पुणे : म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील चौकशी सुरु असताना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला.
पुणे सायबर विभागाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना काही वेळापूर्वीच सल्लागार अभिषेक सावरीकर याला देखील अटक करण्यात आले आहे.