ‘ऑनलाईन’ कोर्सेस कसे चालतात, याचा बारकाईने त्यांनी अभ्यास केला. ‘वेबिनार’, ‘ऑनलाईन लेक्चर्स’, ‘प्रेझेंटेशन’ कसे द्यायचे, हे समजून घेतले. शिकून घेतले. त्यानंतर ‘शेफ चेतक अकॅडमी’च्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात केली.
 
 
अगदी कांदा चिरण्यापासून ते चविष्ट बिर्याणी बनविण्यापर्यंत, स्वत:चा ‘फूड स्टॉल’ उभारण्यापासून ते ‘ऑनलाईन’ विक्री कशी करावी, इथपर्यंत. सर्व विषयांचे ज्ञान ते देऊ लागले. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने ‘शेफ चेतक अकॅडमी’सोबत सहकार्य करत अनेक नवउद्यमींना घडविण्यास सुरुवात केली. यासाठी ‘युवा परिवर्तन’ या संस्थेची मोठी मदत झाली. ‘शेफ चेतक अकॅडमी’ने ६०० पेक्षा अधिक लोकांना ‘होम शेफ्स’ म्हणून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतांशजणांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले. डोंबिवली, पुणे, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी त्यांनी स्वत:चे ‘फूड बिझनेस’ सुरू केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यावर्षी अन्नपदार्थ तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे सर्वच महत्त्वाची बक्षिसे शेफ घेगडमल यांच्या विद्यार्थ्यांनी पटकावली.
 
‘हेल्दी फूड्स पॅकेट’ची निर्मिती, ‘स्नॅक्स’ आणि ‘टेक अवे’, ‘टिफीन बिझनेस’, ‘होम बेकर गाईड’ असे विविध पर्याय या अकॅडमीत शिकवले जातात. प्रत्येकालाच स्वत:चं हॉटेल वा ‘फूड स्टॉल’ सुरू करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. अशा लोकांसाठी ‘मोबाईल फूड व्हॅन’ ही संकल्पना ‘चेतक अकॅडमी’ राबविते. त्यासंदर्भातील शासकीय परवान्यासंदर्भातील मार्गदर्शनदेखील ते करतात. यावर्षी दिवाळीचा फराळ त्यांनी परदेशात पाठविला होता. “भारतीयांनी डॉलरमध्ये कमावले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यातूनच आम्ही परदेशात फराळ पाठविण्यास सुरुवात केली, ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला,” असे शेफ घेगडमल म्हणाले.
शेफ चेतक घेगडमल हे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील प्रसिद्ध अशा ‘मास्टर शेफ’ कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळावर आहेत. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात येथील सहभागी स्पर्धकांच्या चाचण्या घेऊन त्यातील स्पर्धक निवडण्याचे काम ते करतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येतंच की, आपलादेखील हॉटेल व्यवसाय असावा. त्या प्रत्येकाचे स्वप्न साकार करण्यासाठी शेफ चेतक घेगडमल सज्ज आहेत. खर्‍या अर्थाने ते ‘होम शेफ’ घडविणारे ‘मास्टरशेफ’ आहेत.



Powered By Sangraha 9.0